◼️तू जाताना वेड लावून जातोस रे..

🔴  तू जाताना वेड लावून जातोस रे..

365 दिवस, तुझी वाट बघायची. मग तू आमच्या घरी येणार..तुझ्यासाठी एवढी छान आरास करायची, मोदक करायचे..आणि तू मात्र जेमतेम दीड दिवस बसून निघून जाणार..जास्तीत जास्त 10-11 दिवस.उरलेले दिवस परत तुझ्या येण्याची वाट आम्ही बघत बसायची.माहीत असतं कि तू आत्ता गेलास तरी पुढच्या वर्षी नक्की येणार.पण तरीही तुला “पुढच्या वर्षी लवकर या ” निरोप देताना मन गहिवरून येतंच रे..

मुळात तू निघून गेला आहेस हे पुढचे दोन-तीन दिवस लक्षातच राहत नाही बघ..तू बसलेल्या स्थानावर आपोआप डोळे बंद होऊन हात जोडले जातात.मग डोळे उघडून पाहतो,तर तू नाहीस..तू बसलेला पाट सुद्धा उदास पडून असतो..
तुज्या शेजारी तेवत असणाऱ्या समया,तू असताना मात्र दिमाखात लकाकत असतात.पण तू गेल्यावर त्या सुद्धा उदासच असतात..त्यातल्या वाती सुद्धा बिचाऱ्या निपचित पडून असतात..” आता कुणासाठी जळू ” हा विचार त्यांच्याही मनात येत असेलच ना रे ?

तुझ्या पुढं ठेवलेलं, फुलांनी भरगच्चं भरलेलं ते तबक आता काही उरल्या-सुरल्या पाकळ्यांचं धनी झालंय..त्या उरलेल्या पाकळ्या सुद्धा ढसा -ढसा रडत असतील कि त्यांना तुझ्यावर पडायचं सौभाग्य मिळालं नाही..त्यांनाही ‘ जन्म फुकट गेल्याची ‘भावना मनात येत असेल का रे ?

तो मखर बघ..ज्या मखरात तू सामावला होतास,ऐटीत बसला होतास,तो मखर सुद्धा,आपले हात आपल्याच डोळ्यांतून टपकणारं पाणी टिपत असेल..त्या मखराचा देखील उर दाटून आला असेल का रे ? आईच्या उदरात बाळ असताना ती जशी खुश असते ना,ते मखर सुद्धा तुला सामावून घेताना तितकंच खुश असतं..तू गेल्याची पोकळी,त्या मखराला सुद्धा वाटत असेल ना रे ?

आणि आमचं काय ? आम्ही तर सजीव आहोत ना..” पुढच्या वर्षी लवकर या ” म्हणताना ज्याने औंढा गिळला नसेल असा एक माणूस दाखवून दे..तुझी पाठमोरी आकृती बघितली,कि तू चालल्याची जाणीव मनाला होते..वाटतं कि तू मागे वळून बघशील..पाण्यात तुला तिसऱ्यांदा सोडताना हातून काहीतरी सुटून चालल्याची जाणीव मनाला होते.मुळात विसर्जन,तुझं होत नसतं..विसर्जन होत असतं,ते माझ्यातल्या ‘ मी ‘चं.कारण तुझ्यात आणि माझ्यात फक्त तूच उरतोस.माझ्यातला ‘मी ‘ पाण्यात विरघळून जातो.असो. तुझा हात सोडावाच लागतो..तुलाही घाई झालेली असते तुझ्या आईच्या कुशीत शिरायची..तुला सोडून पुन्हा माघारी यावंच लागतं..मागे फिरल्यावर जाणवतो तो भकासपणा..ती पोकळी..आरत्या,मंत्र-पुष्पांजलीचे सूर कानात घुमत राहतात..मन बेचैन होतं..आणि पुन्हा तुझी वाट बघायची सवय सुरु होते..पुढच्या वर्षी ये रे लवकर..तुझी वाट बघतोय..
तुझाच भक्त …😊

सौ विद्या नाईक
विभागिय समन्वयक कोकण
अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *