अभ्यासक्रमाला कात्री ! पहिली ते बारावीच्या प्रत्येक विषयातील २५ टक्के भाग वगळला !

अभ्यासक्रमाला कात्री !
पहिली ते बारावीच्या प्रत्येक विषयातील २५ टक्के भाग वगळला !

मुंबई : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या शैक्षणिक वर्षांसाठी पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम २५ टक्क्य़ांनी कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला. अभ्यासक्रमातील बहुतेक घटक थेट वगळण्याऐवजी विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र, वर्गामध्ये या घटकांचे अध्यापन करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढील शैक्षणिक वर्षांबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन वर्गाचा पर्याय स्वीकारला असला तरी राज्यभरातील सर्व भागांत ऑनलाइन शिक्षण सुरळीत सुरू नाही. प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होणार याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाळल्या जाणाऱ्या शैक्षणिक वेळापत्रकातील जवळपास दीड महिना या संदिग्धतेतच गेला आहे. अध्यापनासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने यंदा शिक्षण विभागाने राज्याचा प्रत्येक इयत्तेचा, प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी केला आहे. यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि ‘आयसीएसई’नेही अभ्यासक्रम कमी केला आहे.

स्वयंअध्ययनावर भर
नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात काही घटकांची पुनरुक्ती होती. आधीच्या वर्गात शिकलेल्या घटकांचा काही प्रमाणात आढावा घेतलेला असतो. आधीच्या इयत्तेत झालेला भाग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापनापूर्वी वाचून येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कमी केलेल्या घटकांचा विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्तरावर अभ्यास करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष अध्यापनासाठी वेळ कमी मिळणार असल्याने हे घटक वर्गात शिकवण्यात येणार नाहीत, मात्र, प्रवेश परीक्षा, पुढील इयत्तेची तयारी अशासाठी महत्त्वाचे असलेले घटक स्वयंअध्ययनासाठी निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, त्यावर परीक्षेत प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. पुस्तकांमध्ये पाठानंतर कृती करून पाहा, डोके चालवा, अवांतर वाचन असे उपक्रम, विषयाशी संबंधित अतिरिक्त माहिती देणाऱ्या चौकटी वगळण्यात आल्या आहेत.

भाषा विषयांतील काही गद्य आणि पद्य पाठ, उपक्रम, कृती पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. मात्र, पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्ये वगळण्यात आलेली नाहीत.

शालेय श्रेणी विषयांसाठी दिलेले उपक्रम, प्रकल्प याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एखादी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आवश्यक असलेली प्रात्यक्षिकेही परिस्थिती आणि उपलब्ध सोयीसुविधा पाहून घेण्यात यावीत, असे स्पष्ट केले आहे.

मराठीच्या पुस्तकातील वादग्रस्त पाठ वगळला

आठवी मराठीच्या पुस्तकातील ‘यदुनाथ थत्ते’ लिखित ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ हा वादग्रस्त ठरलेला पाठ पूर्णपणे वगळण्यात आला आहे. या पाठात भगतसिंग, राजगुरू यांच्याबरोबर कुर्बान हुसेन यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. सुखदेव यांचे नाव हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याचा आक्षेप काही संघटनांनी घेतला होता. त्यावरून नुकताच वाद झाला होता. तो पाठ यंदापुरत्या नव्या रचनेत वगळण्यात आल्याचे दिसत आहे.

सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर पाठपुस्तकांतून कमी करण्यात आलेल्या घटकांचे तपशील www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या संकेतस्थळावर पाहता येतील.

अद्याप शाळा सुरू करणे शक्य झालेले नाही. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. प्राथमिक वर्गासाठीचे २२, माध्यमिक वर्गासाठीचे २० आणि उच्च माध्यमिक वर्गासाठीच्या ५९ अशा १०१ विषयांच्या अभ्यासक्रमांचा भार कमी करण्यात आला आहे.
वर्षां गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *