◼️ प्रासंगिक लेख :- आदर्श पुरस्कार : स्व-प्रस्तावाला थारा नको ! (भाग-२)

आदर्श पुरस्कार : स्व-प्रस्तावाला थारा नको ! (भाग-२)

                 

                सद्या प्रचलित असलेली आदर्श पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींची निवड करण्याची पद्धती ही संतापजनक आहे. ती योग्य नाही, असे बऱ्याच जानकार लोकांचे मत आहे. स्वतःला स्वतःच सम्मानित करून ‘मी आदर्श’ म्हणून मिरविण्याची ही सहज-सोपी पद्धत आहे. कामचुकार लोकांचे यातून चांगलेच फावत आहे. असे महाभाग तर अंगी काही एक योग्यता-लायकी नसतानाही या वाहत्या गंगेत सर्वांगाने न्हाऊन निघताना दिसताहेत. म्हणतात ना –
“ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या ।
वाण नाही तर गुण लागला ।।”
जनलोकात नाचक्की असलेला, चोर, छच्चोर, डाकू, भ्रष्टाचारी, स्वार्थी, समाजकंटक, आळशी, खायला काळ नि भुईला भार, क्रोधी, कामी, भांडखोर, चुगलखोर, विघ्नसंतोषी, अशा नाना अवगुणांचा शिरोमणी अकस्मात ‘आदर्श पुरस्काराचा मानकरी’ ठरतो. ते केव्हा कळते? जेव्हा रेडिओ, टिव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर सर्व सामाजिक प्रसारमाध्यमात त्याचा दिमाखदार फोटो झळकू लागतो. त्यातील हेड लाईन्समध्ये त्याचे नाव बोल्ड टाईपमध्ये छापून येते, तेव्हाच एकदम सोसाट्याच्या वादळागत! असे कसे घडले? अरे, त्याहून तर अमुक तमुक चांगले जनकल्याणाचे कार्ये करतात. वास्तविक पाहता त्यांना मिळणे क्रमप्राप्त होते. हे आक्रीतच झाले ! कारण त्याचे जोरदार प्रयत्न फळाला आले. तसले लाळघोटे प्रयत्न त्यांनी कलेच नाही. का केले नाही? त्यांना आपल्या कीर्तीचा झेंडा उंच नको तर थोर समाजोपयोगी कार्ये घडावेत म्हणून –
“आम्हा नाही नाम रुप ।
आम्ही आकाश स्वरुप ।।”
त्यांना या मान-पानाच्या व्यवहाराशी काहीच सोयरसुतक नसते.
मात्र हालवमालव व थातूरमातूर काम पार पाडावे, अशी धारणा असलेला ‘मस्तकलंदर’ स्वस्थ बसेल तेव्हा ना ! काहीही झाले तरी होवू दे. पण आपण यावर्षीचा ‘राष्ट्रीय आदर्श पुरस्कार’ मिळवायचं म्हणजे मिळवायचंच, हे पक्कं ! म्हणून तो वर्षभर नुसता ‘आयडिलपणाचा ड्रामा’ खेळतो. पुरस्कारात जी काही ‘बक्षिसी’ म्हणून मिळणारी महामाया असते, तीचे नवरंग उधळत संबंधीतांना मायापाशात अडकवून घेतो. तेवढी रक्कम तो आधीच पुरस्कार दात्यांच्या मुसक्या आवळण्याच्या कामी जाणून बुजूनच खर्च करतो. सकुशल कार्ये केल्याबद्दलचे साक्ष पुरावे, उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र, पुरस्कारास पात्र ठरत असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे शिफारसपत्रे आदी डाक्युमेंटस् मोठ्या सिताफीने जमवितो. हे सर्व तो नाष्टा, चहापाणी, पार्टी किंवा चिरीमिरीच्या अगदी खात्रीशीर मार्गाने प्राप्त करून घेतो. या मार्गावरील सर्व लाईन्स सेटींग करून तो त्यादृष्टीने व्यस्त व मनोनुकूल करून टाकतो. आता बोला, ही अश्शी आदर्श व्यक्तीस सम्मानित करण्याची पारदर्शक, तर्कशुद्ध व नीतीबद्ध पद्धत झाली की काय राव? एका कवीने म्हटले –
“जीवन त्यांना कळले हो ।
मीपण ज्यांचे पक्व फळापरी,
सहजपणाने गळले हो ।।”
बरं असो, आदर्श असल्याचा पुरस्कार प्राप्तीनंतर तरी त्यांच्यात सुधारणा होते काय? त्यांच्यात सुयोग्य वर्तनबदल घडले काय? नाही. आणखी त्यांचा अहंकाराचा रेडकू चिखलात लोळतोच लोळतो. मग सांगा, त्यांना उसण्याचा आदर्शपणा टिकविणे वा शाबूत ठेवणे जमेल ना ! म्हणून ही पद्धतच रद्दी आहे. ‘माझा सत्कार करा ! मला आदर्श पुरस्कार द्या !!’ असे निर्लज्जपणाने म्हणत स्वतःच स्वतःचं प्रस्ताव सादर करावं लागतं. अशी प्रक्रिया पूर्ण करून मगच सत्कारमूर्ती ठरत असतो, ही भानगड बहुतांश लोकांना माहित नाही. पुरस्काराच्या वरून खाली किं खालून वर उड्या माराव्या लागतात? तेही कळत नसते अशा बहाद्दरांना आणि पुरस्कार दात्यांनाही ! घेत्याला नाही तर नाही पण देत्यालासुद्धा त्याचे काही एक तारतम्य नसते. अशाने त्या पुरस्काराचे महत्व, मानसन्मान अथवा गांभिर्य उरतोय कुठे? म्हणजे म्हटले जाते अगदी तसेच की –
“जेनु काम तेनु थाय ।
बिजा करे सो गोता खाय ।।”
अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमातून अधिकाधिक चांगले कार्य घडत राहण्याची प्रेरणा, प्रोत्साहन देण्याच्या मूळ उद्देशालाच प्रत्यक्षाप्रत्यक्ष खिळ ठोकली जात आहे. ही फारच लज्जास्पद, चिंतनीय तद्वतच निंदनीयही बाब आहे. याचा सर्व स्तरातून विरोध व्हावयास पाहिजे, मात्र तसे होतांना दिसत नाही. कारण एकच – सर्वसामान्य जनता याविषयी अनभिज्ञ आहे. आम्हाला काय त्याचं देणं घेणं? असे बोलून तोंडे फिरवली जाताहेत. हीच कृती आजवरच्या या विद्रुप पद्धतीस चालना देत आली आहे. मुळात जगाला दिशादर्शक आदर्श व्यक्तिच यापासून वंचित राहात आल्या आहेत. चुटक्या बुटक्यांना ‘भारतरत्न’ म्हणून गौरविल्या जात आहे, मात्र ज्यानी आजीवन खस्ता खाऊन सर्वांना ‘शिक्षणवेडे’ करून सोडले ते महात्मा फुले दांपत्य आजही वंचितच आहेत. हे का? जनता जनार्दनाच्या तटस्थ असण्याचे हे परिणाम आहे ! अशा प्रभावशाली थोर व्यक्तींची जगकल्याणी विचारसरणी मंत्रमुग्ध करणारी असते –
“पूजितसे मी कवणाला?
तर मी पूजी आपुल्याला ।
आपुल्यामध्ये विश्व पाहुनी,
पूजितसे मी विश्वाला ।।”
आज आपल्या देशात, राज्यात, विभागात, जिल्ह्यात व समाजात स्वतःची अतुलनीय कार्य कौशल्याची व वागणुकीची छाप उमटविलेले कितीतरी सज्जन आहेत. त्यांना अलबत हेरून हुडकून गौरविण्यात आले पाहिजे. अन्यथा –
“आंधळिया हाती ।
दिले जैसै मोती ।
वायाचि जाती ।”
अशीच परिस्थिती उद्भवत राहिल. आता लगेच या आदर्श नियमांचा आम्ही पुरस्कार करू लागलो. तर पुढच्या पिढीलाही सहजच अमूल्य पुरस्काराचा आदर्श घालून मिळेल, यात शंकाच नाही ! (समाप्त)

नव-नवीन माहितीसाठी नियमित वाचत रहा आपला लोकप्रिय ‘चंद्रपूर सप्तरंग !’

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे (नि.पद.प्राथ.शिक्षक)
मु.रामनगर वार्ड नं.२०,गडचिरोली.
पो.ता.जि.गडचिरोली.
व्हा.अॅ.नं. 9423714883.
इ-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

2 Replies to “◼️ प्रासंगिक लेख :- आदर्श पुरस्कार : स्व-प्रस्तावाला थारा नको ! (भाग-२)”

  1. सर धन्यवाद, आपण सडेतोड पणे आज आदर्श शिक्षक पुरस्काराविषयी आपलें मत मांडले. खऱ्या अर्थाने अश्या परिस्थिमुळे चांगले काम करणाऱ्या व्यक्तीचा हिरमोड होतो. चांगले काम करणारे लाभापासून वंचित ठरतात व लबाड कोल्हे लाभ मिळवून समाजात मिरवतात, पाहून दुःख होते परंतु चांगले काम करणारे कधीच अश्या पुरस्कार, प्रलोभनाला बळी पडत नाहीत तर ते आपलें कर्तव्य योग्य पद्धतीने निभावतात व समाजही त्यांचा आदर करतो.

  2. वास्तववादी लेखन आहे.सर हे तुम्ही जे लेखन केले ते अगदी खरं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *