◼️ वैचारीक लेख :- हरवलेली माणुसकी..

-ii हरवलेली माणुसकी ii-

               कोरोना सारख्या महाभयंकर राक्षसाने साऱ्या जगावर ताबा मिळवला आहे. सरकार मात्र दिवसागणिक लॉकडाऊन वाढतच चालले आहे. या कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवले. वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवणे , नमस्कार करून अतिथीचे स्वागत करणे, मास्कचा वापर करणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे. या सर्व गोष्टींचा माणसावर सकारात्मक परिणाम झाला. त्याप्रमाणे प्रत्येक बाबतीत ते काळजी घेऊ लागले मात्र , एका गोष्टीचा त्यांना विसर पडला.
सर्वांना परिचित असणारा पण फारसा खोल अर्थ माहित नसलेला शब्द ” माणुसकी” या कोरोना सारख्या राक्षसा मुळे माणसे एकमेकांना घाबरत आहेत. प्रत्येकजण एकमेकांकडे पाहताना संशयी नजरेने पाहत आहेत. आज कोरोनामुळे माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहे.
पूर्वीच्या काळी समाजातील माणसे एकमेकांना मदत करत होती, सुख दुःखातही सहकार्य करत होती.आज तशी परिस्थिती राहिली नाही. ” देवा देवा धाव रे , माणसा मला पाव रे ” आज अशी म्हणण्याची वेळ आली आहे. माणुसकी म्हणजे तरी काय ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. माणूसकी म्हणजे प्रेम , माणुसकी म्हणजे जाणीव , माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर तर माणुसकी म्हणजेच माणसातील माणूस बनून माणसाला निस्वार्थपणे केलेली मदत होय. आज या कोरोना मुळे समाजातील सर्व व्यक्ती स्वार्थी झाले आहेत.
आज सगळीकडे अनेक प्रसंग पाहून माणूसकीचा अंत झालेला दिसत आहे. आज बँकेत वयस्कर लोकांनी स्लीप भरून देण्यास विनंती केली तर सगळे जण त्यांच्यापासून लांब पळत आहेत. रस्त्यात एखाद्याची गाडी बंद पडली तर ती सुरू करून देण्यास किंवा त्या व्यक्तीला मदत करण्यास कोणी तयार होत नाही, एखादी व्यक्ती रस्त्यात चक्कर येऊन पडली तर पाणी देण्यास कोणी तयार नाही तसेच अपघात झाला तर त्यांना मदतीचा हात देण्यास कुणाचीही तयारी नाही. आज आपल्या घरातील एखादा जवळचा नातेवाईक वारला तरी त्याच्या अंत्यविधीसाठी जाण्याची तयारी लोकांमध्ये दिसत नाही. आपल्या आई वडिलांचा अंत्यविधी करण्यास देखील स्वतःची मुले घाबरू लागले आहेत. जीवा भावाची नाती सुद्धा स्वार्था पोटी अंध झाली आहेत.

        आज एखादया नातेवाईकांकडे जायला नकोसे वाटत आहे तर येणाऱ्या अतिथीला घरात घ्यायला नकोसे वाटत आहे. आज वाढदिवस, लग्नसमारंभ, साखरपुडा किंवा डोहाळे जेवण यासारखे शुभ कार्यक्रम असो किंवा अंत्यविधी सारखे अशुभ कार्यक्रम असोत या कोणत्याही कार्यक्रमाला लोकांचा न जाण्याचा सूर आहे. माणुसकी बरोबर प्रेम, आपुलकी ,जिव्हाळा व नाती त्या सर्वांची आहुती होत आहे तसेच मुक्या प्राण्यांबद्दल देखील प्रेम नष्ट होत चालले आहे . आज असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळत आहेत.
२७ मे २०२० रोजी नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीणीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. काय दोष होता त्या गर्भवती हत्तीणीचा ? तिला भूक लागली म्हणून तिने अननसासारखे फळच खाल्ले ना ! नराधम वृत्तीच्या माणसाने त्या अननसामध्ये देखील फटाके भरून ठेवले तिने ते खाताच फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड , जीभ फाटली तिने त्या अवस्थेत कोणत्याही माणसाला त्रास दिला नाही तर ती सरळ शांतपणे नदीत उभी राहून तिने आपले प्राण सोडले. माणसातील माणुसकी तर संपलीच पण त्या मुक्या प्राण्यांबद्दल असणारी माणुसकी देखील नाहीशी झालेली दिसत आहे.
आज कोरोना सारखा महाभयंकर राक्षस जरी आला असला त्याचा संहार सर्वांनी मिळून केला पाहिजे. स्वतःच्या सुखापुढे जग संपले असा गैरसमज लोकांमध्ये पसरता कामा नये . माणसातील माणुसकी टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे आणि हे मानव जातीच्या कल्याणासाठी आवश्यक आहे आपला भारत देश अखंड ठेवायचा असेल तर..

हीच आमुची प्रार्थना
हेच आमचे मागणे..
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे..

🔶  सौ. रोहिणी सचिन चौधरी ,
नू. म. वि.मराठी शाळा, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *