धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठीच्या गृहनिर्माण योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना : ना.विजय वडेट्टीवार

धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठीच्या गृहनिर्माण योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना : ना.विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 10 जुलै : मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी ज्यांच्या राज्यकारभाराचे नाव नोंदले आहे. अशा दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव भटक्या ‘क’ जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला देण्याची घोषणा राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण विकास, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या व धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून यापुढे ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना म्हणून संबोधण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपूर येथे एका बैठकीत यांनी ही माहिती दिली.

धनगर समाजाच्या सर्व मागण्यांसंदर्भात राज्यातील शासन अतिशय सकारात्मक आहे. यासंदर्भात या समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या व विचारवंतांच्या शासन संपर्कात आहे. योजनांमधून इतर मागासवर्गीय समाजातील सर्व महामानवांचे कार्य लोकांपर्यंत जावे. नव्या पिढीला जुन्या महान व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कार्याचा इतिहास कळावा. यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना हे नामकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यांमध्ये धनगर समाजाचे अस्तित्व आहे. विदर्भ, मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण सगळ्याच भागात रहिवास असणाऱ्या या समाजाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपले मोठे योगदान दिले आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांबाबत सकारात्मकतेने विचार करत आहे.

इतर मागास व बहुजन समाजातील सर्व बारा बलुतेदार यांच्या संदर्भातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपला प्रयत्न चालू असून या समाजातील नागरिकांच्या हितासोबतच या समाजाच्या महामानवांचा देखील यथोचित सन्मान करण्याकडे आपला कल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातूनच या योजनेला हे नाव देण्याची कल्पना आपल्याला सूचली.

कोरोना संसर्ग काळामध्ये बहुजन समाजाच्या, ओबीसींच्या अनेक योजना व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये व्यत्यय आला आहे. मात्र यातून लवकरच बाहेर पडून बहुजन समाजातील सर्व प्रलंबित योजना व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष दानशूर कर्तुत्वान सुधारणावादी कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्या युद्धनिपुण, अत्यंत मुत्सद्दी, न्यायप्रिय होत्या. त्यांनी अनेक घाट, विहिरी, मंदिर,धर्मशाळा यांची संपूर्ण भारतभर उभारणी केली आहे. त्या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशात ख्यातीप्राप्त दानशूर व्यक्ती होत्या. सर्वधर्मसमभावाची जपणूक करत स्त्रियांचा मान सन्मान वाढविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. त्यांनी वस्त्रोद्योग, कुटीर उद्योगाला चालना दिली. त्यामुळे धनगर समाजासाठी असणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेला हे नाव देण्यात आले आहे. धनगर समाजातील प्रत्येक लाभार्थ्याला याचा लाभ व्हावा. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही, त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

धनगर समाजातील किमान दहा हजार लाभार्थ्यांना ही घरे देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जारी केला आहे. गेल्या वर्षी 30 जुलै रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. 2019 -20 या आर्थिक वर्षासाठी दीडशे कोटी निधीस मान्यता देण्यात आली होती. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी वैयक्तिक घरकुलासाठी असलेले सर्व शासन निर्णय तसेच याबाबत शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले सर्व निर्णय, अटी-शर्ती या योजनेसाठी लागू राहणार आहे. लाभार्थी निवडीचे अधिकार यासंदर्भातील समितीस राहील. वैयक्तिक लाभार्थी निवडीचे अधिकार या योजनेत जिल्हाधिकाऱ्यांना आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *