ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

सातारा | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

साताऱ्यातील लोणंद भागात सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेचे चित्रीकरण सुरु होतं. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरुन एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. त्यांच्यामार्फत सेटवर कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. त्यानतंर सेटवरील जवळपास 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही समावेश होता.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली आणि पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. यामुळे मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे.

दरम्यान आशालता वाबगावकर यांच्यासह 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात 16 कलाकार आणि इतर सेटवरील सहकाऱ्यांचा समावेश आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

आशालता वाबगांवकर यांचा जन्म 31 मे 1941 रोजी गोव्यात झाला. त्या मुळच्या गोव्याच्या असल्याने त्यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं. आशालता वाबगांवकर यांनी आतापर्यंत जवळपास 100 हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदापर्ण केलं. तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक.

गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिना, मोहनंदा यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. तसेच उंबरठा, सुत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *