◼️लॉकडाऊन उठेल पण…जबाबदारीचे काय ?

🔴 लॉकडाऊनउठेल पण…जबाबदारीचे काय ?

     

         संपूर्ण जगात थैमान घालून हाह:कार उडविलेल्या कोरोना विषाणूंला वेसण घालून त्याचा नि:पात करण्यासाठी कोरोनाची पार्श्र्वभूमी असतानाही योग्य वेळी कृती करण्याच्या कामात डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्याबरोबर आलेल्या परदेशी लोकांची सरबराई करण्यात मधला बराच मोठा कालावधी गेल्यामुळे कोरोनाने आपला पसारा ब-यापैकी वाढविला असला तरी महाराष्ट्र सरकारने यावर कसोशीने प्रयत्न करूनही त्याचा फैलाव रोखण्यात यश न मिळाल्याने देशासह महाराष्ट्रातही लॉकडाउन ३० जनपर्यंत वाढवलेला आहे. लॉकडाउनचा हा टप्पाही संपण्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. अनेकांना ३० जून नंतर नंतरचे आयुष्य पुन्हा एकदा सर्वसामान्य होईल का या प्रश्नाने भेडसावले आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. कारण ३० जून नंतर परिस्थिती कशी हाताळणार याचे कोणतेही स्पष्ट संकेत सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. आधीच समाजातील सामान्य घटकांचे विशेषत: उद्योगधंदे ठप्प झाल्याने लॉकडाऊन काळात कामाच्या ठिकाणी राहणे अशक्य म्हणून भयभीत होऊन स्थलांतरीत झालेले मंजूर ठिकठिकाणी अडकल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना. अनेक स्वंयंसेवी संघटनांनी पुढे येऊन मदतीचा हात दिल्यामुळे त्यांना थोडासा तरी दिलासा मिळालेला होता. त्यांची जगण्याची प्रक्रिया तरी सुरू आहे. कष्ट करण्याची धमक आणि स्वाभिमान अंगी असलेल्या या मजूरांवर भिका-यागत मदत घ्यावी लागणारे दृश्य बघताना हृदय पिळवटून निघायचे. शेतकरी, बांधकाम क्षेत्र आणि हातावर पोट असलेले रोजंदारीवर काम करणारे शहरी आणि ग्रामिण असंघटीत कामगार यांच्या अडचणी मोठ्या आहेत. आपल्याबरोबरच परिवाराची पोटाची खळगी भरतांनाचे त्यांचे हाल तर माणूस किती ही कठोर मनाचा असला तरी त्याच्याने त्यांचे हाल बघवणार नाहीत असे आजचे चित्र आहे. शहरातील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. यापुढेही अशीच स्थिती राहीली तर कोट्यावधी लोकांना आपल्या नोक-या कायमच्या जातील या भीतीने ग्रासले आहे. हे निश्र्चितच भयावह आहे.
कोरोना एक दिवस जाईलच
देवी/कॉलरा/प्लेग सारखे महामारीचे रोग जसे या देशातून हद्दपार झाले तसा कोरोना विषाणुचाही शेवट एक दिवस होईलच. पण तो दिवस आपल्या बेजबाबदार आणि स्वैरपणे वागण्यामुळे कधी‌ येईल ते सांगणे कठीण आहे.
आजच्या घडीला अपु-या साधनांसहीत का होईना अत्यंत प्रतिकूल राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत ही महाराष्ट्र सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलत आहेच. परंतु लोकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे अपेक्षित रिजल्ट मिळण्यास विलंब होत आहे. त्यासाठी नाईलाजाने का होईना आणखी काही काळासाठी लॉकडाऊनचा कालावधि वाढविला गेला तर आश्चर्य वाटायला नको. असे जर झाले तर यापुढील कालावधिच्या लॉकडाउनमधे तरी निदान लोकांनी केवळ सार्वजनिक हितासाठी नव्हे तर पुढे जाऊन आपल्या दारापर्यत येणा-या विषाणूला रोखण्यासाठी का होईना तज्ञांनी सर्वतोपरी घालून दिलेले नियम अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पाळले तर करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीचा आलेख जो आकाशाला भिडायला निघाला आहे तो निश्चितच खाली येताना दिसेल.
आर्थिक दृष्ट्या विचार केला तर केवळ महाराष्ट्र सरकारच नव्हे तर देशातील कुठलेही राज्य सरकार एक निश्चित कालावधी साठीच हा लॉकडाऊन ठेऊ शकेल. सतत हा कालावधी वाढविणे कुणाच्याही हिताचे नाही. आणि या काळात सतत प्रत्येकाच्या मागे लागणे कुणालाही शक्य होणार नाही. आपली आणि आपल्या परिवारची सुरक्षा आपल्याच हातात आहे हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. आता पर्यंत कोरोना विषाणु विषयी सर्वांनाच माहिती झालेली आहे. शारिरीक अंतर कटाक्षाने पाळणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, प्रतिबंधक उपकरणांचा वापर करणे आणि त्यांंचा वापर न केल्यास होणारे गंभीर परिणाम हे सर्व आज सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांद्वारे सर्वजण पहात आहेत. त्यामुळे लॉकडाऊन उठल्यावर कसे वागायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे नसून जारी केलेल्या सरकारी सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करावयाचे आहे आणि तेच सर्वांच्या हिताचे आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ६ जून पासुन लॉकडाऊन मध्ये जी काही शिथिलता देण्यात आली त्यानंतरचे लोकांचे वर्तन पाहता भविष्याची खूप भीती वाटते. जरी लॉकडाऊन उठविण्याचा सध्याचा मानस असला तरी त्यासाठी घाई करणे अतिशय जोखमीचे काम आहे. कारण लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता कोंबड्यांच्या खुराडीचे दार उघडल्यावर कोंबड्यांच्या झुंडी जसे बाहेर पडण्यासाठी झेप घेतात तशी घाई केली आणि जर विषाणूंची लाट उलटली तर त्याचा फैलाव अति वेगाने झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते ‘लेने के देने पडेंगे’असे खूप म्हणजे खूप महागात पडणारी गोष्ट आहे. कारण चीनला महिन्यापूर्वीच नव्वद दिवसाच्या लॉकडाऊन उठवल्यानंतरच्या मोकळीक मिळाल्यामुळे काही लोकांच्या फाजील आत्मविश्वासाच्या वर्तनामुळे अल्पावधितच चीनला पुन्हा एकदा झटका बसला आहे हे ताजे उदाहरण डोळ्यासमोर आहे.
आपल्याकडे तर असे आत्मविश्र्वास दांडगा ( ? ) असलेल्या मंडळींची कमी नाही. मग अशावेळी लॉकडाऊनचे ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी आपली गत होणार नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आजपर्यंतचे लॉकडाउन काळात केलेल्या सगळ्याच प्रयत्नावर पाणी पडणार आहे आणि त्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था आणखी रसातळाला जाईल यात शंकाच नाही.
तेंव्हा लॉकडाऊन उठविणे आणि ढासळलेला समाज आणि अर्थव्यवस्थेची गाडी राष्ट्रीय कर्तव्य भावनेने रूळावर आणणे ही सर्व जबाबदारी तुमची आमची आणि सर्वांचीच आहे.
जर लॉकडाउन वाढवायची गरज भासलीच तर सरकारकडून ‘टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे’ आणि जनतेनेही सर्व सूचनांचे पालन करत घराबाहेर न पडता जियो और जीने दो या तत्वाने या संकटाला दूर करण्यासाठी आपले योगदान द्यावे लागणार आहे.


कारवा़ॅं चलता ही रहना होगा या न्यायाने आज संपूर्ण जग कोरोना विषाणूग्रस्त असन अख्खी मानवजातच संकटात सापडली असली तरी जगातील श्रेष्ठतम वैज्ञानिक, डॉक्टर्स, त्यांना मदत करणारे आरोग्यसेवा संबंधित सर्व घटक व्रतस्थपणे आपला जीव धोक्यात घालून मानवतेची सेवा करत आहेत.
शहरातील उद्योगधंदे ठप्प झाली असल्याने संचारबंदी कालावधीत कामाच्या ठिकाणी राहण्याची सोयी अभावी. स्थलांतरीत झालेले ग्रामिण मजूर आपले गाव गाठत असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे परिवहन सेवे अभावी आहे तिथे म्हणजे घरापासून ही आणि कामापासून ही लांब मधेच कुठेतरी अडकून पडलेले बरेच मजर/श्रमिक पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे मजल दर मजल करत आज आपले घर गाठले आहेत. नंतर काही प्रमाणात रेल्वेनेही सोय केली. या श्रमिकांची त्यांची स्वत:ची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष काहीही चूक नसतानाही त्यांची दिनचर्या भिखा-यागत झाली होती हे विसरता कामा नये. अनेक स्वंयसेवी संघटना माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी कार्यरत असल्यामुळे निदान त्यांची जगण्याची प्रक्रिया तरी सुरू आहे. उद्याची शाश्वती कोणालाही नाही.
परंतु असे हे किती दिवस चालणार आहे ? कोरोनाचा विषाणूचा आजार कधी संपणार हे आज जगातील प्रमुख देशातील कोरोनावर लस शोधकार्यात असलेले ‌संशोधक आणि शास्त्रज्ञांनाही सांगणे अवघड झाले आहे.त्यामुळे अखिल मानव जातीला आता वास्तवाचा स्वीकार करण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्या आहेत मानवाने त्या सर्वांवर मात करीत आत्तापर्यतचा प्रवास केला आहे. जगात प्रत्येक वर्षी कोट्यावधी लोक विविध आजार, व्याधी आणि अपघातात मरत असतात. परंतु आत्ताचा कोरोना विषाणूंचा फैलाव हा मानवनिर्मित असून आणि त्याच्याकडे मानवाने दुर्लक्ष केल्यामुळेच अख्या जगाच्या नाकात दम आणला आहे. तसा या जगात कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही.जन्म आहे तिथे मृत्यु आहेच.मृत्यु हे अटळ सत्य असतं म्हणून निष्काळजी पणे वागून तो ओढवून घ्यायचे नसतो. आलेल्या संकटाचा सामना करायचे असते. लॉकडाऊन काय दीर्घ काळापर्यंत योजण्यासारखा उपाय नाही.आज ना उद्या तो मागे घेतला जाणार आहेच.
प्रत्येकांनी सामाजिक आणि पारिवारीक जबाबदारी ओळखून वागायची गरज आहे. बेफिकीरपणाने वागल्याने अमेरिका आदी देशातील नागरिकांना भोगावे लागलेले परिणाम आज सा-या जगापुढे आहेत. आपल्या देशातही असे बेजबाबदारपणाने वागणारे सगळे खुशालचेंडू आहेत. त्यांनी अनेक मार्गांनी कमाई करून ठेवली आहे, त्यांना आणखी सहा महिने लॉकडाऊन असले तरी बिघडत नाही. तसे पाहिले तर भारतात कोरोना विषाणूचा शिरकाव होण्याची चूक काही इथल्या सामान्य गरीब, शेतकरी कामकरी मजुरांची नव्हे तर सतत परदेशात जाणे येणे करणा-या अतिश्रीमंत आणि अशा उटपटांग लोकांनी या कोरोना विषाणूचा भारतभर फैलाव केला आहे.त्यांच्या बेजबाबदारपणे वागून बाधितांची संख्या वाढवण्याची शिक्षा सरसकट सर्वांना मिळत आहे. या लोकांनी सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटून त्यांच्या अस्तित्वाच्या मुळावरच आज घाव घातलैला आहे.
स़पूर्ण महाराष्ट्रात जिल्हाबंदी आणि नाकाबंदी असताना प्रशासन एकीकडे डोळ्यात तेल घालून काम करत असताना ग्रीन झोन मधे असलेली शहरे अशा बिनकामे रिकामटेकड्या लोकांच्या बेजबाबदार आणि फाजील वागण्यामुळे बघता बघता कोरोनाच्या रेड झोन मधे आली आहेत.
अजूनही वेळ आहे अतिशय गरजेशिवाय घराबाहेर पडून आपले, आपल्या कुटुंबाचे आणि समाजातील इतरांचे जीवन कुणी ही धोक्यात घालू नये.
इतर देशाच्या मानाने बाधित आणि मृतांचा आकडा कमी आहे म्हणून तर भारतात महाराष्ट्र, केरळ व्यतिरिक्त इतर ठिकाणी तपासण्या अधिक कडक आणि काटेकोरपणे होणे अत्यंत गरजेचे वाटते. लॉकडाऊन मागे घेण्यात आले तरी वा सुरूच ठेवले तरी प्रत्येकाने आज क़ोरना विषाणुची भीती झटकायची आहे. आज ही जगभरात एचआयवी, कॅन्सर, क्षय आदी अनेक असाध्य रोगांवर उपचार घेत अनेक जण जीवन आनंदात जगत आहेत. त्याप्रमाणेच आज एक ठोस लस/औषध सापडेपर्यंत कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांनी ही उपचार घेणे आणि दीर्घायुष्य जगणे क्रमप्राप्त आहे. कदाचित इतर अनेक रोगांप्रमाणे हा देखील आपले अस्तित्व टिकवून राहीलही.पण, अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वागत तज्ञांकडन वेळोवेळी देण्यात येतात त्या सूचनांचे पालन करत त्याला पळवून लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावे लागणार आहेत.
🔷  सर्वांनीनिदान पुढील दोन वर्षे तरी विदेश प्रवास टाळावे.
🔷  बाहेररीलखाद्य पदार्थ खाऊ नयेत.
🔷 अनावश्यक अधिक संख्येने होणा-या परंत आपल्याला टाळता येण्याजोगे समारंभात
जाव नये.
🔷  घरातनबाहेर पडताना तोंड आणि नाकावर मास्क असणे हे आता अंगावर कपडे घालण्या इतपत गरजेचे आहे असे समजून वागावे.
🔷  सॅनिटायझरचावापर अवश्य करावा
स्वत: गर्दी जमवायची ही नाही आणि आपण गर्दीत जायचे ही नाही याचे कटाक्षाने पालन करावे.
🔷  जीवनअतिशय सुंदर आहे हे एक उमगलेले वास्तव आहे.ते मजेत जगायचे आहे.
घरी रहा ! सुरक्षित रहा !! आनंदी रहा !!!

✍🏽 विठ्ठलराव वठारे, अध्यक्ष
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच सोलापूर

One Reply to “◼️लॉकडाऊन उठेल पण…जबाबदारीचे काय ?”

 1. आदरणीय संपादक
  चंद्रपूर सप्तरंग नमस्कार !
  प्रासंगिक लघु लेख मी रविवार परवणीच्या बेतानेच पाठविलो होतो आपण तो त्वरीत लावल्याबद्दल आपला आभारी आहे
  असेच सहकार्य दोन्ही बाजूंनी राखत चालू या
  आभारी आहे
  विठ्ठलराव वठारे
  सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *