गोसीखुर्दचे पाणी आजपासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ; जिल्ह्यातील धान उत्पादकांना दिलासा

गोसीखुर्दचे पाणी आजपासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ; जिल्ह्यातील धान उत्पादकांना दिलासा

◼️ पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार

🔻 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर, दि. 19 जुलै : पावसाळा सुरू होऊनही धान उत्पादकांना रोवणीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज असल्यामुळे राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहे. पुढील काही दिवसात हे पाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गोसीखुर्द प्रकल्पातून पावसाळ्याच्या तोंडावर पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. यासंदर्भात गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्याला त्यांनी निर्देश दिले होते. स्वतः धान उत्पादक असलेले पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी आवश्यक पाणी नसल्यामुळे रोवणीला विलंब होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना गोसीखुर्द प्रकल्पाचा लाभ मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठीचे नियोजन सध्या पालकमंत्री करीत आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून ज्यावेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस शेतकऱ्यांना तातडीने पाणी मिळाले पाहिजे. पाण्याचे वाटप योग्य प्रमाणात व विविध भागात समानतेने झाले पाहिजे, यासाठी त्यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागपूर निवासी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी गोसीखुर्द मधील पाणी रोवणीच्या काळातच शेतकऱ्यांना मिळावे, याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल व अन्य तालुक्यांमध्ये या निर्णयाचा फायदा होणार आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतामध्ये येणाऱ्या पाण्याचा वापर करत मोठ्याप्रमाणात रोवणी कामासाठी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना संसर्ग काळामध्ये मोठ्या प्रमाणात धान उत्पादनाची गरज असून शेतकऱ्यांनी पुढील काळातील गरज लक्षात घेऊन धान उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. नुकतेच त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना आवाहन करीत मोठ्या प्रमाणात धान उत्पादन करण्याचे सुचविले होते. राज्यासह देशाला मोठ्या प्रमाणात पुढील काळामध्ये खाद्यान्नाची गरज असून यासाठी शेतकऱ्यांनी या काळात आवश्यकतेनुसार पीक पॅटर्न निवडावा. नगदी पिकांपेक्षा खाद्यान्‍नाला प्राधान्य द्यावे. धान उत्पादनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना संसर्ग काळात अनेक ठिकाणी टाळेबंदी असली तरी शेतकऱ्यांना त्यांची कामे करण्यासाठी कोणतीच आडकाठी ठेवण्यात आली नसून मुबलक प्रमाणात बियाणे व खतांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आवश्‍यक असणाऱ्या युरियाची मुबलक प्रमाणात उपलब्धता व्हावी, यासाठी देखील नियोजन करण्यात आले असून राज्य शासनाला या संदर्भात स्पष्ट निर्देश केले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांनी युरिया वेळेत उपलब्ध होण्याबाबत मागणी केली होती . त्यानंतर मुंबई येथे वरिष्ठ स्तरावर बोलून पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी यासंदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला आवश्यक असणारा नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *