पोलिस स्टेशनमध्ये झाला ‘प्यार का पंचनामा’

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

हृदयात दुसऱ्या तरुणीने जागा घेतली. याबाबत कुणकूण लागताच पतीच्या कार्यालयात पत्नी धडकली अन् पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. हे प्रकरण अजनी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.

नागपूर,(२१ जून):  प्रेम झाले अन् विवाहही झाला. सुखी संसाराची वेल वाढताना अचानक दृष्ट लागली. त्याच्या हृदयात दुसऱ्या तरुणीने जागा घेतली. याबाबत कुणकूण लागताच पतीच्या कार्यालयात पत्नी धडकली अन् पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. हे प्रकरण अजनी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांनी कौटुंबिक वाद असल्याचे सांगून न्यायालयात दाद मागण्याची समज दिली.
राजेश व कस्तुरीची (दोघांचीही नावे बदललेली) २००६मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी २००८मध्ये प्रेमविवाह केला. कस्तुरी खासगी काम करते. तिच्यासोबत श्रेयाही काम करते. २०१४मध्ये श्रेया व राजेशची ओळख झाली. वर्षभरानंतर राजेश हा नोकरीच्या शोधात मुंबईला गेला. नोकरी मिळाल्यानंतर कस्तुरीही मुलीसह मुंबईला गेली. श्रेयाही नोकरीच्या शोधात मुंबईत आली. ती कस्तुरीकडे राहायला लागली. याचदरम्यान राजेश व श्रेयाचे प्रेम बहरले. पगार कमी पडत असल्याने राजेश व कस्तुरीने नागपुरात परतण्याचा निर्णय घेतला. दोघे नागपुरात परतले. त्या मागोमाग श्रेयाही आली. त्यानंतर राजेशला नाशिक येथे नोकरी मिळाली. तो तेथे स्थायिक होण्याच्या प्रयत्नात होता. याचदरम्यान श्रेयाही नाशिकला असल्याचे कस्तुरीला कळले. कस्तुरीने श्रेयाला जाब विचारला. राजेशलाही विचारणा केली. नाशिक येथील नोकरी सोडून राजेश नागपुरात परतला. मानेवाडा भागात कार्यालय उघडले. नाशिकहून परतल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल झाला होता. कस्तुरीला संशय आला. तिने राजेशचा मोबाइल तपासला. राजेश व श्रेयाचे आक्षेपार्ह संभाषण तिला दिसले. तिने श्रेयावर पाळत ठेवायला सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी श्रेया ही मानेवाडा मार्गावरील राजेशच्या कार्यालयात आली. तिच्यामागोमाग कस्तुरी व काही नातेवाइकही आले. श्रेया केबिनमध्ये होती. कस्तुरीने तिला जाब विचारला असता, ‘तुला काय करायचे आहे’ असे म्हणत श्रेयाने वाद घातला. कस्तुरीने केबिनची झडती घेतली असता त्यामध्ये आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. हे प्रकरण अजनी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. कस्तुरीने तक्रार दिली. पोलिसांनी ‘प्यार का पंचनामा’ करून न्यायालयात दाद मागण्याची समज कस्तुरीला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *