◼️ काव्यरंग :- रम्य बालपण

…………रम्य बालपण……….

कधी वाटते हवे हवेसे रम्य किती ते आहे बालपण,
निरागस ते हास्य गाली अन् निष्पाप किती ते असे बालमन!

नसे राग नि नसे लोभही खोट्या अपेक्षा नसे थारा,
काचा ,कवड्या,तुटकी खेळणी परि हर्षाचा मनी वारा !

भातुकलीच्या खेळामध्ये रंगून जाई कसे बालपण,
नसे हाव ती कशाचीच पण वाटून खाऊ सारे आपण !

कधी काठीचा होई घोडा माळावरूनी दौडत येई,
कधी बनवून विमान कागदी ऊंच भरारी वेगात घेई !

फुले,वेली अन् फुलपाखरेही बालपणीचे सखे सोबती,
नभांगणीचे चंद्र चांदण्या डोळ्यांमधूनी लुकलुकती !

नको कुणाचे डोई ओझे नको कशाची ती चिंता,
वाटे सर्वांना हवे हवेसे स्वच्छंदाने विहार करता!

संत तुका करीती धावा लहानपण देगा देवा,
राष्ट्राचा हा अनमोल ठेवा परी वाटू द्या त्यांचा हेवा!

आरोग्य अन् संस्कारांची करू त्यांच्या वरती ऊधळण,
ठरवू सार्थक सारे आपण आहे किती ते रम्य बालपण !!!

◼️✍️ सौ.सुनिता नाईक, कुरूळी
मो.8080362939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *