शेळी कोणाची ? चौकीत न्याय सोडवला मुक्या प्राण्याने..

शेळी कोणाची ? चौकीत न्याय सोडवला मुक्या प्राण्याने..

एका शेळीवर दोघांनी दावा केला. माघार घेण्यास कोणीही तयार होत नव्हते. अखेर प्रकरण पोलिस चौकीत गेले. पोलिसांनाही प्रश्न पडला..आणि..मग..

उदयपूर (राजस्थान): एका शेळीवर दोघांनी दावा केला. माघार घेण्यास कोणीही तयार होत नव्हते. अखेर प्रकरण पोलिस चौकीत गेले. पोलिसांनाही प्रश्न पडला. पोलिसांनी दोन करडांना उपस्थित करण्यास सांगितले आणि एका करडाने आईकडे धाव घेत क्षणात न्याय सोडवला.

गावातील सरपंच आणि पोलिसांनाही या प्रकरणाचा छडा लावता आली नाही. पण, मुक्या प्राण्याने एका क्षणात हे प्रकरण मिटवले आणि सर्वांनाच चकित केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. उदयपूरमधील वल्लभनगर तहसील अंतर्गत खेरोदा पोलिस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला आहे. धोलाकोट गावात राहणारे बाबरु रावत यांची जंगलात चरण्यासाठी गेलेली शेळी हरवली होती. परिसरात आणि शेजारील गावात शेळीचा शोध सुरू केला. मासिंगपुरा गावात डांगफला येथे शेळी असल्याचे समजले. बाबरु शेळी आणण्यासाठी मासिंगपुरा गावात उंकारलाल रावत यांच्या घरी गेले. घराबाहेर शेळी बांधलेली दिसली. पण, उंकारलाल यांनी ती शेळी माझीच असल्याचे सांगितले. दोघांमध्ये शेळीवरून वाद सुरू झाला.

बाबरु यांनी गावातील पंचाना मदतीसाठी बोलवले. पण, वाद मिटला नाही. अखेर, प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतली. पण, दोघेही शेळीवर दावा करत राहिले. शेवटी, शेळी कोणाची हा प्रश्न त्याच मुक्या प्राण्यावर सोडण्याचा निर्णय झाला. पोलिस आधिकाऱ्यांनी वादग्रस्त शेळीच्या पिलाला घेऊन येण्यास दोघांना सांगितले. बाबरु आणि उंकारलाल काही वेळानंतर करडांना घेऊन आले. उंकारलालच्या करडाला शेळीने शिंगाने दूर सारले. पण, बाबरू यांच्या जवळील करडाने शेळीकडे धाव घेतली आणि दूध पिण्यास सुरवात केली. मुक्या प्राण्याचे न्यायाने उपस्थित आश्चर्यचकीत झाले. अखेर, पोलिसांनी शेळीला बाबरु यांच्याकडे सोपवले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *