“साहेब सोनं नको पण बैल वाचला पाहिजे,” शेतकऱ्याचं ‘हे’ प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

“साहेब सोनं नको पण बैल वाचला पाहिजे”

शेतकऱ्याचं ‘हे’ प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बैल पोळ्याच्या पुजेनंतर घडली होती ‘ही’ घटना

शेतात दिवसदिवस राबणाऱ्या शेतकऱ्यांचे बैलंच त्याचे खऱ्या अर्थाने जोडीदार असतात. बारा महिने मालकासोबत त्याचे बैलं शेतात राबत असतात, म्हणूनच शेतकऱ्याचेही त्याच्या बैलावर जीवापाड प्रेम असते. याच प्रेमाचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील वायरा या गावातील  एका घटनेतून आला आहे.

पोळा सणाच्या दिवशी एका गृहिणीने बैलांचे औक्षण करून सोन्याचे मंगळसूत्र बाजुला ठेवले असता, ते नकळत बैलाने खालले. परंतु मालकास याची खात्री नव्हती. शेवटी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बैलाचा एक्स-रे काढण्याचे ठरले व बैलास मांडवगण फराटा, ता शिरूर, जि. पुणे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. एक्स-रे काढल्यानंतर मंगळसूत्र पोटात असल्याचे निदान झाले. त्यानंतर  बैलाच्या पोटातील मंगळसूत्र आज(शनिवार) शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्याचे ठरले होते. डॉ भारती हे शस्त्रक्रिया करणार होते.

मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वायरा येथील असलेले बैलाचे मालक दादासाहेब झानजे हे खूपचं हळवे असल्याने, त्यांचे मन आपल्या लाडक्या बैलाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार होत नव्हते. एखाद्या शेतकऱ्याचे आपल्या बैलावर किती प्रेम असते, याचा प्रत्यय सोनं बैलाच्या पोटातचं आहे आणि शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे समजल्यावर त्यांच्या डोळ्यात आलेल्या पाण्यावरून आला. यावेळी त्यांचा आवाज गहिवरला अन् त्यांनी सांगितले की, डॉक्टर साहेब मंगळसूत्र फक्त ५० ते ६० हजाराचं आहे, माझ्या बैलाला त्याचा त्रास होणार नसेल आणि माझा बैल जर शस्त्रक्रियेनंतर अधू होणार असेल तर सोने पोटातच राहुद्या.

याबाबत बोलताना पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, न्हावरा, शिरूर, जि. पुणे येथील पशुधन विकास अधिकारी, डॉ दिपक औताडे म्हणाले,  ”याला म्हणतात प्रेम, खरे प्रेम काय असते हे फक्त शेतकऱ्यांकडूनच शिकावे, मी त्या पशुपालकास शस्त्रक्रियेसाठी तयार केले. कारण बैलाला काहीही होणार नव्हते. आज बैलाची शस्त्रक्रिया देखील ठरली होती. मात्र, सुदैवाने आज सकाळीच ते मंगळसूत्र बैलाच्या रवंथ करण्यातून बाहेर पडले. शक्यतो असे कधी घडत नाही, कारण जड वस्तू पोटात खाली बसते व रवंथ करण्यामुळे वर येत नाही, अगदी क्वचित घडणारी घटना आहे. याबाबत बैलाचे मालक दादासाहेब झानजे यांनी मला फोन करून सांगितले, त्यावेळी त्यांना झालेला आनंद आवाजावरून लक्षात येत होता.”  शेतकऱ्यास आपला बैल किती प्रिय असतो हेच यावरून दिसून आले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *