पुरग्रस्त भागाचा तातडीने सर्वे करण्याचे ना. वडेट्टीवार यांचे निर्देश

पुरग्रस्त भागाचा तातडीने सर्वे करण्याचे ना. वडेट्टीवार यांचे निर्देश

ब्रह्मपुरी येथील पुर परिस्थितीची पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केली पाहणी

बचाव कार्यासाठी 12 बोटी तैनात; 5 हजारांवर नागरिकांना काढले सुरक्षित बाहेर

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर: गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे 33 दरवाजे उघडले आहेत. यामुळे वैनगंगा नदीला पूर आला असून ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्त भागाचा तातडीने सर्वेक्षण करुन अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश  संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.

पूर परिस्थितीमुळे हजारो एकर भाताची शेती पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे. याठिकाणी भरीव व वाढीव मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य  सुरू आहे. त्याचप्रमाणे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 12 बोटी युध्दपातळीवर कार्यरत आहेत. तसेच 25 बोटी अतिरिक्त मागविण्यात आल्या आहेत. यावेळी रिलीफ कॅम्प मध्ये असणारे नागरिकांची खानपानाची व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी व्यवस्थे संदर्भात त्यांनी  माहीती घेतली.

ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावाला पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचबरोबर बेलगाव, चिखलगाव, बेटाळा, पिंपळगाव, निलज, कोलारी, अहेर नवरगाव, सुरबोडी, कोथुळणा, झिल बोडी, बोरगाव, किन्ही, पारडगांव, भालेश्नर सोंद्री,  खरकाडा, रनमोचन आदी गावात पुराचे पाणी शिरले आहे.पोंभूर्णा तालुक्यातील टोक हे गाव सुद्धा पाण्याने वेढले असून जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत बचाव कार्याची मोहीम सुरू आहे.

पूरग्रस्त भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे दोन पथके, एसडीआरएफची तीन पथके, इंडियन आर्मीचे दोन पथके तैनात आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस पथक, जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचावाचे तीन पथक दिवस-रात्र कार्य करीत आहेत. अतिरिक्त यवतमाळचे जिल्हा शोध व बचाव पथक मागविण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या जवळपास 5 हजारांवर नागरिकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून रिलीफ कॅम्प येथे ठेवण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे छतावर अडकलेल्या नागरिकांना फुड पॅकेट व शुद्ध पाणी पुरविल्या जात आहेत. पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर  उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *