◼️ काव्यरंग :- श्रावण….

|| श्रावण…एक गझल ||

असे का वैर माझ्यासी ? मला का टाळतो श्रावण ?
तिच्या आभाळदेहाला, बरे कुरवाळतो श्रावण !

सखीला खास आवडतो, सरींचा इंद्रधनु गजरा…
तनूच्या सप्तरंगाने, तिला कवटाळतो श्रावण !

तिथे प्रणयात मश्गुल अन् , इथे परवड हरेकांची…
दयेचा अर्ज धरणीचा, तडक फेटाळतो श्रावण !

ढगांची बातमी आली, नशा संगीन झाल्याची…
सरींच्या नृत्य तालावर, दमुन ठेचाळतो श्रावण !

विजांचा खेळ नाही हा, खरा उन्माद गडगडणे…
दरारा राखण्या तितुका, उगा किंचाळतो श्रावण !

कधी तोळा कधी मासा, कुठे धारा कुठे वारा…
प्रथा छंदिष्ट असण्याची, पुरेपुर पाळतो श्रावण !

म्हणाला रे कसा आहे? तुझा शृंगार शेरांचा…
गझलचे पान एकांती, खुबीने चाळतो श्रावण !

◼️✍️ लोकराम शेंडे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *