स्वयंरोजगारासाठी कौशल्य महत्वपूर्ण : सुशील बुजाडे

स्वयंरोजगारासाठी कौशल्य महत्वपूर्ण : सुशील बुजाडे

रोजगार विषयी मार्गदर्शन वेबिनारचा समारोपीय कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 17 जुलै: स्वयंरोजगार स्थापन करण्यासाठी अथवा रोजगार मिळण्यासाठी कौशल्य असणारा युवक-युवती कधीही नोकरीविना अथवा कामाविना राहत नाही. असे मत 17 जुलै रोजी रोजगार विषयी वेबीनारद्वारे युवक-युवतींना मार्गदर्शनात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे यांनी व्यक्त केले. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राअंतर्गत 15 जुलै 17 जुलै दरम्यान स्पर्धा परीक्षा व रोजगार विषयक मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. 17 जुलै रोजी मार्गदर्शन वेबीनारचा समारोप होता.

आयटीआय अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत युवक-युवतींना अनेक कौशल्यावर आधारित तसेच उद्योगावर आधारित शिक्षण दिल्या जाते. या शिक्षणाचा युवक-युवतींना स्वयंरोजगार स्थापन करण्यासाठी अथवा रोजगार मिळण्यासाठी निश्चितच फायदा होतो. याविषयीचे मार्गदर्शन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे यांनी जिल्ह्यातील युवक-युवतींना वेबिनारद्वारे केले. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील युवक युवतींचा उत्तम प्रतिसाद यावेळी दिसून आला.

यावेळी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी मार्गदर्शन वेबिनारचा समारोप करतांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे देण्यात येणारे विविध अभ्यासक्रमाचा लाभ जिल्ह्यातील युवक-युवतींनी घ्यावा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारचे ऑनलाइन वेबिनारद्वारे शिक्षण घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *