◼️ प्रासंगिक लेख :- पितर पुण्यवानच ! मी महापापी !!

सर्वपित्री अमावास्या 

पितर पुण्यवानच ! मी महापापी !!

मी माझ्या पुजनीय आजी-आजोबांना चांगल्याप्रकारे ओळखून आहे. त्यांच्या तोंडून मी माझ्या पणजोबा, खापर पणजोबा व सर्व पितरांबद्दल ऐकले होते. मी त्यांच्याबद्दल एकही अवमानकारक, मानहानिकारक शब्द बदनामीचा सूर किंवा महापातकी सिद्ध करणारा प्रसंग ऐकलेला नव्हता. माझे एकंदरीत सर्वच वाडवडिल-पितर महा महा पुण्यप्रतापी होते. अशा माझ्या सद्गुणी, पुण्यवान, परोपकारी, सुसंस्कारी, सुशील व सज्जन पितरांचे आत्मे अतृप्त-भूतयोनीद्वारे कसे काय इतरत्र भटकत असतील? ते अजिबात शक्य नाही. पुण्यशील व सज्जन मनुष्याचा आत्मा नेहमी मोक्षपदाला जातो अन्यथा तो नर-जन्माला जातो. असे आध्यात्मिक शास्त्रे गर्जून सांगतात. माझ्यासारख्या अत्यंत पापी, कोपी, तापी, हत्यारा व दुर्गुणी माणसाचा आत्मा नरक यातना भोगून इतर घाणेरड्या जीवाच्या जन्माला धाडला जातो. असेसुद्धा ती शास्त्रे बजावून सांगतात. प्रत्येक मनुष्य आपापल्या कर्मांच्या जोरावर पुण्यवंत किंवा पापी या वर्गिकरणाद्वारे विभागला जातो. त्यानुसार माझे वाडवडिल व इतर पितर मृत्युपश्चात हमखास मोक्षालाच गेले. म्हणून मी अगदी ठामपणे, छातीठोकपणे अभिमानाने ओरडून सांगतो, “माझ्या पुण्यवान पितरांना मोक्ष लाभावे म्हणून पितृपक्षात किंवा कधीही श्राद्धरूपाने पिंडदान-द्रव्यदान करण्याची मला काहीच गरज वाटत नाही !” कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात –
“ज्याची पसरेल अपकीर्ति । त्यासी कैसी मिळेल मुक्ति ।।६०।।
कीर्ति तोचि स्वर्ग खरा । अपकीर्ति नरकाचा पसारा ।।६२।।”
( पवित्र ग्रामगीता : संस्कार शोधन पंचक : अध्याय २२ वा : अंत्यसंस्कार.)
पुर्वी उच्चवर्णीयांच्या ताणाशाही, जुलमी व हुकूमशाही प्रवृत्तीमुळे हे विचित्रच घडत गेले. माझ्या वाडवडिलांना ‘पितृमोक्ष अमावास्या’ ही श्राद्ध करणे म्हणजे दान-पुण्य अर्पण करणे व कागोरी टाकण्यास सक्तीनेच भाग पाडले जात असे. त्याकाळी बहुजन समाज हा बारा बलुतेदार व बारा अलुतेदार या दोन भागात विभागला गेला होता. या दोन्ही विभागांवर पुरोहित वर्गाचे विशेष वर्चस्व होते. त्यात बलुतेदार असे होते – जे गावचे वतनदार होते – १) सुतार, २) लोहार, ३) महार, ४) मांग, ५) कुंभार, ६) चांभार, ७) परीट, ८) न्हावी, ९) भट, १०) मुलाणा, ११) गुरव आणि १२) कोळी. तर अलुतेदार जे बलुतेदारांपेक्षा खालच्या दर्जाचे कामगार होते – १) तेली, २) तांबोळी, ३) साळी, ४) माळी, ५) जंगम, ६) कळवांत, ७) डवऱ्या, ८) ‘ठ’कर, ९) घडशी, १०) तराळ, ११) सोनार तथा १२) चौगुला…. ( संदर्भ ग्रंथ : वासुदेव गोविंद आपटे कृत मराठी शब्दकोश : “मराठी शब्दरत्नाकर” : पृष्ठ क्रमांक २८ व ३९१. ) या सर्वांना सर्वपित्री पंधरवड्यात ‘पितृश्राद्ध’ करणे अनिवार्य व सक्तीचे मानले जात होते. कारण त्याच कालखंडात एक म्हण निर्माण करण्यात आली होती. ती अशी – “बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर!” त्यामुळे सारेच लोक समजून-उमजूनही उच्चवर्णीयांच्या भितीपोटी नुसत्या बोटांच्या इशाऱ्यावर नाचून सरसकट श्राद्ध लावू लागले. त्यांतून माझेही वाडवडिल काही सुटू शकले नव्हते. पण मला ते कळले आहे. ‘श्राद्ध’ याचा अर्थ पिंड देणे नसून श्रद्धेने पितरांचे स्मरण करणे, त्यांचे चांगलपण आठविणे, त्यांच्या प्रतिमेला श्रद्धेने आदरांजली वाहून दंडवत प्रणाम करणे होय, असे मला वाटते. म्हणून मी जगजाहीरपणे सांगतो, “माझ्या संतासमान सज्जन पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी माझ्याकरवी पिंडाला काकस्पर्शाची मुळीच आवश्यकता नाही!”
अनंत चतुर्दशी ते सर्वपित्री अमावास्येपर्यंत १५ दिवसांच्या कालखंडास ‘पितृमोक्षाचा पक्ष-पंधरवाडा’ म्हणतात. ज्यांचे आईवडिल मरण पावले आहेत, त्या सर्वांनी ‘श्राद्ध’ केलेच पाहिजे. अशी रूढी-परंपराच उदयास आणली गेली. असे म्हणतात की पितरांना जीवनभर ज्याची हाव, आस, इच्छा अथवा वासना होती. त्यांच्यात जे दुर्गुण (सद्गुण वगळून हं!) होते ते यावेळी उजागर-व्यक्त केले जावे. त्यांच्या आवडी-निवडी किंवा जिभेचे चोंचले पुरविले जावे. जसे मांस, मटण, मच्छी, झिंगे, खेकडे, गोडधोड अथवा तेलरांधा शिजवून नैवेद्य दाखवावे, अर्पण करावे. दुर्व्यसनी असल्यास विडी, सिगारेट, हुक्का, तंबाखू, गुटखा, खर्रा किंवा दारूही अर्पण करावे. अशी धारणा तयार झाली आहे. ही आपल्या पूजनीय पितरांची अवहेलना व शुद्ध बदनामी नाही का? माझे वाडवडिल कावळ्यांच्या जन्माला गेले आहेत. हे मला खरेच माहित आहे का? मुळीच नाही! म्हणून मी “कांव-कांव-कांव” असे ओरडून त्यांना बोलावू इच्छित नाही म्हटलं. त्यांच्या पुढ्यात कागोरी टाकून अन्न-पिंडदान केले ते कावळ्यांनी शिवावे, हे मला अजिबात रूचत नाही. कारण माझे परोपकारी, पुण्यमुर्ती पितर हमखास मोक्षपदी विराजमान झाले, अशी माझी दृढ निष्ठा व विश्वास आहे. मग अशा थोतांडाची त्यांना आता गरजच काय म्हणतोय मी! एखाद्या मेल्या अथवा जित्या माणसाची चुगली-चहाडी, निंदा-नालस्ती किंवा त्याच्यावर चिखलफेक-बदनामी करण्याचा मला अधिकार तरी दिला कुणी? त्यांची मी जन्मभर जगात अपकीर्ती-बदनामी करीत राहिलो तर ती माझी कृत्ये पुण्यवर्धक ठरून माझे पितर मोक्षाला जातीलच कसे? उलट ते तर नालायक व अघोरी असल्याचेच सिद्ध झालेले असेल! उठसूट पितरांची ईज्जत वेसीवर टांगणारा मीसुद्धा पुण्यप्रतापी, वंशाचा दीपक न ठरता मी महापातकी तसेच कुळ-नाशकच म्हणून अधिकच सिद्ध होईन आणि रव-रव नरकवासांत जाऊन धाडकन् तोंडघशी पडेन, हे मात्र तितकेच खरे! संत-परमेश्वर हीच जागृती प्रदान करतांना समज देतात – प.ग्रामगीता : संस्कारशोधन पंचक : अध्याय २२ वा : अंत्यसंस्कार –
“जिवंत असता रोटी ना दे | मेलियावरि वाजवी वाद्य ||
कावळ्यासि पिंड, इतरां दक्षणा दें | म्हणोनि साध्य काय त्याने? ||७७||
किंवा त्याचे गुणवैभव | श्रध्देने आठवावे सर्व ||
हेचि श्राद्ध असे अपूर्व | श्रद्धांजलि रुप ||८१||”
आपल्या वाडवडिलांविषयी आपल्या काया-वाचा-मनांत श्रध्दा,भक्ती, शालिनता,कृतज्ञता सन्मान,आदर-सत्कार आदी भाव उत्पन्न व्हावेत. त्यांच्या अवगुणांची कुठेही वाच्यता होता कामा नये. त्यांच्या दुर्गुणांवर मी नाही तर आणखी दुसरा कोण पडदा पाडेल? सांगा ना. याचा मलाच सांगोपांग विचार करणे भाग आहे. ग्रामीण भागात ‘कागोरी’ शब्द प्रख्यात आहे. त्याला मराठी प्रमाण भाषेत ‘कागवळी’ तर संस्कृत भाषेत ‘काकबलि’ असे शब्दप्रयोग केले जातात. याच शब्दाच्या बदल्यात सर्वत्र ‘श्राद्ध’ असेही म्हटले जाते. आम्ही पितरांचे सदैव ऋणी रहावे. आजीवन उपकार मानावे. त्यांच्याविषयी मनी-मानसी श्रद्धा बाळगावी. त्यांचे चरित्र अभिमानाने कथन-प्रकटन करावे. कीर्ती वाढवावी व गुणवैभवांना उंच शिखरावर फडकवावे. त्यांचे स्तुतीपाठ वाचन करावेत. त्यांच्या परोपकारी कार्यांची प्रेरणा घेत घेत आपणही गुणवंत, पुण्यवंत, मानवंत, धनवंत, कलावंत आणि नामवंत ठरत रहावे. हेच खरे श्राद्ध होय! दरम्यान या सत्यांपासून दूर लोटण्याचा काही समाजकंटक व विघ्नसंतोषी लोकांनी आजवर अतोनात प्रयत्न चालविले होते. त्यांनी धन-द्रव्य, सोने-नाणे, पैसा-आडका आदी गोष्टी केवळ दान-धर्माच्या नावाखाली लुबाडण्याचा-हडपण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. ते मला आता उमगू लागले आहे. म्हणून मी मोठ्या त्वेषाने सांगतो,”माझ्या पुण्यशील पितरांच्या मोक्ष-मुक्तीस्तव मला कावळ्यांना कागोरी टाकण्याची यत्किंचितही गरज नाही! कारण श्राद्ध म्हणजे ‘कागोरी’ नाही किंवा ‘तत्सम कृत्ये’सुध्दा नाहीत. भुकेल्यांना अन्न, तृषार्थांना पाणी देऊन गरजूंची गरज भागवू या! त्यांच्या नावाचा जय जयकार करूया !!”

◼️ ✍️  श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे,
(माजी मुख्याध्यापक)
मु.काटली, पो.साखरा, ता.जि.गडचिरोली.

भ्र.ध्व. ७४१४९८३३३९

ई-मेल : Krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *