◼️ काव्यरंग :- बंद राजवाडा तरी…

कवितेचे शीर्षक : बंद राजवाडा तरी… —————————————————

साथापत्यशास्त्राचे नमुने सुंदर
प्रवेशद्वार असो, बैठकी वा न्हाणीघर
खांबाखांबांवर नक्षी मनमोहक
वैभव बंद राजवाडे कथिती !

किती झाली राजनीती, किती पराक्रम,
सांगती ढाली, तलवारी लटकत्या
पिढ्यांची तैलचित्रे करती वर्णन हुबेहुब
अन् मर्दुमकीचे पोवाडे गाती !

बंद राजवाडा सांगे किती अप्सरा होत्या तिथे,
राणीवशातील दालनांच्या संख्येतून
कुणी स्वखुषीने, कुणी तह म्हणून
कुणी बळजबरीने, हुंदके महालात गुंजती !

कधी छंद, कधी श्रमपरिहार…
किती खेळ, किती शिकारी, मृगया
शिरे निष्पाप खुंट्यावर टांगून
सजवल्या राजवाड्याच्या भिंती !

गेली राजेशाही, बंद झाले राजवाडे
राजा गेले, पारतंत्र्यही आले नि गेले,
तरीही सिंहासनाधिष्ट आहे ईथल्या
मानवी मनाच्या राजवाड्यात एक छत्रपती !

◼️ सौ.प्रिया प्रकाश गावडे, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *