विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असा भद्रावतीचा (जि. चंद्रपूर) वरदविनायक

विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असा भद्रावतीचा (जि. चंद्रपूर) वरदविनायक

नागपूर-चंद्रपूर मार्गावर, नागपूर पासून १३० किमीवर आणि चंद्रपूरच्या २५ किमी अलीकडे भद्रावती हे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. प्राचीन काळी दक्षिण कोसल राज्याची राजधानी असलेले भद्रावती किंवा भांदक हे शहर आज बौद्ध,जैन आणि हिंदू धर्मीयांचे पवित्र क्षेत्र आहे. ह्युएन त्संग (युआन श्वांग) या चिनी प्रवाश्याने ७ व्या शतकाच्या पूर्वार्धात भद्रावतीला भेट दिल्याचे उल्लेख आहेत.

भद्रावतीच्या दक्षिणेस ३ किमी अंतरावर असलेल्या गवराळा गावातील आसन तलावाजवळील टेकडीवर काळ्या पाषाणात बांधलेले वरदविनायकाचे प्रख्यात मंदिर आहे. वरदविनायकाचं हे प्राचीन मंदिर जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे.

या मंदिरात गणपतीची साडेपाच-सहा फूट उंचीची भव्य एकपाषाणीय मूर्ती असून, ही मूर्ती आत खोल गाभाऱ्यात स्थित आहे. गणपती मंदिराला १६ खांब असलेला भव्य सभामंडप आहे. मंदिराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला संरक्षक देवतेच्या स्वरूपात यक्षांच्या प्रतिमा आहेत. तिथेच उजव्या हाताला ४थ्या-५व्या शतकातील वाकाटककालीन शैलगृहे सुद्धा असून त्यात विष्णू, वराह, त्रिविक्रम व नरसिंह यांची शिल्पे आहेत. खोल गाभारा ओलांडून पायऱ्या उतरल्यानंतरच काळ्या पाषाणातील शेंदूरचर्चित आकर्षक मूर्ती दृष्टीक्षेपात येते. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. शेजारील यौवनाश्व मंदिर त्यावरील शिलालेखावरून चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य याच्या काळात इ.सन ११०४ मध्ये बांधले गेल्याचे समजते. वरदविनायक मंदिराचा कालखंड देखील बहुधा तोच असावा. मंदिराचे बांधकाम जरी १२व्या शतकातले असले तरी गणपतीची मूर्ती त्याहून प्राचीन असावी असे वाटते.

(लेखन व माहिती संपादन – अमित भगत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *