लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमीत्‍त घोषीत 100 कोटी रू. निधी त्‍वरीत द्यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमीत्‍त घोषीत 100 कोटी रू. निधी त्‍वरीत द्यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

◼️ मातंग समाज बांधवांच्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी सर्वशक्‍तीनिशी प्रयत्‍न करणार

◼️ लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या पुण्‍यतिथीनिमीत्‍त आदरांजली सभा संपन्‍न

चंद्रपूर,(१८ जुलै):- शाहीर साहित्‍यरत्‍न अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमीत्‍त 100 कोटी रूपयांचा निधी मी अर्थमंत्री असताना जाहीर केला होता. त्‍याचप्रमाणे अण्‍णा भाऊंच्‍या प्रेरणादायी स्‍मृती जपण्‍यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून टपाल तिकीटाचे प्रकाशनही आम्‍ही केले होते. अण्‍णा भाऊ साठे वंचितांचा आवाज होते. ‘ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है’ असे ठासून सांगणा-या अण्‍णा भाऊंनी सभोवताली पसरलेले अफाट दुःख, दारिद्रय, अज्ञान याबाबत चिंतन करून ते साहित्‍यात प्रतिबिंबीत केले. ‘पृथ्‍वी शेषनागाच्‍या मस्‍तकावर नसून श्रमीकाच्‍या तळहातावर आहे’ असे सांगणा-या अण्‍णा भाऊंनी मानवतावाद जपत साहित्‍य सेवा केली व शोषीत, पिडीतांच्‍या कल्‍याणासाठी आपले अवघे आयुष्‍य खर्ची घातले. पराक्रमी, सात्विक असलेल्‍या मातंग समाजाच्‍या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी लोकप्रतिनिधी म्‍हणून मी कायम माझे योगदान देईल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 18 जुलै रोजी लोकशाहीर साहित्‍यरत्‍न अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या पुण्‍यतिथी दिनानिमीत्‍त वेबेक्‍स द्वारे आयोजित आदरांजली सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. भाजपाचे महाराष्‍ट्र प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी या आदरांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, 2001 मध्‍ये मातंग समाजाच्‍या विविध मागण्‍यांसाठी मुंबईच्‍या आझाद मैदानात आंदोलन सुरू होते. आमदार म्‍हणून मी त्‍याठिकाणी भेट दिली. मातंग समाजाच्‍या विविध मागण्‍यांबाबत मी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. माझ्रया मागणीच्‍या अनुषंगाने क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज आयोगाची स्‍थापना सरकारने केली. आयोगाने सरकारला मागण्‍यांबाबत काही शिफारशी केल्‍या. त्‍यातील काही मागण्‍यांवर निर्णयही झाले. आजही मातंग समाजाच्‍या मागण्‍यांची सोडवणूक करण्‍यासाठी लोकप्रतिनिधी म्‍हणून विधानसभेच्‍या माध्‍यमातुन विविध संसदीय आयुधांचा वापर करत संघर्ष करेन. लोकशाहीर साहित्‍यरत्‍न अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमीत्‍त जो 100 कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्‍पात जाहीर करण्‍यात आला आहे तो राज्‍य सरकारने त्‍वरीत वितरीत करावा यासाठी मी राज्‍य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. वंचित, शोषीतांच्‍या कल्‍याणासाठी आपले अवघे आयुष्‍य खर्ची घालणा-या अण्‍णा भाऊंचा यशोचित सन्‍मान व्‍हावा यासाठी मी प्रयत्‍नांची शर्थ करेन. अण्‍णा भाऊंना भारतरत्‍न या उपाधीने सन्‍मानित करावे, अण्‍णा भाऊंचे स्‍मारक, क्रांतीवीर लहूजी साळवे यांचे स्‍मारक आदी मागण्‍यांचा मी लोकप्रतिनिधी म्‍हणून पाठपुरावा करेन अशी ग्‍वाही त्‍यांनी यावेळी बोलताना दिली.

आदरांजली सभेचे प्रास्‍ताविक भाजपाचे महाराष्‍ट्र प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी केले. सभेला आ. सुनिल कांबळे, आ. नामदेव ससाणे, मधुकरकराव कांबळे, माजी मंत्री लक्ष्‍मणराव ढोबळे, नितीन दिनकर आदींसह राज्‍यातील मातंग समाजातील मान्‍यवरांची उपस्थिती होती. ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *