◼️काव्यरंग :- माई फातिमा महान !

माई फातिमा महान !


माई फातिमा वंदन ।
पायी लोळतो नंदन ।
होता तो अविद्या तम ।
मनी धरुनि संयम ।
माई सावित्रीची ज्योत । झाली त्यातली तू वात ।१।
फुले दांपत्य यज्ञात ।
कुणी नाही दिली साथ ।
तुझा उंचावला हात ।
आली विघ्ने केली मात ।
झाला तुमचा संगम । तुम्ही जिंकला संग्राम ।२।
विद्या नाही पारखत ।
उच्च नीच जात पात ।
शेण गोटे अंगावर ।
कष्ट झेलले अपार ।
आधी तुम्ही अवगुणी । आज हो ज्ञान दायिनी ।३।
मुली मुले शिकवाया ।
बहु जणा उद्धराया ।
मारी पदरासी गाठी ।
उभी ठाके साऊ पाठी ।
गंध विद्येचा नसुनि । दिले सुगंध झोकुनि ।४।
घोट पियुषाचा गळी ।
घेता चेतली सगळी ।
‘धन्य धन्य तू’ म्हणुनि ।
पायी माथा हा टेकुनि ।
माई फातिमा महान । जाणा ‘कृगोनि’ वहाण ।५।

◼️ कवीवर्य – “कृगोनि” –
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे, गुरुजी.
मु.रामनगर वार्ड नं.२०, गडचिरोली.
ता.जि.गडचिरोली. पिन.४४२६०५,
मो.नं. 9423714883.
इ-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *