◼️व-हाडी कथा :- अती भेटले तं भेटले.. 

🤣 लॉकडाऊन 😂
…………………………………………..
अती भेटले तं भेटले…. 

 

“ओ पोरा… शांताराम चा पोरगा होयस काय रे ?”

“हाव.काय म्हनता ?”

“कुठी निगांला गाळी घिऊन ?”

“आकोटले.”

“जमलं गळ्या…मले यीव देनं गाळीवर आकोटलोगू.”

“रस्ता खराब हाय ना आबा…पळले- गिळले तं बसा लागन..नस्ती आफद मायाभवती …”

“मी काय कच्च्या गुरूचा चेला हाव काय बे… अशा तं कितीक गाळेयीवर बसतो मी रोजचं…”

” पा बॉ…बसा मंग…धरुन ठेवजा पन…”

“जूनं खायेल हाव आमी… तूमच्या सारखं हूलू पूलू थोळीच हाव…”

“काय काम काळलं आबा आकोटले ?”

“बँकेत काम हाय.”

“पैसे जमा करता काय ?”

“हे काय जमा कऱ्याचे दिवस हायत काय बे…माया पगार जमा झाला… तो काळ्याले चाललो.”

“तूमी कोनत्या नवकरीवर होते की पगार जमा झाला तुमचा.”

“तो निराधारचाना बे.हजार रुपये मयना.”

“तूमाले तं तीन तीन पोरं हायत.तूमी कूठचे हो निराधार ?अन् तुमच्या जोळ तं बारा एक्कर वावर हाय…त मंग कसा काय भेटते हो तूमाले पगार.”

“आता तूयापासून काय लपोवाव गळ्या… माया नातासारखा हायस तू… म्हणून सांगतो तूले… आईक.. हे पाय..चार चार एक्कर तिघईच्या नावानं करूण देलं…त्याच्यानं आमी बुडा बुडी पगार घ्याले मोकये…मंग येलाले दुःख ना वायकाले दुःख.”

“वाहो आबा… लयच खतरा काम हाय हो तूमचं.”

“अन् पाय गळ्या नातू… एका कामासाठी जायाले पूरते काय ? ते फूकटच्या सिलेंडरची सबसिळी जमा झाली म्हनतात… ते उजोला योजनेचं कनेक्शन घेल हाय ना म्या… तेई पैसे काळून घेतो संगमंग…”

“राजा आबा… तूमाले कसं काय जुगाळ जमते हो हे ?”

“हे पाय गळ्या…आपले सारे कामं नियमानं असतात. कागदाले कागद जूळला की झालं…एवळई करून नाईच ज्यमलं तं पैसा फेको तमाशा देखो…”

“बेजाच काराबीन मानूस हा राजा तूमी आबा… अन् काहो.. पर्वाच्या दिवशी काय आनलं थैल्या भरू भरू…”

“ते फूकटचे तांदूई वाटप होतं ना कन्टोलात…आनले मंग…मायाजोळ दंलिदंर रेसेचं कार्ड हाय ना… आता सरकारनं आपल्याचसाठी पाठोल्यावर कायले सोळ्याचे…”

“गरिबईचे फायदे तं तूमीच घिऊन रायले…सारं दाबनं सुरु हाय “

“मी गरिबच हाव.भूमिहीन नाई काय मी.”

“काई बोलता बावा… बारा एकराचे मालक अन् भूमिहीन…”

“असं तू म्हनतं…गाव म्हनते… कागदं थोळीच म्हनतात.”

“काहो आबा…त्या शंकरच्या घरी चकरा काऊन मारता हो तूमी…”

“तो सायाचा शंकऱ्या… दोन सालापासून माये पाच हजार रुपये दिऊनच नायी रायला अन् व्याजई नायी देलं ससरीच्यानं…”

“ऑ…काय सांगता… हेई धंदे करता काय ?”

“अळीअळचनीत कामा पळा लागते लोकईच्या… तेईचई भागते अन् आपलंई जमते…”

“तरी तूमाले फूकटचे तांदूई भेटतात… कमाल हाय राजा तूमची ?… कोनत्या पोराच्यात असता ? मजा असन बॉ तूमची तं…”

“बूडा बूडी अलग राह्यतो आमी.बरं झालं घरकूल भेटलं मले…योजना हायत अन् आमी… मंग कायचीच नई आमाले कमी… पन कितीकई करा…सायचेईले कायी नावच नयी…”

“मंग कायले एवळा कातोळा करता ?”

“नातईत लय जिव हाय ना माया… असं वाटते तेवळच करून ठेवाव तेईच्यासाठी…”

“खाना गरीबईच्या योजना अजून …सरकारले चुना लाऊ लाऊ… करा चोरईचं धन …”

“काय म्हणतं रे… मोठ्यानं बोल जरा…”

“कई नायी आबा…
तूमचं मन लय मोठं हाय म्हतलं…”

“हवं…ते तं हायच गळ्या…शेवटी काय संग येते…”

“आबा एखांदी गाळी घ्या ना हो…”

“काह्यले गाळी घ्या लागते बे…तूया सारखे लय भेटतात… दाखोला हात की नेतात बसून… अन् गाळी तं घिऊ पन् पेट्रोल…चारान्याची कोंबळी अन् बारान्याचा मसाला…इमर्जन्सीले अॅटो जिंदाबाद हायतच…”

“हे लॉकडाऊन सुरू होयाच्या पह्यले तं तूमी लयच खेप अॅटोत दिसले ? काय गरबळ होती ?”

“त्या झेडपीच्या बकरेईच्या स्किम साठी पंचायत समितीत अर्ज केलता… तेच गरबळ…जमते आपलं… कागदंपत्रईसयीत सारी सेंटीग लागली…”

“तूमचे लयच कनेक्शन हायत राज्या जिकळे तिकळे…”

“तूयई अशील कायी तं सांगजो… कोनत्याई योजनेचं काम पळो…मायाजोळ येजो..दिल जूगाळ बसून तूयं….”

“जरा गरिबईच्याई आंगी लागू द्या ना… निरा आपलच घोळं दमाटता काय ?”

“ते जाऊ दे… मले हे सांग की,हे लॉकडाऊन कधी उघळते ? मानसाले हिंड्यालेई नायी भेटून राह्यलं…”

“बातम्या पायत नसता काय….वाळलं आखिन ते…लोकईले जिवाची पळली अन् तूमाले हिंड्याची पळली…या वयात सोबते काय राजा…जाऊ द्या बावा.. कुठी उतरता हे सांगा पह्यले ?”

“त्या नाक्याजोळच्या बँकेपाशी… हे पाह्य…मायं घंटाभऱ्यातच होते…मले यीव देजो वापीस तूयासंग घरी.थांब थांब… उतरू दे मले…अतीच येजो मले घ्याले…नाईतं वाट पाह्याले लावशील…”

“हव…अती भेटले तं भेटले… वरते नका भेटू…”

“ऑ… काय म्हटलं… मोठ्यानं बोलं…”

“काई नाई… अतीच भेटजा म्हटलं…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *