लेख :- दहावी नापास..विद्यार्थी मनोगत …..

🔴 दहावी नापास..विद्यार्थी मनोगत …..

 दहावीचा निकाल लागला. निकालाची तारीख कळल्या पासूनच मनामध्ये एक रूखरूख चालू होती. आता तर ते शेवटचे काही दिवस खर्या अर्थाने जाता जात नव्हते, पण दिवस कुठे,आणि कोणासाठी थांबणार ते आले आणि निघून गेले. अखेर आज दुपारी निकाल जाहीर झाला, कुठे तरी मनामध्ये वाटत होतं,आपण पास होऊ आणि ह्या शालेय बंधनातून मुक्त होऊ, पण तसं काही घडलं नाही. गणित ,इंग्रजी ह्या दोन विषयांनी माझ्या बद्दल, त्यांच्या विषयचा असलेला प्रामाणीकपणा स्पष्ट निकालपत्रात दाखवला आणि मी चक्क दोन विषयात नापास झालो, …

असं काही नाही की मला ह्या शैक्षणिक वर्षात खुप सारं काम होत. या माझी आर्थीक परस्थिती हालाकिची होती. पालकांनी माझ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं, या गुरूजनांनी माझ्याकडे लक्ष्य दिले नाही. असं काही ही झालं नाही, हे सारं झालं ते माझ्या अंगी असलेल्या कला गुणांनमुळे, चित्रकला विषयातील माझ्या अधिक रसामुळे. भले इयत्ता दहावीला चित्रकला विषय नसला तरी तो माझ्या कडून कधी वेगळा झालाचं नाही. माझं मन कधी पाठ्यपुस्तकातील धड्यांन मध्ये रेंगाळलंच नाही, ना गणिताच्या सुत्रामध्ये अडकलं. सुर्य देखाव्याचे चित्र रंगवता रंगवता कधी मी त्या रंगीत दुनियेत हरवून गेलो, ते माझे मलाच कळले नाही. चित्रकला माझा आवडता विषय असा होऊन गेला की, तो जणू माझ्या जिवनाचा एक अविभाज्य घटकच बनला. त्याचा परिणाम असा झाला की, मी पुढे वर्गात, शाळेत, विभागात, जिल्हात चित्रकला स्पर्धेत बर्याचदा पहिला आलो. विविध कार्यक्रमात, स्पर्धेत मी इयत्ता दहावीपर्यंत खुप यश संपादित केले. मित्र परिवार जवळ पासचे नातेवाईक ह्यांच्या गाड्यांच्या पाट्या बनवणे, रस्तावरचे बोर्ड बणवणे त्याच बरोबर शाळेचे फळे दरवर्षी रंगवने, सुविचार लिहणे, विविध महापुरूषांची हुबेहुब चित्रे शाळेच्या भिंतीवरती रेखाटने हे तर जणू माझ्या डाव्या हातातील खेळच बनला होता. ते आता माझ्या अंगवळणीच पडले होते. रोज काही नवं काढावं हा एकच ध्यास मनात असायचा माझ्या. यातून थोडे फार पैसे ही बक्षीस म्हणूनही देत असत. येवढ्या कमी वयात येवढी चित्र सुब्बता पाहून लोक हैरान होत होते. आई वडिलांना, गुरूजनांना माझी शाळेची प्रगती चांगलीच माहित होती. त्यामुळेच त्यानीही कधी मला हे माझं रेखाटनाचं काम बंद करून, माझ्या शिक्षणावर जास्त दबाव दिला नाही. बहुतेक त्यांना ही कळले असेल की आपला मुलगा भिंतीवर रंग भरून आपल्या चित्राद्वारे भिंतीना बोलायला लावू शकतो, विविध मुद्रा काढून हसायला लावू शकतो, वेगवेगळे भाव रेखाटून रडायला लावू शकतो, पण शिक्षणरूपी गुणपत्र कागदात टक्केवारीचे रंग मात्र नाही भरू शकत हे सत्य त्यांनी बहुतेक पुर्वीच स्विकारले असावे. …….
कोणत्या पालकाला वाटतं नाही, माझ्या पाल्याने चांगल्या मार्सने पास व्हावे, पुढे जावे, अधिक शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवावी. माझ्या ही वाटले असेल, पण त्यांनी वेळीच माझ्यातील एक वेगळा गुण ओळखला. पुढे माझ्यातील चित्रकाराला मगं त्यांनी रोखले नाही, सतत प्रोत्साहन देत राहिले. मुलगा, मुलगी लहान पाळण्यात असतानाच आपल्या मुलीने, मुलाने पुढं काय ह्वायचं हे ठरणणारी पालक मंडळी मात्र आपल्या पाल्याच्या अशा छोट्या मोठ्या यशापयशाने हाताश होतात, पण ते यश सार्यांच्याच नशिबी नसतं. परमेश्वराने जरी सर्वांना सारखी बुद्धी दिली असली तरी, अंगी गुण वेगवेगळे दिले आहेत. जो तो आपआपल्या गुणांच्या दिशेने वाढ घेतो. एखाद्या कलाकाराचं, गुणवंताच नशिब हे कागदाच्या एका मार्कशीटवर अवलंबून नसतं, किती तरी failure आज यशाच्या सर्वेच्य शिखरावर विराजमान आहेत, ते फक्त नी फक्त आपल्या अंगी असलेल्या एका विशिष्ट कला गुणामुळेच ना की मार्कशीट वरच्या टक्के वारीमुळे. आज माझ्या सोबत संपुर्ण महाराष्ट्रात हजारो विद्यार्थी नापास झाले असतील. सार्यांची कारणे ही वेगवेगळी असतील, परस्थिती वेगवेगळी असेल. पण नक्कीच सारे हे काही ना काही गोष्टीत इतरांन पेक्षा वेगळे असतील.
तुमच्या आसपास ही असे विद्यार्थी बरेच असतील त्यांना धीर द्यायला हवा, आधार द्यायला हवा, दाहावी नापास होणे म्हणजे सारे संपले असे नाही. अपयश ही तर यशाची पहिली पायरी आहे. अशा पायर्या जिवनात मनुष्याला खुप चढाव्या, उतराव्या लागतात. जर अशा नापास मुलांना समाज्याने, पालकांनी, मित्रांनी धीर नाही दिला, तर ते पुढे नैराश्याचे शिकार होतात. मनामध्ये एक नकारार्थी न्युनगंड बाळगतात. त्यांना वाटते आपल्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमताच नाही मुळी. ते इतर मुलांशी आपली तुलना करून अधिकच खचू लागतात. असे बरेच काही negative विचार अशा वेळी त्यांच्या मनात खेळू लागतात. स्वःताची स्वःताशीच त्यांची लढाई जणू चालू होते. ह्याने मात्र त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा र्हास होऊ लागतो. त्याकडे दुर्लक्ष होऊ लागतं. माझ्या सारखे सारेच अपयश पचवणारे नसतात, काही खुप भावनीक आणि हळवे असतात. अशा कलाप्रेमींना, उमलत्या कळ्यांना, पडद्या मागच्या कलाकारांना तुमच्या सारख्या थोरा मोठ्यांचे योग्य वेळी मार्गदर्शन लाभले, तर ते त्यांच्या अपयशातही यशाची गुरूकिल्ली शोधतील, आणि जे पदरात पडले आहे ते स्विकारून पुढे आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करतील……◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *