-ii गाळ ii-
कोऱ्या कागदाने पुसतो कपाळ आहे…
नशिबाच्या विहिरीतून काढतो गाळ आहे…
अंगणात जन्मजात उभी तुळस केव्हाची
गळ्यात तरीही काटयांची सजते माळ आहे…
हसणाऱ्या विजांना अन् काळ्या ढगांना ही
नव्हते माहीत एकटाच रडतो आभाळ आहे…
ही गुंतागुंत आयुष्याची कधी संपणार नाही
मग का उगाच दुसर्यावर सोडतो जाळ आहे…
आम्ही सत्तेच्या चुलीतले अबोल सरपण झालो
हातात ज्यांच्या आगपेटी तो शिजवतो डाळ आहे…
विचारू कुणास पत्ता त्या थोर सत्यमेव जयतेचा
जो तो सावलीस त्याच्या मानतो विटाळ आहे…
आला बाप माझा घेऊन घामाची नदी घरी
सांजवेळी जागणाऱ्यांना वाटते सकाळ आहे…
कोऱ्या कागदाने पुसतो कपाळ आहे…
◼️✍️ खुशाब लोनबले पवनपार,
ता सिन्देवाही, जि. चंद्रपूर
मो.9682130085