◼️व-हाडी कथा :- बाबू… बाबू…✍️ चंद्रशेखर अ. महाजन, बळेगाव, अकोट जि.अकोला

🤣 लॉकडाऊन  😂
…………………………………………..

अवं… इकळे या बरं… हे डबे काळून द्या वरचे.

त्या अज्याले काळून मांग.दिसत नाई काय मी कामात हाव म्हणून …

तो टि वी पाऊन रायला.

टि वी पयले की काम पयले ?

पोराले काय आतापासून कामात घालता काय ? त्याचे हेच तं दिवस हायत मजा कऱ्याचे.

ऑ… नववीत गेला ना ढोम्या… माया खांद्यालोग अण् तूया कानालोग आला ना तो…

मंग काय झालं ? लानच हाय अजून तो.

एवळ्या मोठ्या घोळम्याले लानच म्हणतं काय अजून…

तूमीच तं म्हणता की पोराचे लाळ आपल्याशिवय कोण करण… ते आपून नाई पूरे कऱ्याचे तं काय गावातले लोकं करतीन ?

खायाप्याचे लाळ… आतापासून नसते चोचले पूरोले की आपल्याच आंगात इल ना… बोकांडीवर बसील आपल्याच …. चांगलं वळण याच वयात लागते…

तो घराच्या बाईर तं जात नाई…. मंग कसं वळण बयकील….

सकाऊन दूध मीच आणतो… आंगण मीच झाळतो… हा आठ वाजेलोग टर्र..पसरते.

आता या लॉकडाऊनात कोणते कामं कऱ्याले लावता त्याले…

तो शेजारचा विज्या पाय कसे सारे कामं करते….

त्याले लानपणापासून सवय लागली. म्हणून झाला तो तसा.

तूले कोणं मना केलतं सवय लाव्याले. सारा लाळका बोक्या करुण ठेवला… निरा पूळे पूळे करतं त्याच्या… दिवसभर बाबू…बाबू करत रायतं…

आपल्याले काय डझनभर हायत काय… एक तं हाय.

बसोनं मंग डोकस्यावर त्याले.

तूमी तं निरा खकाव डकावच करता बाई …

मायं सोळ पण त्याची बायको आल्यावर तूयाच नावानं बोटं मोळील ना… सांगकाम्या बाळू करुण ठेवला म्हणीन…

मायं पोरगं मायाईकळून असल्यावर तिची काय हिम्मत मले काई म्हण्याची…

एवळी भरमात नको राऊ तू … मले तं या झाकणाचा काईच भरोसा नाई…

आता माय…असं कसं म्हणता… ?

खरं तेच बोललो.पण खरं कळू असते ना निंबा च्या पाल्यावाणी…

माया भरोसा हाय माया पोरावर…

मले हे सांग… लॉकडाऊन सुरू झाल्यापासून यानं पूस्तक तरी हाती घेतलं काय ?

दोन दिवस तं सुख खाऊ द्या त्याले ?

नाई तं कुठी चाल्ला तो कुंदा खंड्याले. दिवसभर टि वी नाई तं मोबाईल ले चिटकेलच असते.मायाच मोबाईल अण् मलेच चोरासारखा मांगा लागते त्याले…

देत नाई काय वापीस तूमाले ?

देते… पण त्या वाक्ती तोंड पा लागते त्याचं…कसं करते ते…

तूमी तूमच्याच सारखं जमिनीत घालता का त्याले ?

जमिनीतई मेहनत करा लागते तशीच नाई पिकत ते टि वी पायल्यान…नाई तं कोणते दिवे लावते पाऊ ना… तूले सांगतो एवळे लाळ करनं चांगलं नाई बरं…

करते तो…लय हूशार हाय माया बाबू… मोबाईलातलं तूमच्यापेक्षाई समजते त्याले…

तेवळं आलं म्हणजे झालं काय ?

मोबाईलात सारच भेटते आजकाल…

तूया डोकस्याले डोकसं लागते काय कधी ?

कायले लावता मंग…

जमिन हाय म्हणून एवळ्या लॉकडाऊनच्या काळातई खायाले तरी भेटून रायलं…नाईतं काय नोटाईचे बंडलं खाल्ले असते की मातीचे ढेकलं खाल्ले असते ..?

तूमी प्रेमानं सांगा ना मंग त्याले ?

काय फतरं सांगा म्हणतं…मी काई चांगलं सांग्याले गेलो की तूच तं मंधात शेंडे कतरतं…

शिकील ना… त्याच्या मनामनानं घ्या लागते …

हे असं हाय तूयं… त्याचं लगन होयेलोग घेत राय त्याच्या मनामनानं… बाकीची कसर त्याची बायको काळील मंग चांगली आळव्या हातानं…

ते आपस बायको आल्यावर पायत बसू … पाण्यात पळलं की बरोबर पोयणं येते.

एवळा मोठा झाला तरी साधा चहा चा कप धूत नाई… की जेव्याचं ताट उचलत नाई …निरा आयतं खाऊ करुन ठेवलां…

आई माय… माया पोरगा काय भांडेघाशा हाय काय ?

मंग कधी करील ?

मी हाव तोपावतर गरजच काय ? आपस पायत बसन बायको आल्यावर… तूमी करताच की नाई आता…

मायं काय सांगतं…मले लानपनापासूनच वळण हाय … पयले तूया लाळोबाचंच पाय …

जरासाक मोठा तं हू द्या दोन चार वर्षानं… मंग पा शिकोतो की नाई तं त्याले साजरं…

हवं…हू दे तूया बाबूले मोठा… लानच हाय तो अजून… पायण्यात बसो त्याले… देत जाय झोके चांगले…

ओ आई… मले भूक लागली… नाश्ता कर लवकर…

हो रे बाबू…पाच मिनटात करतो गरम गरम …भूक लागली असन माय माया बाबूले…

कठिण हाय…चालू दे तूयं बाबू…बाबू… रातभर पाखळलं… काई नाई सापळलं…

◼️✍️ चंद्रशेखर अ. महाजन
बळेगाव, अकोट जि.अकोला, 9623238096

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *