चंद्रपूरच्या लालपेठ भागातील विशाल एकपाषाणीय प्राचीन गणेशमूर्ती

चंद्रपूरच्या लालपेठ भागातील विशाल एकपाषाणीय प्राचीन गणेशमूर्ती

चंद्रपूर शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर लालपेठ हा शहराचाच एक विस्तारीत भाग आहे. या परिसरात १६ अतिभव्य कातळ कोरीव मूर्तींचा समूह आढळून येतो. या मूर्तींना स्थानिक लोक त्यांच्या याच अतिभव्य आकारामूळे ‘रावण’ म्हणून संबोधतात; तर चंद्रपूर जिल्हा गॅझेटियरमध्ये त्यांचा उल्लेख ‘लालपेठ एकाश्म’ म्हणून केला गेला आहे. या मूर्ती त्यांच्या कलात्मक उत्कृष्टतेपेक्षा प्रामुख्याने त्यांच्या अतिविशाल आकारासाठी ओळखल्या जातात. या सगळ्या मूर्ती एका प्रचंड शिवलिंगाभोवती जमिनीवर इतस्तत विखुरलेल्या आढळून येतात. यातील अनेक मूर्ती त्यांच्या भव्य आकारामुळे आणि प्रचंड वजनामुळे अन्य ठिकाणी हलविणे खूपच अवघड आहे. त्यामुळे त्या कदाचित आहे त्याच ठिकाणी एकाच विशाल खडकातून कोरीवकाम करून घडविला असाव्यात असे वाटते. यातील सर्वात मोठी मूर्ती दशमुखी दुर्गेची असून ती मूर्ती २५ फूट लांब आणि १८ फूट रुंद असून तिचे वजन साधारणत: ५७ टन इतके आहे. या मूर्तीमध्ये दशमुखीदूर्गे शिवाय अन्नपूर्णा, काली, गंगा, हनुमान, भीम, नंदी, नाग, गरुड आणि त्यासोबत विष्णूच्या मत्स्य तसेच कुर्मावतारातील मूर्तींचा समावेश होतो.

१७ व्या शतकाच्या सुरुवातीला गोंड राजा धुंड्या रामशहाच्या कारकीर्दीत रायप्पा नावाच्या कोमटी धनिकाने या जागी एक अतिभव्य शिव मंदिर उभारण्याचे योजले होते. त्या मंदिरासाठी या विशाल मूर्ती घडविण्यात आल्या होत्या. परंतु हे मंदिर बांधून पूर्ण होण्यापूर्वीच रायप्पाचा मृत्यू झाल्याने मंदिराचे काम अर्धवट राहिले. या मूर्त्यांच्या प्रचंड आकारावरून नियोजित मंदिराच्या भव्यतेची कल्पना केली जाऊ शकते. हे मंदिर पूर्णत्वास आले असते तर कदाचित महाराष्ट्रातील सर्वात भव्य मंदिर म्हणून ओळखले गेले असते.

या मूर्तींमध्ये गणेशाच्या दोन मूर्ती असून त्यातील एक मूर्ती ११ फूट उंच आणि ८ फूट रुंद अशी एकपाषाणीय विशाल मूर्ती आहे. डाव्या सोंडेची ही विशाल गणेश मूर्ती अतिशय सुबक आणि रेखीव असून कमालीची आकर्षक आहे. एका मोठ्या पाषाणाच्या पृष्ठभागावर या गणेश प्रतिमेचे सुंदर कलात्मक कोरीव काम झाले आहे. या तेजःपुंज देखण्या मूर्तीच्या पायाशी त्याच पाषाणात एक सुंदर मूषकसुद्धा कोरण्यात आला आहे. मोकळ्या मैदानात उंच जागेवर काहीशा तिरक्या स्वरूपात उभ्या केलेल्या या भव्य मूर्तीवर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी होणाऱ्या सूर्यकिरणांच्या मुक्ताभिषेकामूळे ही गणेश मूर्ती अधिकच विलोभनीय आणि नितांत सुंदर दिसू लागते.

(लेखन व माहिती संपादन – अमित भगत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *