इमानदारी….
सांजवेळी पुन्हा सूर्य मावळाया लागला
आगंतुक आठवांचा डोळ्यात चंद्रमा दाटला…
वहीत माझ्या मृतावस्थेत गुलाब तुझा आढळला
मग तोडून वयाची बंधने सखे, मी गाव तुझा गाठला…
सावरत हाडांचा पिंजरा सोबतीला घेऊन वारा
एक एक पाऊल मी नजदीक तुझ्या टाकला…
वाट होती झोपलेली अन् मी होतो पेटलेला
मग पहाटेच्या सुमारास गाव तुझा लागला…
अनोळखी नजरेस माझ्या जो तो पुसे कोण तू
मी वास त्या गजऱ्याचा ज्याचा अता रंग उडून गेला…
तुझ्या गावात फिरतो खुलेआम तुझा अपराधी
सखे भेटून एकदा सुखी कर त्याच्या मरणाला…
निपचित तू अशी पडलेली जशी एक कहाणी संपलेली
बघ जराशी उघडून डोळे तुझ्या कहाणीचा भाग आला..
होती आधाराला काठी अन् नाव तिच्या सुकलेल्या ओठी
टेकून बसली, रडत हसली आज का रे रस्ता चुकला…?
होता तिच्याभोवती गोळा तिचा संपूर्ण गोतावळा
अन् हाजिर तिथल्या डोळ्यात होता एकच पावसाळा…
नजरेला नजर नव्हती आड चष्म्यांचे काच होते
सुरकुत्यांनी केली चौकशी प्रेम कसा आठवला….
मी फुटका मणी तरी नाही तुझ्या मंगळसुत्रात जरी
एवढीच माझी इमानदारी जागलो प्रेमाच्या सन्मानाला..
काही तरी विसरण्याचा भास अर्ध्या रस्त्यात झाला
वारा माझ्या सोबतीचा नव्हता माझ्या सोबतीला..
सांजवेळी पुन्हा सूर्य मावळाया लागला….