लॉकडाऊन होताच प्रेयसीने प्रियकराला तब्बल एक महिना घरात लपवले होते मात्र असे फुटले बिंग ?

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

भंडारा,( २५ जून ):

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्याने प्रेमीयुगुलांच्या गाठीभेटी थांबल्या आहेत. त्यांना सध्या विरहाचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र तरीदेखील चोरून लपून भेटीगाठी करण्यासाठी काही प्रेमवीर कोणतीही रिस्क घेण्यास तयार आहेत .अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे . हा प्रियकर भलताच धाडसी निघाला आणि प्रेयसीसाठी चक्क पुण्याहून ट्रकने प्रवास करून तिच्या घरी पोहचला आणि चक्क महिनाभर त्याने तिच्या घरात मुक्काम केला मात्र सहज फेरफटका मारायला बाहेर पडला आणि पकडला गेला.

प्रेयसी ही भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील असून प्रियकर हा पुण्याचा आहे .  मुलीचे आई आणि वडील देखील पुण्यातच असून प्रेयसी १२ वी ला आहे . मात्र ह्या मुलीचे आजी आणि आजोबा वयस्कर असल्याने ते गावीच राहतात . त्यांची देखभाल करण्यासाठी ही मुलगी गावीच राहते . मात्र काही दिवसापूर्वी ती आपल्या आईवडिलांकडे पुण्याला गेली होती . पुण्यात राहताना तिचे (भोसरी) पुणे येथील लहू नावाच्या 22 वर्षीय तरुणाशी सूत जुळले. पुढे लॉकडाऊन झाल्याने मुलगी गावी परतली मात्र तिच्या प्रियकराला तिचा विरह सहन होत नव्हता . प्रेयसीच्या आजोबाला अर्धांगवायूचा आजार आहे तर आजी बाजारात भाजीपाला विकते. त्यांच्या देखभालीसाठी ही युवती आजी आजोबांच्या सोबत राहते .

नवीन नवीन प्रेम जमले मात्र अचानक लॉकडाउन झाल्याने आपल्या प्रेयसीच्या भेटीसाठी आतुरलेला पुणे येथील तरुण मिळेल त्या साधनाने दरबदर भटकत मोहाडीत पोहोचला. लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्‍यक साहित्याची वाहतूक करणाऱ्या साधनांना प्रवासाची मुभा होती. त्यामुळे वेगवेगळ्या ट्रकने प्रवास करून तो प्रेयसीच्या घरी दाखल झाला.

इतक्या लांबून आपला प्रियकर आपल्याला भेटायला आला म्हटल्यावर तिच्याही आनंदाला प्रेमाचे भरते आले. घरच्यापासून म्हणजे आजी आणि आजोबांपासून त्याला लपवून ठेवण्यासाठी तिने कौलारू घराच्या छतावर त्याची तात्पुरती राहण्याची सोय केली. वेळ मिळेल तेव्हा या दोघांचे प्रेम बहरू लागले. आजारी असलेले आजोबा खाटेवर आणि आजी व्यवसायानिमित्त बाजारात असल्याने परका व्यक्ती आपल्या घरात राहत आहे हे त्यांच्या देखील लक्षात आले नाही .

असे लपून छपून राहून त्याला देखील एके दिवशी कंटाळा आता आणि सहज पाय मोकळे करायचे म्हणून तो शनिवारी (ता. 20) ला बाहेर पडला . परिसराचा जास्त अंदाज नसल्याने तो प्रतिबंधित क्षेत्रात गेला . रस्त्यावर नाकाबंदी असल्याने पोलिसांनी त्याला हटकले मात्र बोली भाषा वेगळी असल्याचे पोलिसांच्या लगेच लक्षात आले आणि तो युवक त त प प करू लागला आणि त्याचे बिंग फुटले. प्रेयसीसाठी पुणे सोडून आलेल्या पुणेरी प्रेमवीराची सध्या विलगीकरण कक्षात रवानगी केली असून सदर प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *