महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे. ३९ वर्षीय धोनीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर स्थान दिलं नाही. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी ही चर्चेत राहिली होती. २०१९ विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता. परंतु विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याशी बोलून निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलायला लावलं. मध्यंतरीच्या काळात संघात ऋषभ पंतची खराब कामगिरी लक्षात घेता धोनीला पुन्हा संघात स्थान द्यावी अशी मागणी होत होती. परंतु धोनीला पुन्हा संघात स्थान मिळालं नाही.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *