◼️ काव्यरंग :- जगता जगता… ✍️ कवी लोकराम शेंडे, बुट्टीबोरी, नागपूर

||•|| जगता जगता ||•||
“””””””””””””””””””'””””””””””
मरणाचे भयपण सरले, कंटाळुन जगता जगता…
मी घोट व्यथेचे प्यालो, पिरगाळुन जगता जगता…

आसवेच रुसली होती, मी रडलो जेव्हा जेव्हा
डोळ्यास पाहिले नाही, पडताळुन जगता जगता…

रे फुला! गंधकोषाचे, तुज दान मागणे नाही
जखमांचे गंध मिरविले, गंधाळुन जगता जगता…

आरती कराया गेलो, घरट्याच्या सांद्र महाली
जळले अन् घरपण गेले, ओवाळुन जगता जगता…

अंधा-या असतिल बहुधा, त्या ध्येयपथाच्या वाटा
मी क्षितिजापार निघालो, तेजाळुन जगता जगता…

द्यावे की नाही द्यावे, संदर्भ तुझ्या शपथांचे
स्वप्नांचे खंदक झाले, कुरवाळुन जगता जगता…

मी पर्वा केली कोठे? गुलजार मधूचंद्राची
रात्रीला दिवस बिलगले, तुज टाळुन जगता जगता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *