लेख :- सपनो की उडान…( डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार) ( मुलाखत आणि शब्दांकन- माधुरी पेठकर)

सपनो की उडान…

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातीला सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर्पयतची मजल गाठता आलीच नसती.
मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.
पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणिशिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.


त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.
पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतर्‍च्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.
एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.
घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.
माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.
आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतर्‍च्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?
छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता.


पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतर्‍च्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुर्‍खं कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.
वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेर्पयत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो.
आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?
जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहे. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.
लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.

◼️  डॉ. राजेंद्र भारूड

( जिल्हाधिकारी, नंदुरबार)
( मुलाखत आणि शब्दांकन- माधुरी पेठकर)

One Reply to “लेख :- सपनो की उडान…( डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार) ( मुलाखत आणि शब्दांकन- माधुरी पेठकर)”

  1. डॉ राजेन्द्र भारुड साहेब आमच्या सैॊलापुर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे सीईओ हॊते.त्यांची कारकीर्दीतील अनेक क्षण आम्हाला अभिमानास्पद आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *