◼️ प्रासंगिक लेख :- निरोप…✍️सौ.भारती सावंत, मुंबई

निरोप

देताना निरोप तुजला
लेकी का लवला डोळा
रहा सुखात सासरघरी
नातेसंबंध कर तू गोळा

                 मुलगी वयात आली की आई बाबांचे डोळे उगाचच पाझरतात. मनात अनामिक अशी हुरहूर दाटून येते. तिच्या बालपणीचा थाट आठवत ते दिवस घालवितात. माझी बारावीची परीक्षा झाली आणि आई-वडिलांनी स्थळे पाहायला सुरुवात केली. शिकायची खूप इच्छा असल्याने लग्नासाठी माझा विरोधच होता. परंतु आई-वडिलांनी समजावले, “स्थळे पाहायला सुरुवात तरी करू, लग्न होईपर्यंत १/२ वर्षे जातील आम्ही तुला पदवीचे शिक्षण पूर्ण करून देऊ”. नाईलाजाने येईल त्या स्थळापुढे पसंती, नापसंती करत कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात एक स्थळ पक्के झाले. आता शेवटचे वर्ष बाकी असतानाच लग्न झाले. परंतु सासर माहेरच्या संमतीने माहेरीच राहून शिक्षण पूर्ण करण्याचे ठरले. लग्नाच्या विदाईच्यावेळी माझ्या तिसरीत शिकणाऱ्या छोट्या भावाने अक्षरश: हंबरडा फोडला.साऱ्या वर्‍हाडी मंडळींचेही डोळे पाणावले. लाडक्या ताईला सोडून राहण्याची कल्पनाच त्याला असह्य झाली. निरोप देताना तो खूप रडला. निरोप…………… मग तो कुठलाही द्यायचा असो, डोळे ओलावतात. मुलगी सासरला जाताना, मुले परदेशात जाताना, शिकायला वस्तीगृहात जाताना किंवा कोणीही आप्तेष्ट हे जग सोडून जाताना डोळ्यांना आपोआपच पाझर फुटतो. त्यामुळे निरोपाचे असे सारे क्षणच भावनाप्रधान असतात. त्यात हृदयीचे मर्म गुंतलेले असते. त्यामुळे त्यात विलगीकरणाने होणारे दुःख असते.

                 निरोप मनुष्यातील आपल्यांना द्यायचा असो की देव देवतांना,वाईट वाटतेच. ढोल-ताशांच्या गजरात “गणपती बाप्पां की” अशा जयघोष, नाऱ्यांमध्ये वाजत-गाजत येणारे गणपती बाप्पा ११ दिवस आपल्या घरात अतिथिप्रमाणे राहतात. रोज आपल्याशी हितगूज साधतात. आपल्या मनीचे दुःख, व्यथा, सुख आपल्या सुपाएवढ्या कानात साठवून घेतात.आपण सकाळ संध्याकाळ आरती भजन गाऊन त्यांची आळवणी करतो.खायला चांगले चुंगले गोडाधोडाचे करतो. नैवेद्य दाखवतो. परंतु जेव्हा त्यांच्या विसर्जनाची वेळ येते तेव्हा हृदय आपोआपच सद्गदीत होऊन जाते.
मोरया रे तू बाप्पा
तुच खरा विघ्नहर्ता
ओवाळितो आरती
करिता जगाची चिंता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *