◼️ लघुकथा :- भाताची लावणी….

🔴  भाताची लावणी……

( संग्रहित छायाचित्र)

आषाढाला नुकतीच सुरवात झाली होती. मेघ गर्जनेसह पावसाला सुरवात झाली. नदी – नाले तुडुंब भरून वाहू लागली. तशी भिमाच्या चेह-यावर एक विलक्षण झळाळी जाणवतं होती. वीस -पंचवीस दिवसापूर्वी टाकलेली भाताची रोपे आता हळूहळू लावणीयोग्य होत होती. सारी धरती कशी हिरवीकंच दिसत होती. द्विकल्पात वसलेले छोटेसे गावं दोन्ही बाजूनी ओसंडून वाहणा-या नदिमुळे दिसेनासे झाले होते.

चार -पाच दिवस अहोरात्र धो – धो पडणारा पाऊस आता सा-या गावक-यांना नकोसा झाला होता. घरात पाणी, दारात पाणी, सा-या शेतशिवारात पाणीच पाणी. भिमा आता पाऊस थांबविण्याकरिता देवाला विनती करू लागला. भाताची रोपे आता लावणीयोग्य झाली होती पण त्याचे शेत ओढ्यापल्याड होते. ओसंडून वाहणा-या ओढ्यामुळे त्याला ओढ्यापल्याड जाता येईना. आता दोन दिवस झाले पाऊस पडायचा थांबला ओढ्याचा पूरही थोड्या प्रमाणात कमी झाला. शेवटी भिमाने सुस्कारा सोडला नी पत्नी रखमीला दुस-या दिवशी भाताची लावणी करायला जायचे सांगत खाटेवर पडला.

पण त्याला झोप येईना, तो रात्रभर विचारात मगशुल झाला. यावर्षी भरपूर पाऊस पडला आहे. भाताचे भरघोस पिक होणार, घेतलेले सारे कर्ज फिटणार. मोठा मुलगा आता दहावीला आहे. त्याच्या शिक्षणाचे आबाळ होता कामा नये, खूप शिकविणार. माझ्या आयुष्याची जी माती झाली आहे. मी जे भोगले, ते भोग माझ्या मुलाच्या वाट्याला नाही येवू देणार. तेवढ्यात पावसाचे थेंब कौलातून भिमाच्या अंगावर पडले. त्याच्या विचाराची तंद्री तुटली. तो स्वत:वरच प्रचंड चिडला. हे घर कसले ? झोपडीच म्हणा याला ? सकाळी सुर्यनारायण तुटलेल्या असंख्य कौलातून घरात शिरत गरिबीचे दर्शन घडवितो बाबा ! म्हणत झोपी गेला.

दिवस उजाळला तसा भिमा लगबगीने कामाला लागला. रखमीने देखील भराभर न्याहारी उरकत तयारी केली. कापडाच्या बोजग्यात भाकरी बांधत, डोक्यावर शिदोरीची टोपली घेत भिमाच्यी मागे मागे जावू लागली. दोघेही ओढ्याजवळ आले. पूर ओसरले तरी पाण्याचा प्रवाह कमी झालेला नव्हता. दुथडी भरून ओढा खळखळ वाहत होता. बघून रखमीच्या काळजाचे पाणी पाणी झाले. ती भिमाला परत जाण्याचे सांगू लागली. भिमा तसा धीर देऊ लागला. काही होणार नाही, थोडा जास्त प्रवाह आहे. करू पार म्हणत धोतर गुडघ्यार्यंत गुंडाळला. रखमीचा हात पकडत ओढ्यात शिरला. पाण्याचा अंदाज घेत कसेबसे ओढ्याबाहेर पडले. दोघांना दम लागला होता. धापा टाकत शेतावर गेले नी भात लावणीला सुरवात केली.

( संग्रहित छायाचित्र )

संध्याकाळचे चार वाजले होते. सारे ढग काळेकुट्ट झाले. ढगांचा गडगडाट नी विजेचा कडकडाट झाला. सोसाट्याचा वारा सुटला नी तुफान पाऊस बरसायला सुरवात झाली. पावसाचे टपोरे थेंब डोळ्यावर पडले की अंधुकसे दिसायला होत होते. आजूबाजूच्या सा-या मेरक-यांनी भाताची लावणी थांबविली नी घराच्या दिशेने निघाले. रखमी, भिमा देखील येऊ लागले. ओढ्याजवळ बघतात तर सकाळपेक्षा जास्त ओढा ओसंडून वाहत होता. भिमाने सगळ्यांना एकमेकांचे हात पकडत साखळी तयार करत ओढा पार करायचे सुचविले.

सगळे एकमेकांचे हात पकडत ओढ्यात शिरले, जसजसे पूढे जाऊ लागले पाणी देखील वाढू लागला. सुरवातीला गुडघ्यापर्यंत असलेला पाण्याचा प्रवाह कमरेपर्यंत झाला. रखमी भितीने ओरडू लागली, तसा भिमा तीच्यावर खेकसला, हात सोडू नको सांगू लागला. हळूहळू पाणी छातीपर्यंत वाढत गेला, तसा एक माणूस काठावर पोचला. एकेकाला हात देत काठावर ओढू लागला. आता पाणी गळ्यापर्यंत पोचला. रखमी गटांगळ्या खाऊ लागली. भिमाने तीला पुढे केले नी काठावरच्या माणसाचा हात पकडायला सांगीतले. त्या माणसाने मोठ्या शिताफीने रखमीचा हात पकडत काठावर खेचले. आता फक्त भिमा शिल्लक होता. त्याने आपला हात पूढे केला नी तेवढ्यात जोरात लाट आली. हाताची पकड सैल झाली. भिमा प्रवाहाबरोबर वाहून गेला.  रखमीने मोठ्याने हंबरडा फोडला.

( संग्रहित छायाचित्र )

भाताची लावणी करायला गेलेल्या भिमाच्या आयुष्याची लावणी झाली होती.◼️

◼️✍️ लेखक :-  किशोर गेडाम

◼️( टीप:- कथेतील सर्व छायाचित्रे हे संग्रहित आहे.)

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *