मनमळा
आठवण तुझी माझी
साठवायची मनात,
मन भरुन आले की
ओघळायची शब्दात…
शब्द चार,मनातील
त्यांची हृदयी स्पंदनं,
सांगायची होती फक्त
मनातील आंदोलनं…
दूरवर असणारे
तुझे आठवांचे गाव,
होते ते निमित्तमात्र
जागवण्यासाठी भाव…
आठविता नित्य तुला
मनी रुजतो वसंत,
बहरतो मनमळा
अन मिटवतो खंत…
नजरेची नजरेशी
ओढ सुप्त मिलनाची,
मनी,देही रुजवात
फक्त तुझ्या आठवाची…