◼️लघुकथा :- द्या मंग छटाकभर..चंद्रशेखर अ. महाजन बळेगाव,अकोट जि.अकोला

🤣 लॉकडाऊन 😂
…………………………………………..
द्या मंग छटाकभर…. 
………………………………………….

ओ…पांडूभौ… दुकान बंद केलं काय हो ?…”

“साळे बारा वाजले ना.चालू ठून काय रट्टे खायाची आनतं काय मायी.”

“पयले तं दिवसभर ठेवत जा तूमी.”

“अबे… नोटीसा भेटल्या ना आता. जास्त वय वय केली तं सिलच लावतात. दन्ड अन् रट्टे वरतून नफा.”

“मले सौदा पायजे होता ना…”

“एवळं काय अर्जन्ड हाय बे…सकाय येजो.”

“ओ पांडूभौ…आयकाना राजा… द्या हो तेवळा.”

“बरं ये मांगच्या दारातून.चुपचाप येजो. तू जवळचा हायस म्हनून देतो नाई तं बारा मनजे बारा.”

“हे घ्या आलो…द्या बरं भौ पटकन…”

“अबे पयले सांग तं खरी काय पायजे ते ?”

“छटाकभर तंबाखू द्या ना…”

“हा होय काय तूया सौदा ?”

“हो ना राजा.आताच जेवलो.. जेवल्यावर तं पयले पायजे. घरात पायतो तं तंबाखू खलास… बेजाच तलफ आलती ना हो भौ…”

“वा ब्बे पुरश्या…म्या म्हटलं हजार पाचश्याचं गिरईक असन लेका…”

“तरी तं बरं राजा…हप्त्यातून दोन खेप तं ठुयेलच असतो तूमच्या दुकानावर…”

“म्हनूनच तं म्हतलं …मायं पेटन्ट गिरईक हायस ना तू … “

“कितीकई नेलं तरी निरा आन् आनच हाय ना हो.”

“खायासाठी तं न्या लागीनच नारे गळ्या …”

“चार दिवस गेले की बायको म्हणते… कचोऱ्या करतो…आना मैदा… शिरा करतो…आना रवा…”

“चांगलं किलो किलो पयलेच घिऊन जाव मंग…”

“नेलं ना भौ…पण या बायेईले काय झालं काय मईत…मोबाईलातलं पाऊ पाऊ तसच करून पायतात ?मंग जे हप्ताभर जायाचं ते चार दिवसात खलास..!”

“बरं हाय ना मंग… काई काई खायाले भेटते ना…”

“कायचं हो बावा…काय खाऊन रायलो हे मानसाले समजत नाई…काय बनोयाचं होतं अन् काय झालं हे तेईले उमगत नाई…”

“हाव गळ्या…दुकानात आले की लय झनं असच सांगतात ?”

“वरतून म्हनतात की…..आज सयपाक बंद.. !पोटभर खा…लय मोठं केलं…आता सांगा भौ जे पिलेटभर मोठ्या मुश्कीलनं जाते…ते पोटभर खा…कमाल नाई काय ?”

“हो गळ्या… खरं हाय तूयं.”

“बायेईले हे नाई समजून रायलं की, आपल्याले कोरोना खतम कऱ्याचा हाय.किराना नाई ….”

“एक सांगू तुले…तू घरच्यासारखा हायस म्हनून सांगतो.फकस्त कोनाले सांगू नोको.”

“सांगा ना बॉ… आपल्या जोळची गोठ कदीतरी फूटली काय ?”

“हे पाय…दुकान चालोयाची खरी मजा तं आताच यीवून रायली गळ्या…”

“काय सांगता ? या लॉकडाऊनात मजा ?”

“तेच तं खरी गोम हाय…चार घंट्यात चार दिवसाची कमई हून रायली बाबू…”

“मंग तं राजा सरकच हून रायलं तूमचं…निरा दिवईच हाय मंग तं…”

“दिवई कुकळे काळली.दिवई पेक्षाई ज्यमून रायलं आता.”

“मंग तं राजा चांदीच चांदी हाय तूमची ?”

“आईक तं खरी… तूले सांगतो या लॉकडाऊनच्या पयले गिरईकं भल्लेच चावटपना करत…”

“कसा हो ?”

“साखर जाळी नाई काय ? तेल याच कंपनीचं हाय काय ? चहा हाच हाय काय ? हे असच हाय काय ? ते तसच हाय काय…?”

“मंग आता काय बयकलं ?”

“बयकलं नाई… ज्यमलं. गर्दी पाऊन सारा चावटपना दबला आता…जे हाय..जसं हाय..तेच द्या म्हणते.फक्त
लवकर द्या.”

“मंग तं भावई आळक्याचे दिळके लागत असतीन ?”

“तूले सांगतो… धंद्यात एकच करा लागते…रोज चे आंडे खा लागतात… निरा कोबंळीच कापून नाई खा लागत …”

“पेपरात तं वाचलं होतं की काई काई दुकानदारईले बमं दंड देले म्हनून… “

“त्याईनं अख्खी कोंबळीच खायाले पायली असन ना ?”

“हाव राजा … खरं हाय तूमचं.”

“तसाच तं बंबाट सिजन सूरू हाय. छटाकवाला किलोवर आला… किलोवाला पाच धा वर… काई काई तं डायरेक दोन चार मयन्याचं एक खट्टा लांबून रायले… एवळई घिऊन हू की चूई करत नईत…इळी मिळी… गुप चिळी… मुकाट्यानं नेतात.”

“काय करतील भौ… आटा कम… फकीर जादा… असं झालं ना आता.”

“तसच होयेल हाय…”

“हे तं भौ त्या चिकन गुन्या सारखच झालं ?”

“कसं रे ?”

“त्या वाक्ती कईक डाक्टरईचं ज्यमलं आता किरान्या वालेईचं.”

“तू काई म्हन गळ्या… पन ज्यमून तं रायलच.”

“मंग तं राजा दाबून धंदा सूरू हाय.”

“अबे मायं तं गावा पूरतच हाय… आकोटात जाऊन पाय…मंग समजते.”

“तूमी असल्यावर मले कायले जा लागते कुठी ?”

“तू जोळचा हायस म्हनून सांगतलं गळ्या…”

“द्या मंग छटाकभर अजूक ….तलफ मोठी बेकार हाय…सरला गिरला तं बसा लागन बोंबलत…”

✍️ ©-चंद्रशेखर अ. महाजन
बळेगाव,अकोट जि.अकोला
9623238096

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *