कारगील विजय दिवस : कारगील युद्धातील काही साहसी आणि रंजक गोष्टी

कारगील विजय दिवस : कारगील युद्धातील काही साहसी आणि रंजक गोष्टी

या घटनेला 21 वर्षे पूर्ण होत आहेत.  त्यामुळे या ‘विजय दिवस’ दिनी कारगिल युद्धातील काही साहसी आणि रंजक गोष्टी या लेखात पाहणार आहोत.
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले. यापैकी 1962 मध्ये चीनसोबत तर, 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तान सोबत युद्ध झाले. मात्र ही  तीन पारंपारिक युद्धे सोडल्यास पाकिस्तानने देशाच्या फाळणीनंतर 1947 मध्ये काश्मीरवर कब्जा मिळवण्याच्या हेतूने केलेली घुसखोरी, त्यानंतर 1984 मध्ये सियाचीन आणि 1999 ला कारगिलच्या क्षेत्रात केलेली घुसखोरी हे देखील एकप्रकारचे युद्धच भारतावर लादले. पाकिस्तानने 1947 मध्ये काश्मीर खोऱ्यात केलेली घुसखोरी भारताने मोडून काढली, तर एप्रिल 1984 मध्ये ‘ओपरेशन मेघदूत’ द्वारे भारतीय सैन्याने सियाचीनच्या हिमखंडावर वर्चस्व मिळवत पाकिस्तानच्या योजनेवर पाणी फिरवले. यासोबतच 1999 मध्ये भारतीय सैन्याने कारगिलमध्ये पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानकडून कारगिल मध्ये झालेल्या आक्रमणाविरोधात करण्यात आलेली कारवाई 26 जुलै 1999 रोजी थांबली. यामध्ये अनेक जवानांना वीरमरण पत्करावे लागले. तर कित्येक सैनिक जखमी झाले. आज या घटनेला 21 वर्षे पूर्ण होत आहेत.  त्यामुळे या ‘विजय दिवस’ दिनी कारगिल युद्धातील काही साहसी आणि रंजक गोष्टी या लेखात पाहणार आहोत.

1. कारगिल हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मर्यादित स्वरूपाचे युद्ध होते. या दोन्ही देशांनी 1998 मध्ये अणुचाचण्या केल्यानंतर पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे राहत आव्हान दिले होते. या युद्धाच्या दोनच महिन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पावले उचलत ‘लाहोर जाहीरनाम्यावर’ सह्या केल्या होत्या. मात्र तरीदेखील पाकिस्तानने नेहमीप्रमाणे धोका दिला. आणि युद्ध घडलं.

2. 1999 मधील मे महिन्याच्या सुरवातीला बटालिक पर्वतरांगांच्या जवळील गारखून गावातील रहिवासी असलेल्या ताशी नामग्याल या मेंढपाळ करणाऱ्या रहिवाशाने भारतीय सैन्याला अनोळखी लोक दिसल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ८ मे ला भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

3. पाकिस्तानने भारताच्या कारगिल भागात केलेल्या या घुसखोरीत लष्करी सैनिकांना जिहादींच्या वेषात धाडण्यात आले होते. भारताची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर देशांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानने हा डाव खेळला होता. स्वातंत्र्य योद्धे जिहादी लोकांनी भारताच्या भागावर कब्जा केला असून, पाकिस्तानचा अथवा पाकिस्तानी लष्कराचा याच्याशी संबंध नसल्याची आरडाओरड पाकिस्तानने केली होती. या डावपेचात सुरवातीला पाकिस्तानला यश देखील मिळाले. मात्र त्यानंतर भारताच्या बाजूने वेगाने कारवाई चालू झाल्यावर आणि पाकिस्तानच्या बाजूने मनुष्यहानीस सुरवात झाल्यावर या गोष्टीवर पाकिस्तानला फार काळ पडदा टिकवता आला नाही.

4. यानंतर 26 आणि 29 मे 1999 रोजी भारतीय गुप्तचर संस्थेने पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमधील दूरध्वनी संभाषण पकडले होते. या दोन अधिकाऱ्यांमधील एकजण चीनची राजधानी बीजिंग मधून बोलत होता. तर, एकजण इस्लामाबाद येथील लष्करी मुख्यालयातून. पकडल्या गेलेल्या या दूरध्वनी  संभाषणावरून कारगिल मधील घुसखोरीची कृती ही जिहादी गटाची नसून, पाकिस्तानच्या लष्कराचीच असल्याचे अधोरेखित झाले. आणि महत्वाचे म्हणजे या ध्वनिफितीत रेकॉर्ड झालेले संभाषण हे पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमधीलच नव्हे तर, अतिवरिष्ठ पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ मोहम्मद अझीझ खान यांच्यातील होते. त्यामुळे पाकिस्तानकडून भारतावर सरळ-सरळ आक्रमण झाल्याचे उघड झाले.

5. पाकिस्तानच्या या कृत्यावर जोरदार कारवाई करण्यासाठी भारताने हालचाली सुरु केल्या. मात्र नुकतीच अणुचाचणी घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरे जाण्याची शक्यता व पुन्हा अण्वस्त्र युद्धाची भीती यामुळे सीमारेषा न ओलांडता संयमाने प्रत्युत्तर देण्याचे भारताकडून ठरवण्यात आले. मर्यादित युद्धाच्या या निर्णयामुळे जागतिक पातळीवर जबाबदार अण्वस्त्रसज्ज देश म्हणून भारताची छबी निर्माण झाली. पण, युद्धाच्या दरम्यान भारतीय नौदलाने जबरदस्त व्यूहरचना आखत पाकिस्तानला घेरल्यामुळे मोठ्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता तयार झाली होती. त्यामुळे भारतीय नौदलाचा चांगला धसकाच पाकिस्तानने घेत, आखातातून येणाऱ्या तेलवाहू जहाजांना संरक्षण देण्यास चालू केले होते.

6. पाकिस्तानने बळकावलेला भारतीय भूभाग सैन्याने अतिशय साहसपूर्ण आणि दृढ निश्चयाने 26 जुलै पर्यंत परत मिळवला. कारगिलच्या या युद्धात पाकिस्तानने आपल्याच सैनिकांचा मृतदेह स्वीकारण्यास नाकारल्यामुळे, या पाकिस्तानी सैनिकांचा अंत्यविधी भारताकडून करण्यात आला होता. तर युद्धसमाप्तीच्या काही काळानंतर पाकिस्तानी अधिकारी कॅप्टन तैमूर मलिकचा मुतदेह परत करण्याची विनंती, त्याच्या लंडनमधील नातेवाईकांकडून करण्यात आली होती. या विनंतीवर भारताने तैमूर मलिकचा मुतदेह लष्करी सन्मानाने पाकिस्तानकडे सुपूर्द केला होता.

7. कारगिलचे हे युद्ध लढताना भारताच्या जवानांना सर्वाधिक मदत जर कोणी केली असेल तर ती म्हणजे बोफोर्स तोफ. 155 एमएम आणि 30 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता असलेल्या या बोफोर्स तोफांनी तोलोलिंग आणि टायगर हिल सारख्या अति उंचावरील लक्ष्यांवर तीन ते चार मिनिटांच्या आत 1200 हून अधिक फैरी झाडल्या. तर संपूर्ण तीन महिन्यांच्या कालावधीत अडीच लाखाहून अधिक गोळ्यांचा मारा बोफोर्सच्या तोफांनी केला होता.

8. युद्धाच्या सुरवातीला आपला हात नसल्याचे सांगणाऱ्या व आपल्याच सैनिकांचे मुतदेह नाकारणाऱ्या पाकिस्तानने युद्ध संपल्यानंतर युद्धातील 90 लष्करी सैनिकांना शौर्यपदक दिले. ज्यामध्ये दोघांना पाकिस्तानचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार, निशान-ई-हैदर देण्यात आला. याशिवाय काही कालावधी नंतर कारगिल युद्ध ही मोठी घोडचूक ठरल्याची कबुली पाकिस्तानच्या दोन पंतप्रधानांनी दिली.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *