◼️ काव्यरंग :- बाभळी चाकाटा.. ✍️ गणेश बरकडे लिंब.सातारा.

♦️  बाभळी चाकाटा…

बाभळीचा काटा,
रूतला पायात…..
कळ वेदनेची उठली,
कोवळ्या मनात….

रान,उन्हं तापलेलं,
गाव गेला नजरेआड…
इवलेश्या पाठीवर,
काठी, घोगंडीचा भार…

शेळ्या, मेंढ्यांची सोबत,
माळारानी चाले खेळ…
दिस चढता डोईवर,
मिळे दहीभाताची भेळ…

कोल्ह्या, कुत्र्यांचा रात्री,
रोज चाले लपंडाव…
मऊ मातीच्या कुशीत,
दगड, धोंड्यांचे घाव…..

गोवो, गावं नापलं सारं,
दोन पायाचं चाक….
चिमुकल्या पाऊलांना,
प्रश्नं पडती लाख…..

रोज नव्या गावात,
रोज नवी भरते शाळा….
बाप होतो मास्तर,
माय रंगवते फळा…..

शिक्षणाच्या पाटीला,
खुळ्या समजूतीचा
विळखा….
मेंढरा मागून मेंढरू
चालते, ओढून
अंधश्रद्धेचा बुरखा…..

दिस निघून जाता होते,
पायी काट्यांचे कुरूप…..
उमलत्या कळ्यांना,
येत नाही फुलांचे स्वरूप……

************************
◼️✍️ गणेश बरकडे लिंब.सातारा…
**************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *