व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वाचा सविस्तर

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वाचा सविस्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढती कोरोनाची संख्या आणि मराठा आरक्षणावर भाष्य केलं. तसंच त्यांनी विरोधकांनाही टोला हाणला आहे.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढती कोरोनाची संख्या आणि मराठा आरक्षणावर भाष्य केलं. तसंच त्यांनी विरोधकांनाही टोला हाणला आहे. कोरोनाचं भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळं आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत, असं ते म्हणालेत. आधी मी बोललो होतो तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या आणि यंत्रणेस कळवा असं म्हणत फेस टु फेस बोलू नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू टाळा, असंही त्यांनी सांगितलं.

ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांच्या आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्या आहेत. मिशन बिगिन अगेनअंतर्गत काही गोष्टी सुरु केल्या आहेत. कार्यालयातील उपस्थिती वाढवत आहोत. वाहतुकीचे निर्बंध शिथिल केले आहेत. आयुष्याची गाडी मागावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत. आयुष्य पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

या वर्षात महाराष्ट्रावर अनेक संकटं आलीत. कोरोनासोबत, निसर्ग चक्रीवादळ, पाऊस, विदर्भातील पूर अशी संकटं राज्यावर आली. मात्र याही परिस्थितीत सरकार खंबीर असल्याचं म्हणत  कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आजपर्यंत सरकार म्हणून आम्ही दिलेल्या सूचनांचे तुम्ही पालन केले आहे, तसेच यापुढे देखील आपण एकीने युध्द जिंकू. कोरोना संकटाच्या काळात थोडासा संयम पाळा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल सेवा, रेस्टॉरंट सुरू करण्यात येईल, याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. लोकल सेवा सुरू केली आहे, त्यात लवकरच वाढ करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.  जिम – रेस्टॉरंट देखील सुरू करण्याचा प्रयत्न आहे परंतु सुरक्षिततेच्या नियमावलीस प्राधान्य असेल तसंच नियमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं.

◼️विरोधकांना टोला

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट हे कायम आहे. हे संकट असताना राजकीय वादळ उठत आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली आहे.

◼️दुर्गम भागात देखील मी पोहोचलो

इतरांसमोर जेवताना समोरासमोर बसून जेवू नका, जेवताना छोट्या छोट्या वाट्या घ्या. काळजी घेतली तर दुर्दैवाने कोणाला संसर्ग झाला असेल तर दुसर्‍याला होणार नाही. हे युद्ध आहे, यात खारीचा तरी वाटा उचला. हे युद्ध आहे, जनता जर युद्धात सहभागी झाली तर जिंकू, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. मुख्यमंत्री घरात बसून काम करतात. बाहेर पडा, असं म्हटलं जातं. मात्र मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बैठक घेत आहे, काम करत आहे. जिथे तुम्ही जात नाही अशा दुर्गम भागात देखील मी पोहोचलो आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंचं प्रत्त्युत्तर दिलं आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठका ऑनलाइन घ्या, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

◼️मराठा समाजासोबत सरकार कायम

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे. मराठा समाजासोबत सरकार कायम असल्याचं ते म्हणालेत. मराठा समाजानं रस्त्यावर कृपया आंदोलन करु नये, असंही सांगितलं आहे. कोरोनाच्या संकटात आंदोलन आणि मोर्चे काढू नका. सरकार तुमच्या मागण्यांशी कटिबद्ध असून मराठा समाजाला न्याय मिळवून देणारचं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *