◼️ प्रासंगिक लेख :- कर्मवीर भाऊराव पाटील : बहुजन शिक्षण गंगोत्रीचे भगीरथ !

◼️दि.२२ सप्टें.२०२० रोजी जंयती विशेष◼️

कर्मवीर भाऊराव पाटील : बहुजन शिक्षण गंगोत्रीचे भगीरथ !

आज दि.२२ सप्टेंबर २०२० रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्णनाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई होते. त्यांची मूळवस्ती कर्नाटक राज्यात होती. त्यांचे पूर्वज महाराष्ट्रात स्थायिक झाले. पुर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते सांगली जिल्ह्यातील एतवडे या गावी स्थिर झाले. त्यांच्या घराण्याकडे पाटीलकी आल्यामुळे ते नंतर पाटील आडनावाने प्रख्यात झाले. पुढे कर्मवीरांचे आईवडिल कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तहसिलीच्या कुंभोज या छोट्याशा गावी वास्तव्य करू लागले. तेथेच दि.२२ सप्टेंबर १८८७ रोजी भाऊरावांचा जन्म झाला. संपूर्ण बालपण त्यांचे तेथेच गेले. ते बालपणापासूनच बेडरवृत्तीचे होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातच पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल केले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये केली होती. याच काळात त्यांच्या मनावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा पडला. दलितांना इतरांकडून पाणीसुद्धा मागून प्यावे लागत होते. त्यांना पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागत होती. एकदा हे दृश्य त्यांना पहावले नाही. म्हणून त्यांनी विहिरीचे रहाटच मोडून फेकले होते.
इ.स.१९३२ मध्ये महात्मा गांधी व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार भाऊराव पाटील व महर्षी शिंदे होते. पृथकता़वादाने दलितांचे प्रश्न मार्गी न लागता उलट ते अधिकच गंभीररुप धारण करतील, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. इ.स.१९३५ मध्ये त्यांनी महात्मा फुले अध्यापक विद्यालय उघडले. त्यांची यामागील दूरदृष्टी की शैक्षणिक चळवळ खेडोपाडी पोहोचविण्यासाठी योग्य शिक्षक घडविणे ही होती. भाऊरावांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिरावजी फुलेंना गुरुस्थानी मानून शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. प्रत्येक गावात शाळा हवी, शिक्षक बहुजन समातील व्हावा आणि शिक्षकांना उचित प्रशिक्षण मिळावे. या त्रिसूत्रीसाठी ते सातत्याने झटले. सातारा जिल्ह्यातील काले या गावी दि.४ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे अशी होती – (१) शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात शिक्षणाची गोडी निर्माण करणे, (२) बहुजन समाजातील व गरीब घरच्या मुलांना मोफत शिक्षण देणे, (३) सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांत प्रेमभावना रुजविणे, (४) अनिष्ट रुढी-परंपरा मोडीत काढून समाजाच्या विकास कार्यांना गती देणे, (५) एकतेच्या शक्तीची महत्ता प्रत्यक्ष कृतीतून पटवून देणे, (६) सर्व मुलामुलींना स्वावलंबी, शीलवान, उत्साही व काटकसरी बनविण्यास प्रयत्न करणे आणि (७) बहुजन समाजात शिक्षण प्रसारास आवश्यक तेवढे कार्यक्षेत्र विस्तृत करणे.
महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा ‘कर्मवीर’ ही बहुमामानाची पदवी देऊन गौरव केला. तसेच भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. तर पुणे विद्यापीठाने त्यांना इ.स.१९५९ मध्ये सन्माननीय डी.लिट.ही पदवी बहाल केली. त्यांची रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून जगप्रसिद्ध झाली. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत. त्यात पूर्वप्राथमिक २०, प्राथमिक २७, माध्यमिक ४३८, अध्यापक विद्यालय ८, आय.टी.आय. २ व महाविद्यालय ४१ यांचा समावेश आहे. प्रसिद्ध लेखक ह.रा.महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी.वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. अशा ही ‘शिक्षणाची गंगोत्री’ बहुजन समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या आधुनिक भगीरथाचे वयाच्या ७२ व्या वर्षी प्राणपक्षी दि.९ मे १९५९ रोजी भुर्रकन उडून गेले. त्यांच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ कार्यकर्तृत्वास मानाचा लवून मुजरा !

◼️✍️◼️

लेखक – श्री. एन्. कृष्णकुमार जी. अध्यापक,
(मराठी साहित्यिक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,
तह. आरमोरी, जि. गडचिरोली.
मो. नं. ७७७५०४१०८६.
इ-मेल – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *