◼️ काव्यरंग :- कविता

कविता म्हणजे एक स्वप्न
कवीला पडलेलं
सरस्वतीने दिलेलं वरदान
तिच्या निष्ठावंत पुजार्‍याला !

म्हटलं तर नुसतंच
माणसाच्या मनोवृत्तीचं दर्शन
नाहीतर अनेक ह्रुदयांचं
एकरुप स्पंदन !

अशाश्वतावरील शाश्वत विश्वास
नाही उगीच भरकटणं
वेड्या मनाला दिलासा
विचारांना लाभलेली दृष्टी !

दु:खावरील हळूवार फुंकर
सुखाची परिसीमा
गुदमरलेल्या भावनांना मुक्ती
चारचौघांची कहाणी !

श्रावण धारेचा लपंडाव
धुक्यातील दवबिंदू
वसंत ऋतूचे आगमन
सृष्टीचा सुंदर साक्षात्कार !

कळीचं उमलणं
भ्रमराचं गुंजारव
अल्लड बालकाचं खिदळणं
स्वच्छंद फुलपाखराचं मनोगत !

सागरातील भावतरंग
सरितेची उत्सुकता
चंद्राची बदलती कला
चांदण्यांची बरसात !

प्रेयसीची चंचलता
प्रियकराची व्याकुळता
तारुण्याचा उंबरठा
मिलनाची चाहूल निष्पाप !

वाळवंटी आभास मृगजळाचा
मंद वार्‍याची झुळूक
सप्तसूरांची सुरेल रचना
शब्दफुलांची रंगावली !

एक निरागस सत्य
एक अनुभूती अलौकिक
एक प्रतिभेचा उत्कट अविष्कार
एक अतिसुंदर कवीकल्पना !

◼️✍️ “प्रिया प्रकाशची”
 सौ. प्रिया प्रकाश गावडे, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *