चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारा माहे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक परिक्षेचा निकाल जाहीर झालेला असून त्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या 8 शासकीय, 20 अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा व 23 शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहांचा निकाल सरासरी अनुक्रमे 90.85 टक्के, 84.88 टक्के व 93.75 टक्के लागलेला आहे.

अतिदुर्गम भागातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा देवई तालुका गोंडपिपरी येथील शाळेचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर मधुन गुणानुक्रमे अनुदानित आश्रमशाळा गिलबीली तालुका बल्लारपूर येथील रोहित वसंत वाचामी या विद्यार्थ्याने 87.40 टक्के गुण संपादीत करुन प्रकल्पात प्रथम स्थान पटकाविले. तसेच अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथील विद्यार्थीनी कु. सोनाली सत्यवान परचाके ही 84 टक्के गुण संपादन करुन मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड, सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) सुनिल बावणे, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) आर. टी. धोटकर, ए. एम.बेलेकर व एस.एल.खडसे, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी डब्ल्यु. के. मडकाम, एस. डी. गेडाम यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले आहे.

विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रमाची सफलता:

आदिवासी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाचे श्रेय विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना असुन आश्रमशाळेतील डिजीटल क्लासरुमचा वापर, रात्रपाळी मार्गदर्शक वर्ग, जादा सराव वर्गाचे आयोजन यामुळे शाळांच्या निकालात गुणवत्तापुर्ण वाढ झाल्याचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी सांगितले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *