आराधना…
( अभंग रचना )
प्रथम पूजेचा ! मान गणेशाचा !
इष्ट तो सर्वांचा ! गणराया !!१!!
ओंकार प्रार्थना ! वंदू गजानना !
करू आराधना ! गणेशाची !!२!!
पडता संकटी ! आठवावे रूप !
साठवावे खूप ! मनामध्ये !!३!!
पूजूनी अर्चना ! भाकावी करूणा !
आवडे तरूणा ! चिंतामणी !!४!!
सर्वांग सुंदर ! रूप गणेशाचे !
स्मरा नित्य वाचे ! अवघेचि !!५!!
शेंदूर चर्चिला ! कंठी मोती माळ !
विशाल ते भाळ ! श्री मोरया !!६!!
बुद्धीचा प्रदाता ! तूच सुखकर्ता !
अन् विघ्नहर्ता ! विघ्नेश्वर !!७!!
गणांचा नायक ! तू प्रतिपालक !
सृष्टीचा चालक ! गणपती !!८!!
तेजाचे स्वरूप ! अष्टविनायक !
ज्ञान प्रदायक ! एकदंत !!९!!
म्हणे श्रीगणेश ! नित्यची भजावा !
ईश तो पहावा ! सर्वांभूती !!१०!!