◼️ बदनाम रस्त्याचा संघर्ष: गंगाजमुना ✍️ सदानंद बोरकर, नवरगाव ,चंद्रपूर

🔷 🎭 निर्मितीमागची प्रेरणा….

-ii बदनाम रस्त्याचा संघर्ष: गंगाजमुना ii-

             मोबाईलच्या gallary मध्ये डोकावून बघितलं तर फोटोंची खूपच गर्दी झाल्याचे लक्षात आले. त्यातील काही फोटो डिलीट करायचे व जागा मोकळी करायची ठरवले. ते करता करता आपल्याच नाटकाचे व रेखाचित्रांचे हजारो फोटो मला दिसलेत. Delete करण्याची हिम्मत होत न्हवती म्हणून प्रत्येक नाटकाची वेगवेगळी फाईल तयार करण्याचे ठरविले. 

ते करीत असताना प्रत्येक नाटकाची निर्मिती प्रक्रिया डोळ्यासमोर उभी राहिली. आणि फ्लॅश बॅक सिनेमाप्रमाणे माझं मन भूतकाळात शिरलं. आणि नाटकाच्या जन्माच्या कथा तपशीलवार डोळ्यासमोर तरळू लागल्या.
2016 साली ‘गंगाजमुना’ नावाचं नाटक मी रंगभूमीवर आणलं. आजची निर्मितीकथा त्याचं ‘गंगाजमुना’ नाटकाची मी सांगणार आहे.

सामाजिक विषयांनाच नाटकाचा विषय बनवून तो विषय रंगभूमीवर आणणे हा माझा विक पॉइंट. त्यामुळे आजपर्यंत लिहिलेल्या आठही संहिता ह्या सामाजिक संदेश देणाऱ्या आहेत. पैकी दोन संहिता विद्यापीठात MA मराठीच्या अभ्यासक्रमाचा भाग आहेत.
‘गंगाजमुना’ हा विषय वारांगणाच्या शापित आयुष्याचे किळसवाणे चित्र समाजापुढे मांडणारा आहे.
खूप वर्षांपासून या विषयावर लिहायचे डोक्यात होते मात्र विषयाला नीट समजून घेण्याचा प्रसंगच आलेला न्हवता. त्यांच्या वस्तीत कसे जायचे? कुणासोबत जायचे? नेमके कुणासोबत बोलायचे? असे एक ना अनेक प्रश्न होते. ….आणि एक दिवस त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आणि मी त्या वस्तीत पोचलो.
झालं असं की, एप्रिल 2016 मध्ये नागपूरला आमच्या श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतीचं प्रदर्शन लोकमतच्या जवाहर दर्डा आर्ट gallary त भरलं होतं. त्यामुळे चार दिवसाचा माझा मुक्काम नागपुरातच होता. पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी संजय नावाचा एक कलारसिक प्रदर्शनी बघण्यासाठी आला. चित्रांचे अवलोकन केल्यानंतर तो माझ्याजवळ येऊन बसला. आणि आमच्या गप्पा रंगल्या. गप्पातुन कळले की नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयात शिकताना तो माझा ज्युनिअर होता. नागपुरात कुठे राहायला आहात असा स्वाभाविक प्रश्न मी त्याला केला. आणि त्याने उत्तर दिलं ‘गंगाजमुना’. मी उसळलोच. माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं. ज्या नेमक्या व्यक्तीचा शोध मी गेल्या कित्येक वर्षांपासून घेत होतो तो साक्षात माझ्या पुढ्यात बसला होता. मी त्याला माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते स्पष्ट केलं. मला या विषयावर पाहिजे ती मदत करायचे त्याने कबूल केले. दुसऱ्याच दिवशी सकाळी आठ वाजता त्याच्या गंगाजमुनातल्या घरी भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी आठ वाजता मी आणि माझ्याच नाटकातील एक सहकारी महिला कलावन्त आम्ही संजयचं घर गाठलं, आणि गंगाजमुना चा प्रवास सुरु झाला.

संजयने तसे आधीच काही स्त्रियांना सांगितले होते. त्यामुळे कुणीतरी सिनेमा वैगरे बनवणारे महाशय येणार आहेत अशी बातमी वस्तीत पसरली होतीच. पण त्यामुळे आम्हाला बघून समोर यायच्या ऐवजी तेथील तरुण मुली आम्हाला टाळायला लागल्या होत्या हे आम्हाला स्पष्ट लक्षात आलं. संजय ने काही वृद्ध मावशांकडे नेलं, काही खूप जुन्या कोठ्या होत्या तिथे नेलं. सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण कुणीही नेमकं काहीच बोलत न्हवतं. “हम अपने मर्जी से ये धंदा करते है, हमे कोई जबरदस्ती नही करता, हम हमारे धंदे मे बोहोत खुश है, किसिका हमारे उपर दबाव नही है…. ” वैगरे वैगरे पाठ केलेले आणि ठेवणीतले उत्तर आम्हाला ऐकायला मिळालीत. पूर्ण वस्ती फिरलो. चहाच्या टपरीवर तासभर वेळ घालवला, किराणा दुकानदाराशी गप्पा मारल्या. पण कोण खरं आणि कोण खोटं बोलतो हेच कळत न्हवतं. त्याच आठवड्यात पोलिसांनी तिथे अक्षरशः संचारबंदी असल्याप्रमाणे कडक वातावरण निर्माण केलं होतं. चौकशी केली तेव्हा कळलं की कुठली तरी बाहेरची मुलगी गायब झाली आहे नि ती इथेच असल्याची खबर पोलिसांना लागली आहे. वस्तीतील स्थानिक लोकांचे खाजगीत बोलणे सुरू होते,” पुलीस चाहे कुछ भी करले, वो लडकी अगर गंगाजमुना की बस्तीमे है, तो वो उनके हाथ आनेवाली नही”
त्यांच्या बोलण्यातून तिथे किती ‘खतरनाक’ रॅकेट काम करीत असावं याची मला कल्पना आली.

संजयचं घर भर वस्तीत असल्याने त्याला सारेच ओळखत होते. त्याची त्या वस्तीत बऱ्यापैकी इज्जत करीत होते. संजयने आता आम्हाला वस्तीत पोट भरण्यासाठी दादागिरी व दलाली करणाऱ्या आणि त्या कारणाने अनेकदा तुरुंगवास भोगलेल्या दोन तरुणांकडे नेलं. त्यांची भाषा एकदम ‘खतम’. म्हणजे ‘नागपुरी खतरनाक हिंदी’. त्यांच्यामधून मला एक कॅरेक्टर सापडलं, सुलतान. त्याच्या माध्यमातून काही स्त्रियांची भेट होऊ शकली. बोलता आलं, समजता आलं.
त्यादिवशी रविवार असल्याने बाहेरगावहून परीक्षा द्यायला आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जरा अधिक होती. (तशी ती प्रत्येक परीक्षेच्या रविवारी असते असं ऐकलं) त्यामुळे चहा टपरिवरून विद्यार्थी आणि तरुण वारांगना यांच्या इश्यार्यांना मला छान कैद करता आलं. बाहेरून आलेले विद्यार्थी इथे कसे लुटले जातात ते मला टपरीवाल्याने तपशीलवार सांगितले. (टपरिवाला रम्या भन्नाट होता) मोबाईल आणि पैशाचे पाकीट एका विशिष्ट पानठेल्यावर काढायला सांगायचे, त्या विद्यार्थ्यांना आत घ्यायचे व काहीच क्षणात पोलीस आलेत म्हणून आरडाओरड करायची व त्याला हाकलून द्यायचे. असा आखीव रेखीव प्रकार इथे नेहमीच चालतो असेही कळले. (त्यासाठी तिथे सर्वांचे संगनमत असते.मला ही पण नवीन गोस्ट सापडली होती) दुपार पर्यंत तिथल्या वातावरणाशी माझा चांगलाच परिचय झाला होता. डोळ्यांनी आणि कानांनी आपले काम केले होते त्यामुळे नवीन कॅरेक्टर जन्म घेऊ पहात होते. पण अजून स्टोरी सापडत न्हवती. दिवस संपत आला. संजयकडे परत आलो. संजय स्वतः चहा करायला आंत गेला नि आम्ही तिसऱ्या माळ्याच्या गच्चीवर गेलो. ह्या उंच इमारतीमुळे चारही बाजूने वस्ती पूर्ण नजरेत आली. दरम्यान खाली जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकायला आला.
माझ्यासाठी पुन्हा नवीन खाद्य मिळालं. आम्ही आता मोर्चा तिकडे वळवला. एका मध्यम वयाच्या वारांगनेसोबत शेजारी राहणाऱ्या एका मराठी कुटुंबाचे नागपुरी हिंदीत चाललेले ते भांडण. त्या टिपिकल शेजाऱ्याच्या अंगणात चुकून कुणीतरी कंडोम फेकला आणि स्फोट झाला होता . माझ्यासाठी तो विषय आणि त्यावर चाललेलं भांडण फारच मजेशीर आणि ‘हटके’ होतं. मी लागलीच ते अक्ख भांडण रेकॉर्ड करून घेतलं. नवीन कॅरेक्टर नि भांडणाचा ‘खतरनाक’ मसाला घेऊन आम्ही परत निघालो. चहाचा आस्वाद घेता घेता संजय ने खूप गोष्टी मला सांगितल्या होत्या, त्यामुळे वस्तीची एक फ्रेम माझ्या डोक्यात तयार झाली होती. पण अजूनही स्टोरी सापडली न्हवती.

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच मोहिमेवर त्याच वेळी मी निघालो. वस्तीत प्रवेश केला. आज मी एकटाच होतो. एक वृद्ध वारांगना पायरीवर बसलेली होती. शेजारी एक आई आपल्या मुलाला शाळेची तयारी करून देत होती. घराघराच्या दारा-खिडक्यातून गिऱ्हाईक शोधणाऱ्या तरुण नजरा नेहमीप्रमाणे पोटापाण्याची सोय करण्यात व्यस्त होत्या. वृद्ध वारांगना बोलायला तशी खट्याळ होती. पण आज ती बरी बोलली. अनेक प्रश्नांना तिने आज उत्तर दिले. मात्र तिने मला हाणलेले टोले अखिल मानव जातीला अंतर्मुख करणारे होते. मात्र बोलताना कुणाचे तरी दडपण असल्याचे स्पष्ट जाणवत होते. “……साब, इस बस्तीमे धंदा करनेवाले हम तो सिर्फ दो हजार औरते है, लेकिन तुमारे नागपूर शहर मे कमसे कम दस हजार लडकिया यही धंदा चोरी चुपके करते है। आप बोलो तो हम उनकी मोबाईल no की लिस्ट दे सकते है। , हम तो अपना पेट भरने के लिये ये धंदा करते है साब, लेकिन तुम्हारे शहर की औरते सिर्फ शोक के लिये ये काम करती है। और साब जी, हम ये धंदा खुलेआम करते है, इसलिये तुम्हारी बीबी,बहने, बेटीया सुरक्षित है, नही तो रस्ते रस्ते पे बलात्कार हुये होते।” 

त्या स्त्रीने दोन मिनिटात असे काही प्रश्न केले की मी निरुत्तर झालो. ती बोलत राहिली मी ऐकत राहिलो. त्या काळात तिने मला मोबाइल मध्ये काहीही रेकार्ड करू दिलं नाही की फोटो काढू दिला नाही. ती तिच्या पायरीवर व मी रस्त्यावर असा आमचा सार्वजनिक ठिकाणी संवाद चाललेला. जाणारे येणारे थांबून थांबून आमचं संभाषण ऐकत होते. माझ्यासाठी हा अनुभव फार नवीन आणि अवघडल्यागत वाटणारा होता. कॅरेक्टर सापडत होते, छोट्या छोट्या खूप अद्भुत गोष्टी माहिती होत होत्या पण स्टोरी अजूनही सापडत न्हवती. दोन दिवस गल्लीत फिरून फक्त अस्वस्थ होण्यापलीकडे काहीच सापडलं न्हवतं. पण डोळे नि कान सारं कैद करीत होतं. संध्याकाळ झाली. त्यांच्या धंद्याची वेळ झालेली. परत निघताना सहज सकाळी जीची छोटी मुलगी शाळेत गेली ती दिसली. मी तिच्याशी बोललो.” आई क्या तुम्हारी लडकी स्कुलसे वापस?” तिने मराठीत उत्तर दिलं, “आली मघाचं”. मी फक्त हसलो.
तिने मला यावेळी प्रतिसाद दिला. ती मला काही सांगू शकेल असे तिच्या देहबोलीतून मला कळले. मग तीच स्वतःहून बोलली,” साहेब, आता धंद्याची वेळ आहे, तुम्ही सकाळी या, मी तुम्हाला काही सांगते.” मी अधिक वेळ न घालवता तिथून निघून गेलो. यावेळी स्टोरी नक्की मिळणार याची खात्री बळावली होती. दोन दिवसांच्या नोंदी रात्रभर घेतल्या, नीट लिहून काढल्या नि सकाळीच पुन्हा एकदा गंगाजमुनाच्या बदनाम गल्लीत प्रवेश केला. तीचे खरं नाव माहीत नाही पण सारे तिला बिजली म्हणायचे. मी एखाद्या वारंगणेच्या खोलीत पहिल्यांदाच प्रवेश केला होता. खूपच लहान खोली. जुन्या साड्यांचे पडदे लागलेले. एकच पलंग, त्यावरच मुलगी अभ्यास करीत बसलेली. कुणालाही अस्वस्थ करेल असा कुबट वास. त्यातही जुने पुराणे देवाचे फोटोफ्रेम. बिजलीने मला लवकर गुंडाळायच म्हणून लगेच विषयाला सुरवात केली. साहेब इथे तुम्हाला कुणी काहीही सांगणार नाही. काही सांगितलं तर त्याचे परिणाम आम्हालाच भोगावे लागतील. आम्ही कुठंच जाऊ शकत नाही. बाहेरचं जग आम्हाला जगू देत नाही त्यामुळे या जगाशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही. कुठलीही मुलगी इथे आपल्या इच्छेने येत नाही. तिचा नाईलाज होतो. एकदा इथे आली की तिचे बाहेर जायचे रस्ते बंद होतात. एकदा एक मुलगी इथून परत गेली. तिने जिल्हा कचेरीपुढे चहाचा व्यवसाय सुरू केला.

महिनाभरातच गंगाजमुनात नियमित येणाऱ्या कुण्या व्यक्तीने तिला ओळखले. आणि झालं बघता बघता जिल्हा कचेरीत काम करणाऱ्या सर्व लोकांना ही बाई पूर्वाश्रमीची कोण हे समजले. नंतर रोजचे मरण तिच्या नशिबी आले. आणि त्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून ती पुन्हा गंगाजमुनात परत आली. दुसरी एक अंगावर काटा येईल अशी घटना तिने मला सांगितली. एकदा नागपूरच्याच इतवारीतील एका कापड व्यावसायिकाची सुंदर निष्पाप मुलगी अचानक गायब झाली. चार वर्षे देशभर प्रयत्न करून सुद्धा तिचा शोध लागला नाही. खचलेले आई वडील आणि पोलिसांनी अखेर आपल्या प्रयत्नांना विराम दिला. मात्र एक दिवस तीच मुलगी गंगाजमुनाच्या एका खोलीत तिच्याच सख्ख्या भावाने बघितली आणि तो कोसळलाच. पोलीस, समाज, बदनामी या सर्व गोष्टीच्या भीतीमुळे तिच्या वडिलांनीच तिचा खून करून तिला मुक्त केलं. पोलीस तपासात असे लक्षात आले की वडिलांच्या कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या मुलानेच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं व नंतर तिची ह्या वस्तीत विक्री केली. इतवारी गांधीबाग परिसर अगदी शेजारी शेजारी असताना मात्र तिचा शोध तब्बल चार वर्षानंतर लागला. पण तोपर्यंत या बदनाम रस्त्याने एका निष्पाप जीवाचा बळी घेतला होता.

मन सुन्न करणारी कथा घेऊन मी ती गल्ली सोडली. संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी ती कथा आणि त्या अनुषंगाने माझ्या डोक्यात जन्माला आलेले सर्व पात्र बाहेर येण्यासाठी धडपडत होते. मी अजिबात विलंब न करता ह्या सर्व पात्रांना नि शब्दांना वाट मोकळी करून दिली आणि झपाटल्यागत केवळ 33 दिवसात हे नाटक लिहून पूर्ण केलं, तालमी सुरू केल्या आणि नाटक रंगभूमीवर आणलं. चांगल्या वाईट अर्थाने नाटकाची खूप चर्चा झाली मात्र मी तिकडे लक्ष दिले नाही, कारण ते अपेक्षितच होते. मला माझ्या लिखाणावर पूर्ण विश्वास होता. नाटक लिहिताना कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतली होती. सेक्सवर्कर चा थेट संबंध असूनही नाटकात कुठेही अश्लीलता येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. तरीसुद्धा नाटक न बघता काही लोकांनी बदनामी सुरू केली. पण माझं नाणं खणखणीत होतं. मी त्यांच्या बोलण्याला फार किंमत दिली नाही आणि प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही. उलट नाटकातील एकही प्रसंग, एकही वाक्य एडिट न करता नाटक जोरात सुरू ठेवलं.
माझ्या दिग्दर्शनाखाली मंजुषा जोशी, विजय मुळे, देवयानी जोशी, शिल्पा माडले, रेखा चंद्रगिरवार, अंगराज बोरकर, चंद्रसेन लेंझे, विश्वनाथ पर्वते, हितेश ठिकरे, अभिजित संगेल, शरद ठिकरे, लक्ष्मीकांत लेंझे, सुरेश लोखंडे इत्यादी कलावंतांनी खूप मेहनत घेऊन हे नाटक उभं केलं, मोठं केलं. विदर्भाची नाट्यपंढरी म्हणून बिरुद मिरवणाऱ्या माझ्या स्वगावात (नवरगाव, जिल्हा-चंद्रपूर)
स्व बालाजी पाटील नाट्यगृहात सकाळी 9 वाजता तिकीट विक्री सुरू होणार होती.

त्यासाठी प्रेक्षक पहाटे 5 वाजतापासून रांगेत उभे होते. नागपूर, चंद्रपूर, मुंबईसह संपूर्ण झाडीपट्टीत या नाटकाचे शेकडो प्रयोग करण्याची संधी मला मिळाली.
प्रत्येक नाटकाच्या वेळी भावनिक प्रसंगात प्रेक्षक ढसाढसा रडताना आम्ही बघितले. मीडिया ने नाटक प्रत्यक्ष बघून जबरदस्त समीक्षण लिहून ही कलाकृती मोठी केली हे जरी खरं असलं तरी वारंगणाच्या वेदना केवळ एका कलाकृतीच्या माध्यमातून संपणाऱ्या नाहीत हे नागड सत्य सुद्धा नाकारता येत नाही.

◼️ ✍️ सदानंद बोरकर, नवरगाव ,चंद्रपूर
           Mob. 9021333633

◼️ लेखामधील छायाचित्रांचा गंगाजमुना या स्थळाशी कुठलाही संबंध नाही, ही सर्व नाटकातील प्रसंग चित्रे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *