◼️व-हाडी कथा :- कटला की काटला लेकानं… ?


📱 कटला की काटला लेकानं… ?
——————————————-

“नमस्कार !  च्या सेवेमध्ये आपले स्वागत आहे.आपली समस्या काय आहे ? बोला सर !”

“पह्यली गोष्ट म्हनजे मी काही सर गीर नाई.अन् दुसरी गोष्ट म्हनजे मी रोज निंद्याले जात असतो त्याच्यानं मले सर म्हटलं की कसच्या कसं वाटते.तुमी मले रामदास भौ म्हटलं तं चालते.”

“बर ! आपली समस्या कळू शकेल का ?”

“काय समस्या ईचारता राज्या…तुमी तं पुरं गंडोलं आमाले.”

“असं का बोलताय सर ?”

“ते पा तुमाले म्हटलं ना मी सर नाई म्हनून. जानून काहाले गरम करून देता माली.”

“बरं भाऊ ! कशासाठी कॉल केलाय आपन ?”

“अळचन हाय म्हनूनच केला असन ना फोन.”

“काय समस्या आहे भाऊ आपली.”

“तुमी तं पूराच जांगळबूत्ता करून टाकला आमचा.”

“व्हाट ईज जांगळबूत्ता ?”

“भरदिवसा आमाले गंडोता अन् वरतून ईचारता काय झालं !”

“असं काय झालं भाऊ ? थोडं स्पष्ट सांगीतलं तर बरं होणार “

“पह्यले मारे बोंबलू बोंबलू सांगत जा की आमच्या मोबाईल कंपनीचं नेटवर्क जबर हाय म्हनून…आता तं रेंज साठी आमाले निरा बोंबल्या मारा लागून राह्यल्या.”

“भाऊ होते एखादेवेळी.”

“एखांद्या वाक्ती काहाचं फतराचं ? तुमी तं म्हना की बेज्या फास्ट चालीन मोबाईल ? धळाल सारं डाऊनलोड हुईल म्हनत होते.आता तं निरा बंडी च्या चाकासारखा डुगू डुगूच चालते तुमचं नेटवर्क.”

“आमचे प्रयत्न तर चांगली सेवा देण्याचेच आहेत .”

“अथी तं एक लानसाक हिडीओ डाऊनलोड होत नाई… अन् कधी कधी तं साधा फटूई लवकर दिसत नाई … हेच होय काय तुमची सरवीस ?”

“टेक्नीकल अडचनी असतात केव्हा केव्हा.”

“तुमी तुमची काय अळचन सांगता मले…खरी अळचन तं माही हून राह्यली आता.”

“मला नाही कळलं ?”

“तुमाले कळून काय करता .अथी तुमच्यापाई आमचं नवरा बायकोचं भांडन होयावर काम आलं.”

“म्हनजे ?”

“आता तुमी खळनीगूत करून राह्यले तं सांगतोच.आयका.झळीपान्याच्यानं वावरातले कामं बंद हायत.म्हनून बायको म्हने लावा एखांदा पिच्चर यूट्यूबवर …!”

“मग .”

“मंग काय ? लावला तं खर ….पन , दाहा मिनटात वीस खेप अटकत जाय पिच्चर .बायकोनं तुमच्यासंग माह्याई उद्धार केला… फेकून द्या म्हने तुमचं हे टप्पर… तुमच्या या नेटवर्कनं मानसाचा सारा कचरा करून टाकला.”

“तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल कंपनीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो.”

“इकळे घरात दिल अन् घर तूट्यावर काम आलं… तुमच्या त्या दिलगिरीले काय चाटता आता .”

“तुमच्या तक्रारीची नोंद घेतलीय आम्ही. यापुढे हायस्पीड नेटवर्क देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.”

“तुमी तं नोंद घ्याच पन तुमच्या मालकालेई सांगा.नाहीतं मले तेईचा फोन नंबर द्या.मी बोलतो.साधं स्टेटसई पाह्यता येत नाई राजा पटकन् …काय मोबाईल कंपनी चालोता की गंमता करता म्हना!”

“तुमची भावना समजू शकतो मी.”

“नुसतं भावना समजून काही फायदा नाई. नसन जमत तं दुकान बंद करा म्हना. नाही तं मीच हे शाळा बंद मारतो आता.”

“भाऊ असं नका करू.आमचे रिचार्ज दर खूप स्वस्त आहेत .”

“सस्ते आले कुठचे ? दोनशे रुपये लागतात मयन्याचे. दिवसभर निद्यांले गेल्यावर कुठी दोनशे भेटतात हाती.
चलाना आमच्यासंग जरा निंद्यांले .मंग समजते तुमाले काय सस्त अन् काय म्हाग हाय ते . मानूस मोठ्या आशेनं रिचार्ज मारते…सारा मुळऑफ करून टाकता मानसाचा… अन् वरतून तं तुमी निरा लूट्याचेच कामं करून राह्यले आमाले.”

“दिवसाला दिड – दोन जी बी डाटा फ्री असतो ना भाऊ .”

“रेंजच चांगली नसन तं काय करता तुमच्या त्या डाट्याचं… तुमच्यासाठी ते फायद्याचं अन् आमच्यासाठी घाट्याचं !”

“आता तसं नाही होनार !”

“फोन आला की आंगनात पया लागते बोल्यासाठी ! घरात रेंजच येत नाई . हॅलो … हॅलो … च करत रा लागते निरा .आता झळी सुरु हाय तं…काय फोन आल्यावर पावसायाचं आंगनातच जाव काय बोल्याले पान्यात ?”

“तुमची तक्रार आमच्या टेक्नीकल टीम कडे सेंड करतो भाऊ…”

“ते तं कराच लागन तुमाले…लेकरईचे ऑनलाईन कलास सुरु हायत आता लॉकडाऊनच्यानं… धळ ते बराबर दिसतई नाई अन् आयकूई येत नाई… आता काय तो अभ्यास शिक्याले लेकरईले घरावर चळोत जाऊ की रेंज साठी झाळावर चळोत जाऊ…बोला बरं आता तुमी..!”

“खरं आहे सर तुमचं…यानंतर नाही होनार असं.तुमच्या तक्रारीची दखल घेतलीय आम्ही. बर …आमच्याशी झालेल्या संभाषणाविषयी तुम्ही समाधानी आहात ना !”

“माह्य समाधान झाल्यावरच म्हनील मी तसं. त्याच्यासाठी माह्य काम झालं पाह्यजे पह्यले !”

“हो सर ! नक्कीच…”

“ते पा… तरी सर म्हनताच मले…द्या बरं आता तुमच्या मालकाचा फोन नंबर…बोलतोच मी त्याईच्याशी…कसे सर सर करता तुमी तं…हॅलो…हॅलो… ऑ..झाला बंद…? कटला की काटला लेकानं… ?”

◼️ चंद्रशेखर अ महाजन
बळेगाव ता.अकोट जि.अकोला
📱९६२३२३८०९६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *