◼️ प्रासंगिक लेख :- आचार्य विनोबा भावे : मित्र व शत्रुंशीही समवर्तक !

 

 -: १२५ वी जयंती निमित्त :-

आचार्य विनोबा भावे : मित्र व शत्रुंशीही समवर्तक !

ज्यांनी देश, प्रांत, समाज, मातापिता, मित्र व शत्रू यासर्वांची सेवा करणे परमकर्तव्य मानले, त्या महान कर्मयोगी आचार्य विनोबा भावे यांची आज १२५ वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या अचाट कार्यकर्तृत्वास साष्टांग दंडवत प्रणाम !
विनोबांचे बालपण – लोक त्यांना आदराने विनोबा म्हणत. त्यांचे पूर्णनाव विनायक नरहर भावे असे होते. त्यांचा जन्म दिनांक ११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्रातील जिल्हा रायगड येथील पेण तालुक्यातील गागोदे यागांवी झाला. त्यांच्या आईचे नाव रखुमाबाई तर वडिलांचे नाव नरहर शंभुराव भावे असे होते. त्यांचा परिवार हा आध्यात्मिक विचारसरणीचा होता. त्यामुळे विनोबांत त्याचे विलक्षण आकर्षण निर्माण होत गेले. परिणामी ब्रह्मविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश ठरला. आजोबा व मातोश्रीपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना प्राप्त झाले. त्यांच्या आईला भगवद्गीता आख्यान खुप रुचत असे. म्हणून तीला ते कोठलेही मराठी भावार्थ असलेले कागद आणून देत. एकदा आईने म्हंटले होते की गीतेचे मराठी भाषांतर तूच का करून देत नाहीस? पुढे त्यांनी आईच्या इच्छापूर्तीसाठी म्हणून ‘गीताई’ हा श्लोकबद्ध ग्रंथ लिहिला, असे सांगितले जाते.
विनोबांसह त्यांचे कुटुंब नोकरीच्या उद्देशाने बडोदे येथे गेले. तेथेच त्यांचे माध्यमिक व उच्च शिक्षण पूर्ण झाले. इ.स. १९१६ साली ते महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्याच्या उद्देशाने मुंबईला निघाले. परंतु ते मध्येच उतरून वाराणसीला रवाना झाले. कारण त्यांना तेथील हिमालयातील अध्यात्म व सशस्त्र बंगालक्रांती साद घालत होती. वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीजींचे भाषण झाले. त्याचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. गांधीजींचा प्रभाव त्यांना आजीवन प्रेरणा देत राहिला होता.
विनोबांचे जीवनकार्य – पुढे ते वाई येथील धार्मिक प्राज्ञपाठशाळेत दाखल झाले. तेथे त्यांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, पतंजलीयोग सूत्रे आदी विषयांचे अध्ययन पूर्ण केले. दर सोमवारी पाठशाळेस सुट्टी असायची. यादिवशी सर्व अध्ययनार्थी शेतात अंगमेहनतीची कामे करत असत. त्यानंतर साप्ताहिक चर्चासत्र असे. त्यात चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक, तात्विक यांसह प्रचलित राजकारणाची सर्वंकष मिमांसा चालवली जात होती. येथेच आचार्य विनोबांसह दिनकरशास्त्री कानडे, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष आदींची स्वातंत्र्य लढ्यासंबधी गुप्त मसलत चालत असे. त्यांनी वरीलप्रमाणे ग्रंथ व विषयांचे अध्ययन यशस्वीपणे पूर्ण केल्याचे पत्रातून गांधीजींना कळविले. तेव्हा गांधीजींनी पत्राच्या उत्तरात म्हंटले होते, “ए गोरख, तुने मच्छिंदर को भी जीत लिया हैं !” ते दिवसाचे सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम करणे यांत घालवित असत. प्रत्येक माणसाने रोज नित्यनेमाने अंगमेहनत करावी, असा त्यांचा श्रमसिद्धांत होता.
आचार्य विनोबाजी हे वाईहून फेब्रुवारी १९१८ मध्ये परत अहमदाबाद येथे आले. त्यावेळीही सन २०२० यावर्षीच्या कोरोना महामारीसारखीच इन्फ्ल्युएंझाची साथ संपुर्ण भारत देशभर पसरली होती. लक्षावधी लोक या साथीला बळी पडले होते. त्यात त्यांचे आई व धाकटा भाऊ दत्तात्रय हे दोघेही मरण पावले. विनोबा ज्येष्ठ पुत्र असल्याने त्यांनी रुढीप्रमाणे पुरोहितामार्फत अंत्यसंस्कार करणे अमान्य केले व स्मशानभूमीत जाण्यास नकार दिला. मग वडिलांनीच अंत्यविधी उरकून घेतला. अशाप्रकारे जाचक रुढी-परंपरांनाही त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांच्या शत्रुंशीसुद्धा मित्राप्रमाणेच व्यवहार व सर्वधर्मसमभाव या मानवतावादी स्वभावामुळे गांधीजी त्यांना प्रत्येक चळवळीत पुढाकार देत होते. त्यांनी स्वातंत्र्यलढा व भूदान चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला होता. ते इ.स.१९३२ च्या सविनय कायदेभंग या सामुदायिक आंदोलनात सहभागी झाले. म्हणून शेकडो स्वातंत्र्य सत्याग्रहींसह त्यांना धुळेच्या कारागृहात डांबण्यात आले. तेथे त्यांनी दररोज एक याप्रमाणे १८ गीता प्रवचने कैद्यांना ऐकविली होती. त्या श्रोतृवर्गात शेठ जमनालाल बजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरुजी इत्यादी मंडळींचा समावेश होता.
वयाच्या ८७ व्या वर्षी ५ नोव्हेंबर १९८२ रोजी विनोबाजींना ताप आला. त्यासोबतच ह्रदयविकारही बळावला. त्यामुळे आता त्यांची प्रकृती चिंताजनक वाटू लागली. त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. मात्र विनोबांनी परमधाम आश्रम सोडण्यास नकार दिला. तेव्हा तेथेच उपचार सुरू करण्यात आले. परंतु त्यांनी अन्नपाणी व औषधे घेण्यास नकार भरला. ते त्यांनी घ्यावे म्हणून त्यांचे बंधू शिवाजीराव भावे, मित्र दादा धर्माधिकारी व आश्रमातील सर्व भक्तमंडळींनी काकुळतीला येऊन परोपरीने विनंती करू लागले. मात्र व्यर्थच! शेवटी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. आश्रमातील सर्वांचा तो आनंदोत्सवाचा दिवाळीतील लक्षमीपूजनाचा दिवस ! मात्र तो असा दुःखात परावर्तित झाला होता. संसारात लिप्त लोक अशा सणासुदीच्या दिवशी देवाज्ञा होणे चांगले नाही, असे समजतात. परंतु एका निर्मोही संत-भगवद्भक्तास देवाघरी जाण्यास याहून चांगली वेळ वा सुदिन तो कोणता?
विनोबाजींची साहित्यसंपदा – (१) सार्थ अष्टादशी, (२) ईशावास्यवृत्ती, (३) उपनिषदांचा अभ्यास, (४) गीताई, (५) गीताई-चिंतनिका, (६) गीता प्रवचने, (७) सार्थ गुरुबोध सार, (८) जीवनदृष्टी, (९) भागवतधर्म सार, (१०) मधुकर, (११) निवडक मनुस्मृती – मराठी [मनुशासनम्], (१२) लोकनीती, (१३) विचार पोथी, (१४) साम्यसूत्रवृत्ती, (१५) साम्यसूत्रे आणि (१६) स्थितप्रज्ञ-दर्शन.
विनोबांचे विचार – [अ] वर्तनाला बंधन असावे म्हणजे वृत्ती मोकळी राहते. [आ] सत्य, संयम व सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. [इ] आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार अर्थात शुद्ध व्यवहार होय. [ई] हिंदुधर्माचे स्वरुप : आचार सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, नीती-धर्माविषयी दृढता. [उ] प्राण्यांची सेवा, संत सेवा, द्वेष कर्त्यांची सेवा ही सर्वोत्तम सेवा होय. [ऊ] असत्यात शक्ती नाही. आपल्या अस्तित्वासाठीही त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे. [ए] ईश्वर, गुरु, आत्मा, धर्म आणि संत ही पांच पूजास्थाने होत. [ऐ] इतिहास म्हणजे अनादिकालापासून आतापर्यंतचे सर्व जीवन आहे. [ओ] पुराण म्हणजे अनादिकालापासून आतापर्यंत टिकलेल्या अनुभवांचा अमर अंश होय.
विनोबाजींचे प्रायोपवेशन – आचार्य विनोबाजींच्या देहावसानाची वार्ता भारतासह जगभर सर्व प्रसारमाध्यमांद्वारे विद्युलत्ता वेगाने पसरली. तेव्हा या घटनेला कोणी महानिर्वाण म्हंटले. कोणी कर्मयोग्याची समाधी म्हणाले. तर कोणी अनंतात विलीन झाले म्हणाले होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू, बौद्ध व विशेषतः जैन या तिन्ही धर्मांना फार प्राचीन काळापासून मान्य होते. जैन धर्मात यास सल्लेखन आणि बौद्ध धम्मात संथारा ही प्राकृत संज्ञा आहे. तर हिंदू धर्मात याला प्रायोपवेशन असे म्हणतात. यातील प्राय म्हणजे तप, या तपाचा एक प्रमुख अर्थ अनशन म्हणजेच अन्नपाणी त्याग करणे होय. असे का केले जात असे? शरीराचे दुर्धर आजार पुढे बरे होऊच शकत नाहीत, याची खात्री पटल्याने किंवा जीवन जगण्यात स्वारस्य वाटत नसल्याने हा अंतिम पर्याय म्हणून निवडावा लागत असे. त्यामुळे व्याधीग्रस्त मनुष्य हा जलप्रवेश, अग्निप्रवेश, भृगुपतन म्हणजे उंच कड्यावरून स्वतःला झोकून देणे, अनशन किंवा इतर कोणत्याही मार्गाने देहविसर्जित करीत असत. तसेच आचार्य विनोबांनी प्रायोपवेशन स्वीकारून देह सोडला होता. संत ज्ञानेश्वर, स्वातंत्र्यवीर सावरकर व धर्मानंद कोसंबी आदींनीही अशाच प्रकारे देहत्याग केल्याचे सांगितले जाते.
!! आचार्य विनोबा भावेंच्या अजरामर स्मृतींना विनम्र अभिवादन !!

◼️लेखक – श्री. कृ. गो. निकोडे गुरुजी,
(संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. वंद. रा. सं. तुकडोजी महाराज चौकाजवळ,
रामनगर वार्ड नं.२०, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.
व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इ-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *