◼️ काव्यरंग :- मारबत..✍️मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि. १९/०८/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘मारबत‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.

🚺🚹🚺🚹🚺🚹🚺🚹🚺🚹🚺

मारबत

‘घेऊन जाय गे मारबत’
कोरोनाचा वाढता कहर
तीळतीळ तुटतोय जीव
संपव हा जीवघेणा प्रहर

‘घेऊन जाय गे मारबत’
ईडापीडा अन दुःख सारं
आनंदाची बरकत होवो
वाहू दे देशी सुखाचं वारं

‘घेऊन जाय गे मारबत’
मनातील वाईट विचार
एकोप्याने नांदोत सारे
वसावा परोपकारी आचार

‘घेऊन जाय गे मारबत’
मारक जो अहंकार द्वेष
सहकार्याची गुंफूनी माला
ढळू दे डोळ्यातला क्लेश

आहेस विदर्भाचं वैभव तू
सांस्कृतिक वारसा जपणारं
अखंड समता अन् समृद्धीचं
बीज बहरू दे न संपणारं
बीज बहरू दे न संपणारं

◼️  सौ छाया जावळे
वाई, सातारा
©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

🚺🚹🚺🚹🚺🚹🚺🚹🚺🚹🚺

मारबत

तान्हा पोळा फुटता बघा
लाकडी बैलांची झगमग
चिमुकल्यांच्या ओठांवर
ती भोजाऱ्याची लगबग

लहानांचा उल्हास भारी
मोठ्यांचीही सुरू तयारी
इडापिडा टाळण्या सारी
मारबतीची गंमत न्यारी

गाव होतो एकजुट सारा
टाकाऊ वस्तू होई गोळा
वाईटाचे प्रतीक समजून
मारबत करी दुःख चोळा

घेवून जाय गे….मारबत
घोषणांचा एकत्र निनाद
हद्दपार करूया संकटांना
आपापसात चाले संवाद

एकतेचा अनमोल संदेश
सकारात्मक उर्जा प्राप्ती
मिरवणूक ती सद्गुणांची
गावात वसेल सुख शांती

अधोगतीचे मेघ नकोसे
हाकलून लावते मारबत
नवं चैतन्याचे बीज पेरते
दृढ विश्र्वासाची करामत

मीता नानवट‌‌‌कर नागपूर
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

🚺🚹🚺🚹🚺🚹🚺🚹🚺🚹🚺

मारबत (पोवाडा)

ऐका कहाणी हो तुम्ही मारबतीची
खास ओळख आपल्या नागपूर नगरीची
आहे खास ओळख आपल्या विदर्भाची हो जी जी…धृ

इंग्रजी जुलमी अंमलात
निष्पाप जनता अन्यायाने झालीया त्रस्त
भोसल्यांच्या बांकाबाईंची करामत
हातमिळवणी करुनी केला घात
फिरंग्यांशी केले संगनमत
देशवासी बिथरले पाहून विश्वासघात
एकवटली अवघी मानवजात
विश्वासघाताचा करण्या निषेध हो जी जी जी…1

काळ्या मारबतीचा इतिहास पहा
137 वर्षांचा आहे तो खरा
पिवळ्या मारबतीचा इतिहास हा
133 वर्षांचा आहे खरा
1885 साल ते आरंभाचे
गुलामीचे पाश तोडून टाकण्याचे
तऱ्हाणे तेली समाज बांधवानी
उत्सव कमिटी ती स्थापन केली
परंपरा आजवर टिकविली
हो जी जी जी…2

तान्ह्या पोळ्याचा मान
मिरवणुकीची ती शान
करण्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन
संदेश मिळतोया महान
राखले जाते सामाजिक भान
राजकीय परिस्थितीवर तो
ओढला जातो ओरखडा छान
आनंदाला सर्वत्र येते कसे उधाण
आदर्श प्रथांचे करूया जतन हो जी जी जी…3

आज गोष्ट सांगते लाखाची
ध्यानी ठेवा सर्वानी मोलाची
नको घात आपल्याच लोकांचा
परायाकडून नको मान तो फुकाचा
स्वार्थापायी परकीय देती मोठेपण
नका राहू फुटीरवादी वृत्तीनं
भलं झालंय कोणाचं फितुरीनं
राहा आपल्या लोकांना धरून
एकसंघ देश राहील छान हो जी जी जी…4

म्हणून म्हणते
ऐका कहाणी हो तुम्ही मारबतीची
खास ओळख आपल्या नागपूर नगरीची हो जी जी जी
आहे खास ओळख आपल्या विदर्भाची हो जी जी जी…धृ

डॉ. पद्मा जाधव -वाखुरे, औरंगाबाद
©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
🚺🚹🚺🚹🚺🚹🚺🚹🚺🚹🚺

🔷  मुख्य सहप्रशासक/संपादक
      राहुल पाटील
     ७३८५३६३०८८
🔷  मुख्य परीक्षक/प्रशासक
      सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *