◼️ प्रासंगिक लेख :- मोरया पार्वतीनंदना, कोरोनाला हरवाना ! (भाग – २)

“श्रीगणेशोत्सव” विशेष लेख

मोरया पार्वतीनंदना, कोरोनाला हरवाना ! (भाग – २)

                    हे विघ्नहर्त्या, तुझ्या मूर्तीचे विसर्जन का करण्यात येते? त्यातील गुह्य तुझ्या प्रेमळ लेकरांना, भक्तांना व भाविकांना कळू दे. सद्वस्तू जो आकार धारण करते तो आकार, मूर्ती अथवा शरीर पुढे नष्ट होणार आहे, नाशवान आहे आणि जे मूळ तत्व निराकार आहे. तेच तुझे रुप अविनाशी आहे, अमर आहे. होय ना रे मोरया? हे ओळखून प्रत्येक मनुष्याने सजीव प्राणी, मानवमात्र, वृक्ष, वेली यांसर्वांशी प्रेम, दया, माया, करुणा व आपुलकीने वागले पाहिजे. तो एकमेकांशी समता, एकत्व, बंधुभाव, सहकार्य, मान-मर्यादाशील, विश्वास ठेवून वागावा. त्याने चालणे, बोलणे, उठणे, बसणे, वागण्यांमधून सदाचार, सत्यवचन, सद्विचार, सत्कर्म, परोपकार आणि अहिंसकवृत्ती जोपासली पाहिजे. माणूसकी किंवा मानवता हाच सद्धर्म म्हणून अंगिकारले पाहिजे. कारण वं.रा.संत तुकडोजी महाराजांनी पवित्र ग्रामगीता ग्रथांत कोरून ठेवले –
“गणेश शारदा आणि सद्गुरू । आपणचि भक्तकाम कल्पतरू ।
देव देवता नारद तुंबरू । आपणचि जाहला ।।”
हे मंगलमूर्ती ! बाप्पा तुझ्या मूर्तीचे भक्तीभावाने विसर्जन शुद्ध पिण्याच्या पाण्यात, तलावात, विहीरीत, नदीत, ओढ्यात, बांधात किंवा धरणात केले जाते. हे योग्य का रे? त्यामुळे तेथील पाणी प्राण्यांना, माणसांना पिण्यायोग्य राहिलच कसे? यावर्षी तर गडचिरोली जिल्ह्यात पाऊस कमी पडला. त्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. पाण्याच्या दुर्भिक्षाने जीवांच्या कंठी प्राण आला आहे. म्हणून तुझ्या भक्तांना ही सुमती दे. पाण्याचे महत्त्व त्यांना कळू दे. मूर्ती विसर्जनासाठी काही तरी वेगळी तजवीज करावयास लाव. ते टाके, हौद, रांजण बांधतील किंवा बादली-टबमध्ये पाणी घेऊन तेथे मोठ्या श्रद्धेने मूर्ती विसर्जित करतील. मूर्तीवरील निर्माल्य – फुले, बेलपत्री, दुर्वा, फळे किंवा पुष्पमाला एकत्रित करून, जमिनीतील खड्ड्यात मोठ्या सन्मानाने, समादराने पुरून टाकतील. सर्वत्र चकाचक स्वच्छता नांदेल. तळ्यात वा नदीच्या धारेत निर्माल्य अर्पण केले तर निर्मळ पाणी कुजकट, घाणेरडे, साथ रोगांना आयते निमंत्रण होईल रे पार्वतीसुता ! दया कर, कृपा कर, करुणाकरा !!
“रिद्धी सिद्धी सेवा करती, सिद्धी हे विनायका ।।
सरस्वती सुरवर पुजती, तुला गणनायका ।।
हो प्रसन्न मंगलमय, हे पतित पावना ।।
प्रथम वंदना ही तुला, थोर हे दयाघना ।।”
मनात खुप श्रद्धा बाळगून तुझे भक्तशिरोमणी अष्टविनायक, सिद्धीविनायक, गणपतीपुळे, तिरूपती बालाजी, चिंतामणी इत्यादी पावन तीर्थक्षेत्री फिरून देवदर्शन व करोडो तीर्थयात्रा करीत असतात. तुझे तर अवतारकार्य, मातृ-पितृभक्ती, सेवा, सुश्रूषा ही करोडो तीर्थयात्रा, देवप्रदक्षिणा याहूनही श्रेष्ठ आहे. हे तू प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून दिले आहेस. तू तुझे अर्थात त्रिलोकांचे माता-पिता म्हणजेच उमा-शंकर यांची षडोपचारे पूजा करून ब्रह्मांड प्रदक्षिणेचा, तीर्थाटनाचा बहुमान मिळवला होतास. त्यामुळेच आज तुला आद्यपूजेचा अग्रपूज्य दैवत म्हणून संबोधले जाते. याचे तुझ्या निस्सीम भक्तांना विस्मरण कसे काय होऊ देतोस? ही भक्तीची तुला प्रसन्न करण्याची नामी युक्ती सर्वांच्या मस्तिष्कात उतरव. वेळ, पैसा, श्रम, प्रसंगी अपघाती प्राणही गमावून बसतात, बिच्चारे भक्तश्रेष्ठ ! अशा तुझ्या लडिवाळ, निष्काम भक्तांच्या मनमंदिरात तुझी प्राणप्रतिष्ठा का करून घेत नाही रे बाप्पा? असे जर खरोखर झाले ना, तर तुझ्या भक्तांची तुला भेटण्याची व प्रसन्न करून वरदान प्राप्तीसाठी होत असलेली भटकन पार दूरच होईल बघ ! म्हणून हे कोरोना विघ्न घालव व सर्वांना खबरदारीची सुमती दे. तिची प्रकाश ज्योत अखिल मानव मात्रांच्या कल्याणार्थ निरंतर तेवत राहू दे.
!! गणपती बाप्पा मोरया !! मंगलमूर्ती मोरया !! यावे सदा विघ्न हराया !! [ समाप्त ]

नेहमी वाचत रहा “चंद्रपूर सप्तरंग” एक आनंदाचे अविभाज्य अंग!

प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास,
मु.रामनगर वार्ड क्र.२०,गडचिरोली.
जि.गडचिरोली,भ्र.ध्व. ७४१४९८३३३९.
ई मेल – krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *