🔴 विदर्भातउद्यापासून बसरणार वादळी पाऊस ; हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाचा हा इशारा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारासारख्या धानपट्ट्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे. कारण या भागांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे रोवण्याही खोळंबल्या आहेत. रोवण्याची वेळ निघून जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नागपूर : बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे येत्या शनिवारपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे.
हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा येत्या 48 तासांत विदर्भाच्या दिशेने सरकण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या तीव्र प्रभावामुळे विदर्भात शनिवारपासून दोन-तीन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विशेषत: नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये वादळाची दाट शक्यता आहे. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचा हा इशारा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारासारख्या धानपट्ट्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे. कारण या भागांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे रोवण्याही खोळंबल्या आहेत. रोवण्याची वेळ निघून जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी उकाडाही वाढलेला आहे.
मॉन्सूनचे आगमन झाल्यापासून विदर्भात अजूनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. तब्बल सात जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. केवळ वाशीम आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांमध्येच पावसाने सरासरी गाठलेली आहे. अकोला, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांची स्थिती अतिशय नाजूक आहे. तथापि पावसाचे अजूनही दोन महिने शिल्लक असल्यामुळे, तुट भरुन निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.◼️