◼️ वैचारिक लेख :- वाचनानंबी घडती माणसं

_वाचन संस्कृतीचे जतन :_

📖  वाचनानंबी घडती माणसं 📖

✍🏻 लेखक : ~ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे.

            सृष्टीचं सौंदर्य नाना रंगांनी फुललं आहे. तीच्या त्या सौंदर्यात ज्ञानाची भंडारं भरलेली आहेत. म्हणून ज्ञानार्जनाची तृष्णा प्रत्येक सजीवाला कासावीस करित असते. त्यासाठी पांच ज्ञानेंद्रिय उपयुक्त असल्याचं शास्त्रात सांगितलं आहे. ते असे – १) डोळे, २) कान, ३) नाक, ४) जीभ आणि ५) त्वचा. परंतु या कामी सर्वात जास्त महत्त्वाचे इंद्रिय कोणते जर म्हटले तर ते आहेत डोळे! कारण साध्या दृष्टिक्षेपानेही पुष्कळ काही ज्ञान मिळविता येतं. बालविद्या किंवा शिक्षणातील वाचन आणि लेखन या अत्यावश्यक स्किल्स डोळ्यांमुळे चांगल्या अवगत करता येतात. दृष्टी अधू असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्यायी व्यवस्थेचे शास्त्रज्ञांनी संशोधन केले. ती ब्रेललिपी येथे अपवादात्मक बाब म्हणावी लागेल. अधिकाधिक ज्ञानार्जन करण्याची हौस मात्र डोळ्यांद्वारे वाचन करण्यानेच पूर्ण होऊ शकते. वाचनातून ज्ञान ग्रहण करण्याची ही एक मानवी संस्कृती म्हणणं संयुक्तिकच ठरतं. यासाठीच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बजावून सांगतात –
“सुंदर लिहिले अक्षर ओळी। स्पष्ट वाचणे पुस्तके सगळी।
जरा न दिसे टाळाटाळी। कोठेही कलावंताची ।।३०।।”
( पवित्र ग्रामगीता : ग्रामनिर्माण कला पंचक : अध्याय १३ वा )
एकदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात रात्रभर अडकून पडले. तरीही त्यांनी आपल्या शारिरीक तहान-भुकेची पर्वा केली नाही. मात्र त्यांना रात्रभर ग्रंथ वाचण्यास ही सुवर्णसंधी चालून आली म्हणून आनंदच झाला होता. हे येथे उल्लेखनीयच! ज्याला खरोखर वाचनाची गोडी आहे, सवय आहे. त्याला काहीतरी पण वाचल्याखेरीज रहावत नाही. चैन पडत नाही. नुसते फाडफाड वाचणे महत्त्वाचे नाही तर समजपुर्वक वाचल्यानंतर त्यावर मनन-चिंतन करून चांगले बोध घेणे किंवा ज्ञानार्जन करणे आवश्यक असते. पुस्तक-ग्रंथ वाचनातून आपण टाइमपास करणे, विरंगुळा वा मनोरंजन आदी गोष्टी प्राप्त करू शकतो. आज घटकेला भारतात उच्चविद्याविभूषित लोकांची संख्या काही कमी नाही. परंतु नित्यनेमाने वाचन संस्कृती जोपासणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस म्हणजेच ‘दिन दुनी अन् रात चौगुनी!’ अशी रोडावत चालली आहे. याचीच सल बोचतंय मनाला! म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी आदर्श गावकऱ्यांना बहुमोलाचा सल्ला प्रक्षेपित केला आहे – पवित्र ग्रामगीता : अध्याय १३ वा : श्लोक क्र. १०३ –
“सुंदर असावे वाचनालय। नाना ग्रंथ ज्ञानमय।।
करावया सुबुध्दिचा उदय। गाव-लोकी।।”
माझ्या बालपणी वाचनालये किंवा पुस्तके-वर्तमानपत्रे यांची संख्या फार कमी प्रमाणात उपलब्ध होती. हौशी वाचकांना वाचन करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असे. एखादं फेकलेलं कागद अथवा जुनं जीर्ण पुस्तक जरी दृष्टीस पडलं तरी ते नीट सरळ करून, तुकडं न तुकडं जोडून वाचनानंद घेण्याचा अलबतच प्रयत्न केला जाई. त्यातील आशय काय बरं असेल? हे खुप विचारांती ताडण्याचा प्रयत्नही होत असे. आज वर्तमानपत्रे पान टपऱ्यांवर, दुकाना-दुकानात व वाचनालयात नुसतेच पडून असतात. मात्र वाचक मंडळी मिळत नाहीत. मिळालेच तर ओव्हर् लुकिंग, वरवरची पाने चाळणारे अधिक असतात. त्यातील मधले महत्त्वाचे पान वगळून नुसत्या पाल्हाळ बातम्या वाचल्या जातात. कोण मेलं? कोण वाचलं? कोण जिंकलं? कोण हरलं? कुठं चोरी झाली? कुठं मारामारी झाली? अपघात कुठं घडलं? कोणतं महाराज कुठं पुराण-पोथी सांगणार आहे? कोण मंत्रीमहोदय काय योजना आणताहेत? आत्महत्या, चमत्कार, बलात्कार, मनोरंजन व हास्य महोत्सव इत्यादी कुचकामी गोष्टींचं नुसतं कसं चर्वाचर्वण होत असतं. महत्वाचं मुखपत्र, संपादकीय, बोधप्रद लेख किंवा काव्यांजली आदी ज्ञानवर्धक स्तंभांना डावल्लं जातं. खरतर कुटूंब, समाज, गाव, जिल्हा, राज्य व देश उत्तरोत्तर कसा उन्नत-प्रगत होत जावा? यासाठी प्रयत्नशील राहता यावं म्हणून वाचन-संस्कृती जोपासलीच पाहिजे : पवित्र ग्रामगीता : अध्याय १३ वा : –
“काय चालले गावामाजी। कळावे गावी सहजासहजी।
म्हणोनि वृत्तपत्रे असावी ताजी। आकाशवाणीही त्याठायी ।।१०४।।”
काही महाभाग तर स्वतः वाचून झालेले वृत्तपत्र कसेही टाकतात, फेकतात. कोणी चुरगाळून चोळामोळा करून ठेवतात. कोणी त्यावर बसतात. कारण त्याची किंमत आता त्याच्यापुढे “रद्दी” ठरलेली आहे म्हणून…! टपरीवर ते फुकटात वाचण्यासाठी मिळालेले आहे म्हणून! तर कोणी आपल्या दिड शहाणपणाची चुणूकच दाखवून देतात. जसे – सामानाची यादी, सट्टापट्टीची गॅसिंग, मित्रांचे मोबाईल नंबर लिहणे किंवा आपल्या वृत्ताची कटिंग इत्यादींसाठी ताज्या वृत्तपत्राचा कोपरा, किनारा किंवा मध्यभाग बेमुर्वतपणे फाडून टाकले जाते. “माझ्यासाठी ते रद्दी ठरत असेल, परंतु ते अजूनही न वाचलेल्या व्यक्तीसाठी ताजे आहे!” अशी आम्हाला बुध्दी केव्हा येईल? कमीत कमी आजचा एक दिवस तरी तसे करणे टाळावयास नको का? ज्ञानार्जनाची तृष्णा असणारा खरा वाचक तोच असतो. ज्याला काय वाचावं? कसं वाचावं? आणि का वाचावं? ते कळतं. त्यावर सांगोपांग विवेचन पवित्र ग्रामगीता : आदर्श जीवन पंचक : अध्याय ४१ वा : ग्रंथ महिमा येथे पटवून दिलेले आहे –
“ग्रामी विचारी शिक्षकजन। त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण।
सकळास द्यावी समजावोन। लहान-थोरां जमवोनि ।।११९।।”
आपणास वाचून झालेली पुस्तके, शास्त्रे, ग्रंथ किंवा नियतकालिके फेकून देण्यास – फाडण्यास कोणी सांगितले? “वाचनानं बी घडती माणसं!” असं म्हटलं जातं. त्याची हीच का फलश्रुती? माणूस हमखास बिघडतोच, हेच त्या वाक्यातून गुपित सिद्ध तर करणं नसेल ना? “वाचाल तर वाचाल!” म्हणत शिक्षणसम्राट महात्मा जोतीबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले या दाम्पत्यांनी सर्वांना आग्रहाने बालविद्या शिकविण्यात आपले अख्खे जीवन बरबाद केले. त्याचे कालांतराने दिसू लागलेले ते हेच का फलित? आपल्या देशातील पुष्कळशा लोकांना जादूटोणा, जारण, मारण, तारण, वशिकरण, पूजापाठ, अश्लील कथा, राशीफळे इत्यादी अचकट विचकट साहित्य वाचून ते जपून ठेवले जाते. तर चारित्र्यवर्धक साहित्याची मात्र वाट लावण्यात येते. किती मोठी ही घोडचूक? अशी आपली वाचन-संस्कृती काही सांगत नाहीच. म्हणून संत-सज्जन चांगले ज्ञानवर्धक साहित्य वाचनांकडे आम्हाला वळण्यास प्रेरित करतात, ते योग्यच नाही का?
“म्हणोनि सांगतो खरे, ऐक। ग्रंथ वाचावे चारित्र्य सम्यक।
राहणी कळेल ज्यात उद्बोधक। रोजच्या व्यवहाराची ।।७४।।”
( पवित्र ग्रामगीता : अध्याय ४० वा : ग्रंथाध्ययन )

◼️ ✍️ श्री.  कृष्णकुमारगोविंदा निकोडे गुरुजी,
मु.पिसेवडधा, पो.देलनवाडी,
त.आरमोरी, जि.गडचिरोली.
मो. नं.९४२३७१४८८३
E-mail : nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *