शिक्षणाचा अधिकार अंतर्गत मेसेज आल्यावरच पालकांनी शाळेला संपर्क करावा

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर, दि. 27 जून: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम (12) (1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शैक्षणिक वर्ष सन 2020-21 या वर्षासाठी आर. टी. ई. अंतर्गत टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून दि. 17 मार्च 2020 रोजी लॉटरी काढण्यात आली आहे. जिल्ह्यात पात्र शाळा 197 असून 1 हजार 807 जागांकरीता 4हजार 414 अर्ज प्राप्त झाले. सदर लॉटरी व्दारे 1 हजार 742 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच प्रतिक्षा यादी जाहिर केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊन मुळे पुढील प्रवेश प्रक्रीयेचे कामकाज झालेले नाही, शैक्षणिक वर्ष सन 2020-21 साठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे.शिक्षणाचा अधिकार अंतर्गत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी निवड झाल्याचा क्रमांक येईल. क्रमांक आल्यावरच आपण शाळेत जाऊन कागदपत्रांसह पडताळणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे-जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करुन व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येत आहेत.

◼️पालकांनी करावयाची कार्यवाही:

शाळेचा प्रवेशाबाबत मेसेज आल्यानंतर त्या दिनांकास सर्व मूळ आवश्यक कागदपत्रे व एक छायांकित प्रत घेऊन शाळेत उपस्थित राहावे. कागदपत्राच्या पडताळणीस अधीन राहून तात्पुरता प्रवेश घ्यावा. तसेच हमीपत्र शाळेला द्यावे.

शाळेने दिलेल्या दिनांकास उपस्थित राहता येणे शक्य नसल्यास, शाळेला तसे कळविण्यात यावे व पुढील दिनांकाची मागणी करावी.शाळेच्या मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर बालकांचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करावी. आरटीई पोर्टलवर पालकांसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. पडताळणी समितीस कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास व आरटीई पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास हमी पत्रातील अटीप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

शाळेच्या प्रवेशाबाबत मेसेज,फोन, ऑनलाईन पोर्टल वर प्रवेशाचा दिनांक दिसून आल्यास त्याच दिनांकास जावे.तोपर्यंत शाळेत अथवा पडताळणी केंद्रावर गर्दी करू नये.संबंधित शाळा आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावण्याकरीता तारीख टाकेल त्याप्रमाणे पालकांना एसएमएस जातील.शाळेस पालकांनी मुळ कागदपत्रे व एक छायांकीत प्रत दयावयाची आहे.तसेच हमी पत्र भरून द्यावयाचे आहे. काही पालक मुळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर झाले असल्याने दिलेल्या तारखेस पालक आले नाही तर त्यांना पुढची तारीख देण्यात येईल. तसा एसएमएस त्यांना जाईल दुसऱ्यांदा दिलेल्या तारखेला उपस्थित न राहील्यास तिसऱ्यांदा तारीख देण्यात येईल अशा प्रकारे पालकांना तीन वेळा संधी देण्यात येईल. अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *