◼️ काव्यरंग :- स्वप्नरंग…✍️ मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळीतील सर्व समूहात दि. ०२/०९/२०२० बुधवार रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘स्वप्नरंग’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे…!

स्वप्नरंग

मन माझे झाले ओले
उधळता स्वप्नरंग
दारी प्राजक्त फुले
चित्त तुझ्यातच दंग

बंध आपुले जुळले
कैफ प्रेमाचा चढला
मनाच्या गाभाऱ्यात
खोल खोल तू रूजला

हळूच येऊन स्वप्नात
थैमान असे घालतोस
मिठीच्या हिंदोळ्यावर
तुझसवे झुलवतोस

मदमस्त अदाकारी
घायाळ करी मजला
माझ्या मन दर्पणात
येऊन तू विसावला

तुझ्याचसाठी रजनी
करते सोळा शृंगार
नहाते चिंब प्रेमरंगी
आला प्रणया बहार

बघ आता हृदयी
ओलेच चिंब तरंग.
घेऊन आली खळी
गाली तुझेच सारे रंग
गाली तुझेच सारे रंग

सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह
❤️🌿❤️🌿❤️🌿❤️🌿❤️🌿❤️

स्वप्नरंग

भरलं गोकुळ माझं
होताआनंदच आनंद
नात्यातला रेशीमबंद
जीवनात होता सुगंध

तरुण आम्ही भावंडे
चालू होते आमचे शिक्षण
वडीलधाऱ्यांचे स्वप्नरंग
ध्येयाप्रत जाण्याचे वचन

आला साथीचा रोग
महामारीत गेले कुटुंब
जिवंत राहिले बाप लेक
मृत्यूचे तांडव तुडूंब…..

नाही बोलावया कोणी
भावनांचा आविष्कार…
निसर्गाच्या सानिध्यात
वड झाला साथीदार…

वड सखा लाभला मज
नैसर्गिक भाव स्वप्नरंग
सांगू लागले वडाला दुःख
ऐकू लागलं मानवी भावतरंग

पोटासाठी बापलेक शहरी
सखी भेटायला येईना
हरवले सख्याचे स्वप्नरंग…
वड पारंब्याला अश्रू आवरेना

सिंधू बनसोडे ,इंदापूर ,जि -पुणे 
©सदस्या -मराठीचे शिलेदार समूह
❤️🌿❤️🌿❤️🌿❤️🌿❤️🌿❤️
स्वप्नरंग

निशेने आकाशात
उधळला चांदणचुरा…
तुझ्या आठवांनी
माझा जीव बावरा…!!१!!

वा-याने बांधली
सळसळत्या पानांची माडी…
चांदण्यांनी नेसली
चमचमती चंदेरी साडी…!!२!!

रातराणीच्या फुलांचा
मोहवी सुगंध…
अंधारल्या वाटांना जडला
प्रकाशाचा छंद…!!३!!

सुगंधाशी जुळला
कलिकांचा बंध…
चांदव्यावर भाळून
तारकाही धुंद…!!४!!

रात्र भारलेली
चांदण्यात वेढलेली…
कल्पनेच्या स्वप्नरंगात
अलवार दडलेली…!!५!!

माधुरी गुरव ( निळकंठ ) बीड
© सदस्य मराठीचे शिलेदार समूह
❤️🌿❤️🌿❤️🌿❤️🌿❤️🌿❤️

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील, नागपूर
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

One Reply to “◼️ काव्यरंग :- स्वप्नरंग…✍️ मराठीचे शिलेदार समूह”

  1. माझ्या कवितेला आपल्या काव्यरंगमध्ये सहभागी करून आपण जो बहुमान दिला त्याबद्दल सप्तरंग पेपरचे मनःपूर्वक धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *